You are currently viewing पुन्हा जन्मली ती….

पुन्हा जन्मली ती….

दीपक परब यांच्या त्या निर्णयाने पत्नी सही यांनी दिले त्यांना नवे आयुष्य….

 

मसुरे / प्रतिनिधी :

 

पती आणि पत्नीचे नातं हे एक जिव्हाळ्याचं नातं असतं. आणि याच नात्याचा प्रत्यय मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे वरची शेळपेवाडी या गावाचा मूळ रहिवासी आणि कल्याण पत्री पूल येथे सध्या वास्तवास असणाऱ्या 35 वर्ष दीपक परब या युवकाने आचरणात आणून आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर पत्नीच्या स्मृती चिरंतर जागवण्यासाठी एक आदर्श सर्वांसमोर निर्माण केला आहे. मेंदू मृता अवस्थेमध्ये असलेल्या आपल्या गर्भवती पत्नीचे हृदय दान करण्याचा कठीण असा निर्णय आपल्या कुटुंबाच्या संमतीने दीपक परब या युवकाने गुरुवारी घेतला. हृदयासाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांवर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया के एम मुंबई रुग्णालयांमध्ये तब्बल 56 वर्षांनी पार पडली हृदय दाना बरोबरच पत्नीचे नेत्र सुद्धा दान करून आणखी एकाला नवीदृष्टी दीपक परब आणि त्याच्या कुटुंबाने घेतलेल्या हृदयस्पर्शी निर्णयाने मिळाली आहे. खरोखरच दीपक परब याने स्वतः दुःखात असतानाही असा कठोर पण समाजाभिमुख निर्णय घेऊन खरोखरच सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान उंचावलेली आहे. दीपक परब आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला खरोखरच सलाम करावा आणि असा आदर्श समाजाभिमुख एक उपक्रम समाजापुढे ठेवून खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन या कुटुंबाने घडविले आहे.

सावंतवाडी  तालुक्यात बांदा येथे माहेर असलेल्या परब यांची पत्नी सई या सात महिन्यांच्या  गर्भवती होत्या. लग्नानंतर सात वर्षांनी त्यांच्या घरी पाळणा हलणार होता. यामुळे सारे कुटुंब आनंदात होते. पण नियती कधी कधी खूप कठोर बनते त्याचा प्रत्यय परब यांच्या वर बेतलेल्या प्रसंगातून येतोय.  सातव्या महिन्यामध्ये त्यांच्या पत्नीला थोडे अस्वस्थ वाटत होते. म्हणून त्यांनी कल्याणमधील वैष्णवी रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार सुरू केले. रक्तदाब वाढला होता. तो कमी होत नव्हता. त्यामुळे तेथील डॉक्टरांनी त्यांना केईएमला नेण्याचा सल्ला दिला. कल्याणमधील सार्वजनिक रुग्णालयामध्ये सुसज्ज वैद्यकीय उपचारसुविधा असती तर मुंबईला येण्याची गरज लागली नसती असे दीपक  सांगतात. केईएममध्ये डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणीनंतर त्यांच्या मेंदू मध्ये  रक्तस्त्राव झाल्याचे सांगितले.

रुग्णालयामध्ये केलेल्या चाचण्यांमधून काविळीचे निदान झाले होते. सई या गर्भवती असल्याने पोटात  सात महिन्यांचे बाळ होते. डॉक्टरांनी दोघांनावाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यास यश आले नाही. सई  यांना १० जुलैला डॉक्टरांनी मेंदू मृत  जाहीर केले.

डॉक्टरांनी परब यांना सर्व माहिती देऊन अवयवदान करण्याचा सल्ला  दिला. ज्या व्यक्तीला वाचवण्याचा अथक प्रयत्न केला जात आहे तिचा मृत्यू स्वीकारून अवयवदानाचा निर्णय घेणे हा दीपक यांच्यासाठी अत्यंत कठीण प्रसंग होता. पत्नीच्या  माहेरच्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे दीपक सांगतात .ऐरोली नवी मुंबई येथे  खासगी कंपनीमध्ये नोकरी करत असलेल्या परब यांना सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी कुटुंबाच्या सल्ल्याने अवयव प्रत्यारोपण करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली. औरंगाबाद येथील हृदयविकार असलेल्या रुग्णाला हृदयप्रत्यारोपणाची गरज होती. सई  आणि या हृदयविकार रुग्णाच्या चाचण्या योग्यरितीने जुळून आल्यानंतर हृदयप्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

केईएममध्ये १६ फेबुवारी १९६८ रोजी पहिल्यांदा हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र, ती यशस्वी झाली नाही.  मुंबई महानगरपालिकेच्या केईएम या प्रमुख रुग्णालयामध्ये तब्बल साडेपाच दशकांनी हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया गुरुवारी यशस्वीपणे पार पडली. रुग्णालयात हृदयप्रत्यारोपण विभाग सुरू झाल्यापासून हृदयदात्याच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला गुरुवारी मेंदूमृतावस्थेमध्ये असलेल्या रुग्णाचे हृदय मिळाले. सुमारे दहा तास चाललेली ही आव्हानात्मक हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे केईएम हे देशातील पहिले महापालिका रुग्णालय ठरले आहे.  हृदयविकारासंबंधी तज्ज्ञ डॉ.प्रवीण कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, डॉ. प्रवीण कुलकर्णी, डॉ. उदय जाधव, डॉ. द्वारकानाथ कुलकर्णी, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. तरुण शेट्टी यांच्यासह ५० जणांच्या चमूने हे आव्हान पेलले.

अवघड परिस्थितीमध्ये हा निर्णय घेणाऱ्या दीपक यांना आपल्या गर्भवती पत्नीला कल्याणमधील रुग्णालयातून परळ येथील केईएम रुग्णालयामध्ये आणताना प्रचंड वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला. सव्वादोन तासांपेक्षा अधिक काळ ते वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. ७ महिन्याच्या  गर्भवती असलेल्या पत्नी व बाळाच्या चिंतेने त्यांच्या जिवाची घालमेल होत होती. वाहतूक कोंडी नसती आणि कल्याणमध्ये केईएमसारखे सुसज्ज रुग्णालय असते तर पत्नी आणि बाळ दोघेही वाचले असते असे दीपक परब यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस सांगितले.

या बिकट काळामध्ये  राज असरोंडकर, किरण सोनावणे, कल्याण- डोंबिवलीमधील अधिकारी संजय जाधव, केईएम रुग्णालय प्रशासन, डॉ. प्रवीण बांगर यांची मदत झाल्याचे दीपक परब सांगतात . केईएम हॉस्पिटल येथे सई यांना दाखल केल्या नंतर पाच दिवस दीपक, त्याची आई, सईचा भाऊ यांची खाण्या जेवणाची, आंघोळीची व किरकोळ आरामाची व्यवस्था हॉस्पिटल लगत राहणाऱ्या परब यांचे नातेवाईक असलेल्या देवगड – नारिंग्रे येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर वायंगणकर यांनी केली. पत्नी आणि या जगात येऊ घातलेल्या बाळाच्या मृत्युचे दुःख पचवत दीपक परब यांनी पत्नीच्या अवयव दानाच्या घेतलेल्या निर्णयाने एकास नवीन जीवन तर दुसऱ्यास नवीन दृष्ठी मिळाली आहे. त्यामुळे आभाळा एव्हढ्या दुःखात सुद्धा दीपक परब यांनी दाखवलेले समाजभान खरोखरच कौतुकास्पद आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा या दात्याचा यथोचित सन्मान होणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा