*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
आषाढस्य प्रथम दिने |
*मेघा रे मेघा !*
पावसाळी धुंद वेळा
मेघ बरसू लागलेले
आणि माझ्या अंतरंगा
भावनेने छेडलेले ||
पावसाची लागली झड
एकटा मी या क्षणाला
आठवांनी साजणीच्या
वेदना जाळी मनाला ||
तू प्रवासी अंबराचा
याच मार्गानेच जा रे
वाट माझ्याही गृहाची
शोधूनी तू काढ ना रे ||
हे नभा तू दूत माझा
होऊनी जा मम गृहाला
प्रेम माझ्या अंतरीचे
सांग माझ्या प्रेयसीला ||
एकटा मी येथ आहे
चिंतनी माझ्या प्रियेच्या
सांग तिजला क्षेम माझे
सांत्वना दे अंतरीच्या ||
ज्योत्स्ना तानवडे. पुणे