*संतोष राणे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व अॅग्रीकल्चरच्या कोकण विभागातून गव्हर्निंग कौन्सिलच्या स्वीकृत सदस्यपदी निवड*
सिंधुदुर्ग
युनियन बँक आॅफ इंडियाचे माजी शाखा व्यवस्थापक, कुडाळ एम्. आय्. डि. सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचे कायम निमंत्रित कार्यकारिणी सदस्य व प्रतिथयश नव उद्योजक श्री संतोष राणे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रिकल्चर (MACCIA) च्या कोकण विभागातून गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. ही निवड चेंबरच्या वतीने चेंबरचे अध्यक्ष मा. ललित गांधी यांनी जाहीर केली असून या निवडीबद्दल श्री राणे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
राणे यांनी चार वर्षापूर्वी युनियन बँक आॅफ इंडिया मधून शाखाप्रबंधक म्हणून स्वेच्छा निवृत्ती घेऊन स्वतः व्यवसाय सुरू केला असून बांबू या दुर्लक्षित घटकांच्या माध्यमातून कोकणातील बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी ते प्रयत्नशील असून महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या “अटल बांबू समृद्धी योजनेची” शासनाच्या सहकार्याने प्रभावीपणे अंमलबजावणी करुन कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिक द्रुष्टीने स्वावलंबी करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या चेंबरच्या निवडणुकीत सदर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी व अध्यक्ष ललित गांधी यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली सर्व पॅनेल निवडून येण्यासाठी विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आता शतक महोत्सवाकडे वाटचाल करत असून कोकणातील उद्योगाना गती देण्यासाठी आणि छोट्या मोठ्या उद्योजकांच्या समस्या दुर करण्यासाठी संतोष राणे यांच्या निवडीमुळे निश्चितच चालना मिळेल असा विश्वास कुडाळ एम्. आय्. डि. सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री मोहन होडावडेकर, सचिव अॅड नकुल पार्सेकर व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मा. श्री ललित गांधी, कोकण विभागीय अध्यक्ष मा. श्री श्रीकृष्ण परब व चेंबरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राणे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.