एसटी आगारांत १५ जुलैपासून ‘प्रवासी राजा दिन’…
सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांची माहिती..
कणकवली
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन कार्यरत असणाऱ्या एसटीचे विभाग नियंत्रक आता प्रत्येक आगारात प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना ऐकून घेणार आहेत. तसेच त्या तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजनाही करणार आहेत. यासाठी एसटीच्या सिंधुदुर्ग विभागात १५ जुलैपासून दर सोमवारी व शुक्रवारी ‘प्रवासी राजा दिन’ आयोजित केला जाणार आहे.
प्रवाशांच्या समस्या, तक्रारी यांचे स्थानिक पातळीवरच निराकरण होण्याच्या उद्देशाने काम करता यावीत, यासाठी या दिनाचे आयोजन केले जाणार आहे. प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये आपल्या समस्या, तक्रारी, सूचना या लेखी स्वरूपात दर सोमवारी व शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी १० ते २ या वेळेत मांडू शकतात. त्यावर विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करतील. एसटीच्या सिंधुदुर्ग विभागात ‘प्रवासी राजा दिन’ सावंतवाडी १५ जुलै, मालवण १९ जुलै, कणकवली आगार २२ जुलै, देवगड आगार २६ जुलै, विजयदुर्ग आगार येथे २९ जुलै रोजी होणार आहे. यावेळी प्रवाशांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीची नोंद ठेवली जाणार आहे. स्थानिक पातळीवर समस्या सोडविण्यात येणार आहेत. एसटी गाड्यांमधून दररोज ५४ ते ५५ लाख प्रवासी प्रवास करतात.