जल जीवन मिशन ची कामे निकृष्ट करणारे ठेकेदार रामदास विखाळे व निनाद विखाळे यांना काळ्या यादीत टाका
*आमदार नितेश राणे यांची पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी
* विखाळे यांच्या कामाबद्दल जनतेच्या सातत्याने आहेत तक्रारी
* या संपूर्ण कामांची विशेष बाब म्हणून चौकशी करा
कणकवली
कणकवली व वैभववाडी तालुक्यातील “जलजीवन मिशन” ची कामे ठेकेदार रामदास विखाळे व निनाद विखाळे या दोघांनी मिळून केलेली आहेत.सुमारे १७ कामे या दोघांनी केली आहेत.ही सर्व कामे निकृष्ट झाल्याची तक्रार जनता आणि लोकप्रतिनिधी यांनी सातत्याने माझ्या कडे केली आहे. त्यामुळे या दोघांनी केलेल्या जलजीवन च्या नळपाणी पुरवठा योजनेच्या कामांची विशेष बाब म्हणून चौकशी करण्यात यावी व त्याना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.
कणकवली मतदारसंघातील कणकवली व वैभववाडी तालुक्यातील “जलजीवन मिशन” या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेमधील सुमारे १७ कामे कणकवली तालुक्यातील शासकीय ठेकेदार रामदास विखाळे व निनाद विखाळे या दोघानी घेतली आहेत. या दोघांनी घेतलेल्या कामांबाबत स्थानिक जनता व लोकप्रतिनीधी यानी अनेक तक्रारी माझेकडे केलेल्या आहेत. याबाबत मी योजनेचे सिंधुदुर्ग कार्यकारी अभियंता श्री. महाजनी याना आढावा बैठकी दरम्यान प्रत्यक्ष जातीने लक्ष घालण्याची सूचना केली होती. परंतु सदर ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत असल्याने अनेक योजनांची कामे अर्धवट स्थितीमध्ये आहेत. त्याचप्रमाणे अत्यंत निकृष्ट व सुमार दर्जाची कामे केल्याने जनतेला ऐन उन्हाळ्यामध्ये टंचाईच्या काळात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्याचा रोष जनता सरकारवर व्यक्त करीत आहे.अशी तक्रार आमदार राणे यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.