माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन
केंद्राने राबविलेल्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा
सावंतवाडी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील सात वर्षांच्या आपल्या कालावधीत समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या. मोदींनी केंद्रातील भाजप सरकारच्या माध्यमातून राबविलेल्या या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पक्षातील लोकांबरोबरच विविध सामाजिक संघटनांनी केल्यास मोदींच्या स्वप्नातील उद्याचा भारत निर्माण करण्यास मदत होईल. सुवर्ण संधीचा फायदा घेत सर्वांनी एकत्रित रित्या काम करूया असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
सावंतवाडी नगरपालिका सभागृहात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, नगरसेवक ॲड. परीमल नाईक, मनोज नाईक, आनंद नेवगी आदी उपस्थित होते.
कोरोनामुळे लॉकडाउन काळात सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम झाला तसेच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर योजना अंमलात आणून समाजातील सर्व घटकांना मदत होईल यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या काळात कधी नव्हते एवढे शेतातील उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांच्या हातात पूर्वीपेक्षा जास्त पैसा आला. ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारली. या कठीण काळात पाश्चिमात देशांतील व्यवस्था डबघाईला आलेली असताना मोदींनी केलेल्या योग्य नेतृत्वामुळे आपण या वाईट काळावर मात करू शकलो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.