पालकांच्या तक्रारी असल्यास शाळेचा वेळ बदलणार, शिक्षणाधिकार्यांना अधिकार – दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण
मतदार संघातील प्रत्येक पंचक्रोशीत नव्या रुग्णवाहिका देणार…
सावंतवाडी
लहान मुलांना पुरेशी झोप मिळावी यासाठी शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. परंतू त्याबाबत पालकांच्या किंवा शाळेच्या तक्रारी असतील तर पुन्हा वेळेत बदल करण्याचा अधिकार शिक्षणाधिकार्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे याची माहिती शाळांनी घेवून योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. दरम्यान दप्तराचे ओझे हा मुलांच्या दृष्टीने गंभीर प्रश्न आहे त्याचसाठी पुस्तकात वह्याची पाने दिली आहेत. त्यामुळे गृहपाठाच्या वह्या शाळेत आणण्यासाठी शिक्षकांनी मुलांना सक्ती करू नये, तसे होत असल्यास मुख्याध्यापकांनी योग्य ती सकारात्मक भूमिका घ्यावी, असे ही ते म्हणाले.
श्री.केसरकर यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्याहस्ते उद्योजक विकास वालावलकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी केसरकर म्हणाले, येणार्या काळात प्रत्येक पंचक्रोशीत आपण रुग्णवाहिका देणार आहोत. यासाठी माझ्या काही उद्योजक मित्रांनी आपल्याला तसा शब्द दिला आहे. यातील एक रुग्णवाहिकेचे काम झाले आहे. तर अन्य गाड्यांचे काम सुरू आहे. येणार्या काळात त्या मतदार संघात वाटप करण्यात येतील.