You are currently viewing मालवण-देऊळवाडा रस्ताप्रश्नी युवक काँग्रेसकडून श्राद्ध आंदोलन…

मालवण-देऊळवाडा रस्ताप्रश्नी युवक काँग्रेसकडून श्राद्ध आंदोलन…

मालवण-देऊळवाडा रस्ताप्रश्नी युवक काँग्रेसकडून श्राद्ध आंदोलन…

पालिका व बांधकामचा निषेध; आंदोलनाला नागरिक, वाहनचालकांचाही पाठींबा…

मालवण

शहरातील देऊळवाडा येथे आडारी देऊळवाडा – आडवण तिठा या रस्त्यावर भुयारी गटार योजनेच्या चेंबर मुळे रस्ता खचून भला मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असताना याबाबत नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आज येथील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने पिंडदान करून श्राद्ध आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी नगरपालिका व बांधकाम विभागाच्या विरोधात घोषणाबाजी करत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त केला.

शहरातून जाणाऱ्या मालवण- कसाल या राज्यमार्गावर देऊळवाडा येथे आडारी-देऊळवाडा- आडवण मार्ग तिठ्यावर भुयारी गटार साठी बनविलेले चेंबर पावसाच्या पाण्याने भरून यातील पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे या चेंबरच्या लगतचा रस्ता खचून भला मोठा खड्डा पडला आहे. येथे साचणाऱ्या पाण्यामुळे हा खड्डा दिसत नसल्याने मोटारसायकल व इतर वाहने खड्ड्यात आदळत असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. तसेच काही वाहनचालकांचे अपघातही घडले आहेत. हा त्रास दरवर्षी होत असून याबाबत नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात येत नसल्याने आज युवक काँग्रेसने पूर्व इशाऱ्यानुसार या खड्ड्याच्या ठिकाणी नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने श्राद्ध घातले. खड्ड्यात केळीच्या पानावर पिंडदान करून, फुले वाहून तसेच प्रशासनाच्या विरोधातील बॅनरबाजी व घोषणाबाजी करत युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला.

या अनोख्या आंदोलनाला रस्त्यावरून ये – जा करणाऱ्या वाहने चालक तसेच नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत पाठिंबा दिला. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रेयस माणगावकर, काँग्रेस सदस्य संदेश कोयंडे, जेम्स फर्नांडिस, महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, बाबा मेंडिस, लक्ष्मीकांत परुळेकर यांसह वाहनचालक व नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा