*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालीत्य नक्षत्रवेल समूहच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम लेख*
*गुरू…आनंद निधान*
गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णू
गुरूर्देवो महेश्वर:
गुरू: साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नम:!
आषाढ.. पहिला पाऊस घेऊन येणारा हा महिना! ग्रीष्मातल्या असह्य काहिलीला परतवून लावून,थंडगार..सुखद ओलावा देणारा आषाढ.. चातुर्मासाची सुरुवात करतो. सर्वत्र सुखद हिरवाई..छान गार वातावरण.. चैतन्याची पखरण.. निसर्ग सौंदर्याची उधळण.. उत्साही ..उत्सवी. क्षण..
अशा सुंदर वातावरणात आषाढ गुरूपौर्णिमेचा पहिला सण घेऊन येतो. सण?हो.. हो.. शिष्य ..भक्तांच्या दृष्टीने गुरू पौर्णिमा हा सणच!
हिंदु संस्कृतीत गुरूला..गुरू पूजनाला अतिशय महत्व आहे. मी तर म्हणेन,देवापेक्षा ही जास्त मान ..महत्व गुरूला देण्यांत आलें आहे.प्रथम मान गुरूचा आहे. कारण त्या परमेश्वरापर्यंत पोहचण्याचा मार्ग दाखविणारा गुरूच असतो न! गुरूच ब्रम्हा..गुरूच विष्णू..नी गुरूच महेश्वर.. असतो भक्तांसाठी!
शिष्याच्या..भक्तांच्या जीवनाला आकार देतो तो गुरू….ज्ञान देतो तो गुरू…..अर्थ देतो तोही गुरुच.. शिष्याचे.., भक्तांचे लौकिक.. पारमार्थिक जीवन घडवितो. .तो गुरू! म्हणून या दिवशी भक्त..शिष्य मनोभावे श्रद्धेने गुरू पूजन करतात. गुरूदक्षिणा देतात.
आद्य गुरू वेद व्यास यांच्या नावाने ही पौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणूनही म्हणूनही ओळखली जाते.
गुरू प्रती आदर भाव..प्रेम भाव.. मनोभाव..कृतज्ञभाव. दाखविण्यासाठी हे गुरू पूजन केले जाते. जो तो आपापल्या परीने हे पूजन अर्चन करतो. गुरूचे पादप्रक्षालन केले जाते.अर्घ्य..आचमन उद्वर्धन केले जाते.. पंचामृत स्नान..सुगंधी द्रव्य स्नान..उष्णोदक स्नान.. मांगलिक स्नान नी शुद्धोदक स्नान घालून अभिषैक केलाजातो.
गुरूला उत्तमोत्तम वस्त्र अर्पण केले जाते. सुगंधी चंदन..टीळा..लावून अलंकृत केले जाते. उत्तमोत्तम ..सुगंधी पुष्पें..सुगंधी हार घातला जातो...उत्तमोत्तम मिठाई .फळे नैवेद्य म्हणून अर्पण केली जातात. जे जे उत्तमोत्तम ते ते मनोभावे अर्पण केले जाते.गुरूला असं देण्यातही एक मानसिक आनंद..मिळतो..समाधान मिळते. आरती करून पूजेची सांगता केली जाते.
गुरू पूजन आणखी वेगळ्या पद्धतीने करू शकतो. गुरूने दाखविलेल्या सन्मार्गावर चालून..उपदेशाचे पालन करून.. ते आचरणात आणून.. समाज सेवा…दु:खी पिडितांची सेवा.. रूग्ण सेवा.. नैसर्गिक आपत्तीत तन.मन..धनाने सेवा.. प्राणीमात्रांवर दया.. ! सेवा हेही एक प्रकारे गुरूपूजनच आहे.
अन्नदान..नेत्रदान..देहदान.. ही ही एक समाजसेवा..पर्यायाने गुरू सेवा आहे. केवळ दक्षिणा..पैसे देणे म्हणजे गुरू दक्षिणा असे नव्हे. तर वरील अनेक प्रकाराने गुरू दक्षिणा देता येते.गुरूऋण फेडता येते.
गुरूला आपल्या संस्कृतीत प्रत्यक्ष देवच मानले जाते. गुरू अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून शिष्याच्या जीवनात ज्ञानप्रकाश पसरवितो. गुरू भक्ताला कैवल्य मार्गावर आणून सोडण्याचे काम करतो..भवसागरातून तारून नेतो. भक्ताला आनंदी..समाधानी परोपकारी जीवन जगणे शिकवितो. प्रसंगी लढण्याचे बळ देतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची जिद्द देतो. आत्मिक आनंद ..आत्मज्ञान देतो ..नी जीव शिव मिलनाची संधी उपलब्ध करून देतो.
कृष्ण अर्जुन..ही गुरू भक्ताची जोडी प्रसिद्ध आहे. अर्जुनाला गीता सांगून कृष्णाने त्याला लढण्याचे बळ दिले. दुष्टांचा स़ंहार योग्यच आहे हे पटवून दिले नि आपणा सर्वांना जीवनाचे एक महान तत्वज्ञान शिकविले. द्रोणाचार्य एकलव्य ही दुसरी गुरू शिष्य जोडी.. गुरूकडून ज्ञान मिळविल्यानंतर गुरूने मागितलेली दक्षिणा एका क्षणा़त गुरूंना देऊन गुरू ऋण फेडले. वाल्या कोळी नारद ही एक अशीच गुरू शिष्य जोडी.. वाल्या लूटारूचा वाल्मिकी ऋषी बनविण्याची किमया नारदांनी केली. जीवन पूर्णपणे बदलवून टाकण्याची ताकद सकारात्मक बदल घडविण्याची ताकद गुरू मध्ये असते.
चाणक्य. चंद्रगुप्त मौर्य.. चाणक्य निती जगप्रसिद्ध आहे.
..रामदास स्वामी..शिवाजी महाराज.. ज्यांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली..स्वाभिमानाने जगणे शिकविले. रामकृष्ण परमहंस.. विवेकानंद .. जोडी््ज्यांनी
..हिंदु संस्कृतीचा डंका जगात गाजविला. बंधुत्वाचा संदेश देऊन प्रेमभाव शिकविला. अशी गुरू शिष्यांची थोर परंपरा आपल्याकडे आहे. गुरूंची आपल्या जीवनातले स्थान ..महत्व ओळखून गुरू द्रोणाचार्य ऍवॉर्ड देण्याची स्तुत्य कल्पना भारत सरकार राबवित आहे.
असं गुरू शिष्यांच.. गुरूभक्तांच ..श्रद्धा.निष्ठा..प्रेम..विश्वासाचं नातं सर्वांभूती फुलू देत.. सगळ्यांना आनंद.समाधान.. संकटसमयी धैर्य.. शौर्य.. शांती.आत्मियता लाभो हीच गुरूपौर्णिमा दिनी गुरू श्री गजानन महाराज चरणी विनम्र प्रार्थना!
सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.