You are currently viewing आयुष्यावर बोलू काही….

आयुष्यावर बोलू काही….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आयुष्यावर बोलू काही….*

 

आयुष्यावर बोलू काही काय बरे बोलावे

बदामाहूनी फळ कठीण हे सांगा कसे सोलावे..

फणसापरी हो काटे टोचती सोय न बोलायाची

सहाण होऊन झिजलो तरी ही सर ना चंदनाची…

 

गंध जातो उडून सारा झिजून जातो देह

पुन्हा पुन्हा का तरी पडे हो आयुष्याचा मोह

प्राजक्तही झडून जातो चिखल होई फुलांचा

कमल म्हणूनी वावरलो तरी गंध येई मातीचा..

 

नाही तराजू तोलायाला न्याय न मिळतो कोठे

मोती शोधण्या तळात गेलो तरीही म्हणती खोटे

वाळू देती हातामध्ये मोती ठेवून घेती

कशी पटावी जगताची हो उफराटी ही नीती..

 

गारगोट्या हो साऱ्या येथे पारख ना कोणाला

हिऱ्यास नाही मोल हो येथे लावावे किती पणाला ?

मी मी म्हणूनी थोर म्हणविती दामटती हो घोडे

नसता लायकी घालून घेती पायी सोन्याचे तोडे

 

धरता चावते सोडता पळते श्वान हे आयुष्याचे

गोंजारावे किती जरी ते सदैव चावायाचे

डोके घातले उखळामध्ये हो होवो आता काही

खूप शहाणी होती माझी सांगून गेली आई…

 

प्रा.सौ.सुमती पवार.नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा