*लेखिका पत्रकार मेघा कुलकर्णी “मेघनुश्री” लिखित अप्रतिम लेख*
*||नामघोष||*
पावसाळ्याची सुरवांत झाली की, लगेचच वेध लागतात ते आषाढी एकादशीचे, विठुमाऊलीच्या ओढीने पाऊले पंढरीची वाट धरतात. वारकरी संप्रदाय, महाराष्ट्रांतील अद्वैतदर्शन घडवणारी परंपरा, माणुसकीचा झरा इथेच वाहतो, भक्तांची मांदियाळी जमते. जल भरलेले मेघही बुक्क्याचा रंग धारण केलेले असतात. प्रतिवर्षी मैलोनमैल चालताना वारीतील टाळमृदंगाचा एकत्रित नांद भक्तिरसांत मनांला आपोआप ओढून घेतो. एकमेकांच्या होणाऱ्या भेटीगाठी पूर्णपणे अनोळखी असतात पण नाते वारकऱ्यांचे असते, माणसांमाणसांत देव पाहिला जातो. कोणताही भेदभाव नाही, थाटमाट नाही अशातच एकमेकांचे चरणस्पर्श केले जातात. कपाळी चंदनाचा टिळा, खांद्यावरची पताका, डोईवरील तुळस म्हणजे पावित्र्याचा ठेवा, वातावरण सुगंधीत करत ही वाटचाल सुरूच राहते.
हरिनामांत दंग असणाऱ्या प्रत्येकाचे डोळे मात्र विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात, जसा माऊलीच्या भेटीसाठी जीव आतुरलेला असतो. अठ्ठावीस युगे कटीवर हात ठेवून भक्तांची वाट पाहणारा विठोबा नामघोषांत क्षणांक्षणांला भेटतो. कष्टाच्या आयुष्यांत सुखाचे चांदणे पसरवत असतो, दृष्टादृष्ट भेटीत डोळे भरून वाहतात. शब्दांतीत वर्णनाच्या पलीकडील ही भक्ती अनमोल देणगी आहे. कुटुंबांमध्ये विविध प्रकारच्या प्रथा-परंपरा पाळल्या जातात त्यांतील एक म्हणजे पंढरीची वारी याचा उल्लेखही केला जातो. “वारकरी आहोत, माळकरी आहोत” त्यांत कुणांला दुखावण्याचा हेतू नसतो, पण सात्विकतेची ओळख पटते. वृद्धत्वाची चाहूल लागते, पाऊल थकते तरी वारी चुकवायची नसते, भक्तीतील शक्तीपुढे आपोआप कर जोडले जातात. चढाओढीचा लवलेश नाही की स्पर्धेचा मागमूस नाही, सद्विचारांनी ओथंबलेले मन फक्त दिसून येते.
संस्कृत भाषेचा पगडा ज्या काळामध्ये होता त्यावेळी सामान्य माणसांला मराठीतून अध्यात्मज्ञान प्राप्त करून दिले ते तत्वज्ञ, श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रसिध्द रचना म्हणजे, ‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’, ‘चांगदेवपासष्टी’, ‘अभंगगाथा’, या आहेत. निवृत्तिनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई हे संतशिरोमणी या संप्रदायाची ठेव आहे. संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, सावता माळी, नरहरी सोनार, विसोबा खेचर, कान्होपात्रा या सगळ्यांचे समाजाप्रती कार्य वेगळे होते पण भक्तिभाव एकच होता पांडुरंगाची सेवा. भारूड, आख्यान, ओव्या, अभंग यांतून समाजहितोपदेश आहे. सण, समारंभाचे औचित्य साधून तत्कालीन समांजांत हे विचार प्रवचनांतून मांडले जायचे, अध्यात्मिक बैठकीतून विचारांची देवाणघेवाण चालायची.
संत नामदेव उत्तरेकडे यात्रा करता करता पंजाबात गेले, तिथला समाज त्यांना आवडला. त्यांच्यासाठी ते हिंदीतून अभंग रचू लागले. गुरूदासपूर जिल्ह्यांतील ‘घुमान’ नांवाच्या गांवी आले, भाषा वेगळी असली तरी भक्तीची साधना एकच होती. कथाकिर्तने होऊ लागली, यांतून पंजाबच्या जनांची नामदेवांवर असलेली श्रद्धा दिसून येते, शीख समाजाने संत नामदेवांच्या अनेक अभंगांचा ‘ग्रंथसाहेब’ मध्ये समावेश केला आहे. ‘घुमान’ ही संत नामदेवांची कर्मभूमी मानली जाते, कारण बरेच वर्षे अगदी वृद्धापकाळापर्यंत त्यांचे वास्तव्य तिकडे होते. वारकरी पंथासाठी आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी या दोन्हीचेही महत्व आहे. दैवत श्रीविठ्ठल हे श्री भगवान विष्णुंचेच रूप मानले जाते आणि या दोन्ही एकादशींमधला जो कालावधी आहे तो चातुर्मास म्हणून पाळला जातो. व्रतवैकल्यांची परंपरा जपत जीवनानंद घेता येतो.
वारीची पायवाट सोपी नाही आषाढातील पर्जन्यवृष्टी अंगावर झेलत, अलोट जनसमुदाय मार्गक्रमण करत असतो. टाळ, मृदंगाच्या साथीत दैवाशी, नशीबाशी चाललेली लढाई थोडा काळ तरी विसरली जाते. महाराष्ट्रांच्या दऱ्याखोऱ्यांत राहणारा तो कैलासाधिपतीही या विठुरायाच्या, माउलीच्या रूपांत भेटतो. हा अनुपम सुखसोहळा, या महासागरांतील एक थेंबही जीवनांत गारवा देईल. ही संत परंपरा महाराष्ट्र भूमीला जी लाभली आहे, ती अमृतवर्षावाच्या रूपाने भक्तीरसांतील अखंडता वर्षानुवर्षे पिढ्यांनपिढ्या शिकवत राहील. सत्य मात्र हेच निदर्शनांस येते, “ब्रह्मानंदी देह भुलुनिया जाई, एक एक खांब वारकरी होई ||”
©मेघनुश्री [लेखिका,पत्रकार]
भ्रमणध्वनी : ७३८७७८७५१२