*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*”मैत्रिण “*
मित्र किंवा मैत्रिण बनुन आपल्या मनावर अधिराज्य गाजवत रहातं हे हक्काचे अतिशय विश्वासाचं अत्यंत मनच्या आतलं जवळचं असं सख्ख्या नात्यापेक्षाही मोलाचं असं जपलेलं नातं म्हणजे मैत्री.
रोज भेटतोच, बोलंलच पाहिजे, असं काही नसतं.
पण रोजच्या कंटाळवा्ण्या जिवनात सतत आनंदाचा दिड दा दिड दा करणारा सतारीचा सुखद झंकार…… सुप्रभाती कानावर येणारी मधुर कोकिळेची कुहू कुहू लकेर….आयुष्याच्या वाटेवर अंग पसरून बसलेला रातराणीचा बहर….दिवसभर सदा फुललेली सदाफुली….
पहाटेच्या पहिल्या प्रहरी पापणीवर पडलेला आणि अलगद् विसावलेला चमकणारा दंवबिंदू…
झुंजू मुंजू पहाटे पोवळ्या मोत्यांच्या राशी सांडणारा स्वर्गिय वृक्ष प्राजक्त….
म्हणजे मैत्री.
आठवता आठवता निर्मळ हंसवणारी… कधी नकळत रडवणारी…. भेटुन भेटुन डोळ्यात न मावणारी ,…… बावरलीच एखादी तर पहिली ‘हांक’. हिलाच जाते…. पाठीवर हात फिरवत धीराची साऊली हीच होते…. रात्री स्वप्नात बालपणीचं चांदणं सांडते… अनोळखी अनोळखी म्हणत अख्ख आयुष्यातच हक्काची जागा बळकाऊन बसते…… “विसरेल का मला?”. या काळजीने अंगावर भितीचा व्याकुळ काटा आणते…. आनंदाची ऊधळण, धीराची सोबत, घट्ट घट्ट होत जाणारी काळजाची विण…. सरसर ऊलगडत जाणारी रेशमाची लड… कधीही कूठेही तूच हवीस असं भासवणारी ..
अलगद नकळत हाताच्या शिंपल्यात पडलेल्या मैत्रीच्या थेंबाचा काही काळानंतर झालेला टप्पोर मोती.. दोघींच्या सुखाकडून आनंदाकडे सदा झुलत रहाणारा आठवणींचा हिंदोळा…. मनाला जिवंत तरूण ठेवणारा दोघींच्या ह्रदयात खळखष वहाणारा चैतन्यमय झरा
…. म्हणजे मैत्रीण बरं का!
प्रत्येकाने जिवप्राण जपावा आनंद लुटावा.
अनुराधा जोशी