You are currently viewing केला तुका आणि झाला माका

केला तुका आणि झाला माका

*केला तुका आणि झाला माका*

*नाम.दीपक केसरकर यांच्या विरोधातली बॅनरबाजी केसरकरांच्याच हिताची..??*

*आमदारकीची कोणाची महत्त्वाकांक्षा होतेय उघड..?*

विशेष संपादकीय

महाराष्ट्राचे शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री नाम.दीपक केसरकर यांनी दिवाळीच्या पूर्व संध्येला आपण खासदारकीसाठी उमेदवार राहणार नसून विधानसभेची निवडणूक पुन्हा लढणार असल्याचे घोषित केले आणि सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी बाशिंग बांधून तयार असणाऱ्या काहींचे धाबे दणाणले आणि त्यातील कुणीतरी नाम.दीपक केसरकर यांच्या विरोधात बदनामीचा कट रचून जनतेच्या मनात नाम.केसरकर हे कुचकामी असल्याचे चित्र उभे करण्यासाठी रडीचा राजकीय डाव खेळायला सुरुवात केली याचा प्रत्यय आला तो दोडामार्ग येथे लावलेल्या “भाई आता तरी थांबा” या आशयाच्या बॅनर वरूनच…! याचा कर्ता धर्ता कोण…? हे आजकाल प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात समजायला वेळ लागत नाही परंतु बॅनर लावताना लावणाऱ्याने चोरिछुपे लावले हे महत्त्वाचे..!
नाम.केसरकर या मतदारसंघात हॅट्रिक करत तीन वेळा निवडून आले आणि दोन वेळा मंत्री झाले. परंतु अनेकांनी नाम. केसरकरांवर नाकर्तेपणा आरोप लावले. मतदारसंघात विकास कामे खोळंबल्याचे, विकास खुंटला अशा बतावण्या देखील केल्या. केसरकरांनी काही घोषणा केल्या त्या प्रत्यक्षात उतरल्या नाहीत हे देखील खरे आहे आणि अनेकदा ठरवलेल्या योजना अंमलात आणण्यासाठी वेळ देखील लागतो. केंद्रात भाजपा सत्तेत येताना अशा कितीतरी घोषणा झाल्या परंतु त्या प्रत्यक्षात उतरल्या का..? नाही, भविष्यात अंमलात येतीलही, कारण त्याकरिता तेवढा वेळ आवश्यक असतो. नाम.केसरकरांनी पहिल्या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत जिल्ह्यात बराच निधी आणला परंतु अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे तो खर्ची पडला नाही. परंतु शिंदे यांच्या मंत्रिमंडळात केसरकर वजनदार नेते म्हणून अवघ्या महाराष्ट्रात ओळखले जाऊ लागले, त्यांनी अनेक विकासकामांचा धडाका सुरू केला, कित्येकांना आर्थिक मदतीचा हात दिला. त्यामुळे दीपक केसरकर यांचे प्राबल्य वाढू नये याकरिता विरोधकांनी प्रयत्न सुरू केले. “आपला तो बाब्या, दुसऱ्याचा कार्टा” या उक्तीप्रमाणे विरोधकांनी केसरकरांची वाढत असलेली लोकप्रियता खुपत असल्याने आणि आपली राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल या भीतीने त्यांच्या विरोधात बंडच पुकारले. केसरकर कसे अपयशी हे दाखविण्याची एकही संधी सोडली नाही. मुघलांना जसे संताजी धनाजी दिसायचे तसे काही विरोधकांना “जळी स्थळी काष्ठी पाषाणी” फक्त नाम.केसरकर दिसू लागले आणि तिथूनच केसरकर यांच्या बदनामीचे षडयंत्र रचले गेले..?
*”आम्ही दीपकभाई सोबत”*
दोडामार्ग येथे रस्त्यावर लावलेल्या बॅनरला अलीकडे मिडिया आणि सोशल साईट वरून प्रसिद्धी मिळते अन्यथा सर्वसामान्य माणूस बॅनरकडे ढुंकूनही पाहत नाही हे सत्य आहे. मीडियाने ठळक प्रसिद्धी दिली नसती तर कदाचित तो बॅनर दुर्लक्षित राहिला असता. परंतु बॅनर लावणाऱ्याचा उद्देश सफल झाला आणि बॅनर ला प्रसिद्धी मिळाली. अनेकांच्या मोबाईल वर बॅनरचे फोटो गेले, प्रिंट मीडियाने ठळक प्रसिद्धी दिली. नाम.दीपक केसरकर ज्या जनतेपर्यंत प्रत्यक्षात पोहचू शकत नव्हते तिथे आपोआप पोचले. अनेकांनी *”आम्ही दीपकभाई सोबत”* असा मजकूर लिहिलेले नाम. दीपक केसरकर यांचे फोटो स्टेटसला लावले, अनेक व्हॉट्सॲप समुहांवर केसरकरांची छबी फिरली, काहींनी उघडपणे केसरकरांना समर्थन दिले. त्यामुळे नाम.दीपक केसरकर यांच्या सोबत आजही जनता असल्याचे दिसून आले. नाम.केसरकर यांचे सावंतवाडीत लागलेल्या काही बॅनर वरील फोटो अज्ञाताने कापून टाकले परंतु दीपक केसरकर ही व्यक्ती फोटोतून नव्हे तर लोकांच्या संपर्कामुळे अनेकांच्या मनात घर करून राहिली आहे हे सत्य…! त्यामुळे सावंतवाडीत बदनामीकारक बॅनर लावून विरोधकांना फायदा होणार नसल्याने केसरकर यांच्या विरोधात बॅनर सावंतवाडीत लागला नाही.

*”बॅनर लावण्यासाठी दोडामार्गची निवड का केली”?*
दोडामार्ग तालुका मागील विधानसभेच्या निवडणुकीत केसरकरांचा तारणहार ठरला होता. नाम.केसरकर यांना आघाडी मिळवून देत दोडामार्गने विरोधकांना पिछाडीवर ढकलले होते. कदाचित दोडामार्ग मध्ये नाम.केसरकर यांची बदनामी करून त्यांच्या वर्चस्वाला धक्का लावून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याची खेळी विरोधकांनी खेळली आणि *”केला तुका आणि झाला माका”* तशीच परिस्थिती विरोधकांची झाली आहे. नाम. केसरकर यांनी बदनामी होण्यापेक्षा शांत असलेले दीपक केसरकर यांचे समर्थक खडबडून जागे झाले, आक्रमक पवित्रा घेत त्यांनी केसरकरांनी केलेली विकासकामे जनतेसमोर आणावयास सुरुवात केली. चोरीछुपे बॅनर लावणाऱ्यांना “समोर येऊन बॅनर लावून दाखवा” अशी चेतावणी देत आपल्यातील आक्रमक शिवसैनिक जागा केला. कणकवली, पुणे, मुंबई येथून विरोधकांनी आणलेली पार्सले सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदारसंघातील मतदार पुन्हा माघारी पाठवणार याची खात्री दिली. त्यामुळे विरोधकांचा डाव सपशेल फसला आणि नाम.केसरकर पुन्हा एकदा जनतेच्या नजरेत बसले.
“स्वतः काय केले..? यापेक्षा दुसऱ्याने काय नाही केले” याकडे विरोधकांनी लक्ष केंद्रित केल्याने विरोधक स्वतःच कात्रीत सापडले. दोडामार्ग रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक नसल्याची बोंब विरोधकांनी मोठमोठ्याने मारली आणि त्याकरिता मतदारसंघाचे आमदार जबाबदार ठरविले. परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री सक्षम असताना त्यांना विरोधकांनी का प्रश्न विचारला नाही..? जिल्ह्यातील रुग्णालयात डॉक्टर आणणे ही आमदारांची नव्हे तर प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रशासनाचे जिल्ह्यातील प्रमुख म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री..! परंतु पालकमंत्री विरोधकांच्या घरचे असल्याने त्यांना सोडून केवळ नाम.केसरकरांना बदनाम करण्यासाठी, जनतेच्या मनातून उतरविण्यासाठी नाम.केसरकरांच्या बदनामीचा डाव रचला गेला आणि आपला राजकीय रस्ता मोकळा होण्यासाठी शेवटी रडीचा डाव सुरू केला असे एकंदर परिस्थिती पाहून लक्षात येत आहे.

*खोरा आपल्याच बाजूक माती ओढता*
राजकारण म्हटल्यावर प्रत्येक जण मतदारांना आकर्षित करण्यासाठी डावपेच आखत असतो. कुणी माहेरी येऊन आपण सावंतवाडीचे तारणहार म्हणतो, कोणी सावंतवाडीत घर उभारतो आणि सावंतवाडीकर होतो. परंतु सावंतवाडी शहरात इमारत उभारली म्हणून कोणी सावंतवाडीकर होत नाही तर सावंतवाडीचे गुण रक्तात असावे लागतात, असे सावंतवाडीचे लोक आपापसात बोलताना दिसतात. *”खोरा आपल्याकडेच माती ओढता”* त्यामुळे बाहेरून येऊन सावंतवाडीत राहणाऱ्यांना जनता किती स्वीकारणार..? यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे विधानसभेत महायुती होणार की वेगवेगळे लढणार..? युती झाल्यास सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदार संघ नक्की कोणाच्या वाटेला येणार..? विद्यमान आमदार म्हणून शिंदे गटाला शिवसेनेला हा मतदार संघ सोडणार..? हे येत्या काळात समजणारच आहे.. तूर्तास *”केला तुका नि झाला माका”* याचीच चर्चा आवडीने चघळून मजा लुटली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा