You are currently viewing वारी

वारी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*” वारी “*

 

पांडुरंगी चित्त जडे

दर्शनाची आस लागे

पालखीच्या संगे मन

वेगेवेगे धावू लागे ||

 

वैष्णवांचा मेळा चाले

पंढरीच्या वाटेवरी

राम कृष्ण हरी जप

मुखी वदे वारकरी ||

 

हाती धरी टाळ वीणा

सवे मृदुंगाची थाप

तालावरी रंगुनिया

नाचे पाय आपोआप ||

 

संसाराचा सोडी ताप

धरे नामाची संगत

भक्तीरसात न्हाऊन

वाढे जन्माची रंगत ||

 

पंढरीच्या कळसासी

करी दुरुनी वंदन

अर्पी भक्तीभाव माला

आत्मभावाचे चंदन ||

 

मुखी नाम सदा घ्यावे

आत्मबुद्धी सोडूनिया

होई जन्माचे सार्थक

भक्तिधन जोडूनिया ||

 

ज्योत्स्ना तानवडे. पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा