You are currently viewing चाफेलीत कॉजवे गेला वाहून…

चाफेलीत कॉजवे गेला वाहून…

चाफेलीत कॉजवे गेला वाहून…

ऐन पावसाळ्यात ग्रामस्थ अडचणीत; काम निकृष्ट असल्याचा होतोय आरोप..

कुडाळ

तालुक्यात माणगांव खोर्‍यातील चाफेली काजरगोठणवाडी मुख्य रस्त्यावरील कॉजवेचा एक भाग निकृष्ठ कामामुळे रविवारी झालेल्या पुराच्या पाण्यात वाहुन गेला. त्यामुळे येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे. ऐन पावसाळी मौसमात कॉजवे वाहून गेल्याने आता करायचे काय? असा प्रश्न येथील नागरीकांना पडला आहे.

गेले दोन दिवस माणगाव खोर्‍यातील सह्याद्रि पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यदृष्टी झाली. त्यामुळे कर्ली नदिसह नाल्यांनाही मोठ्या प्रमाणात पाणी आले. या पाण्याच्या प्रवाहात चाफेली काजरगोठणवाडी रस्त्यावरील कॉजवेचे स्लॅप वाहून गेले. जिल्हा वार्षिक योजनेतून या कॉजवेचे काम काल भैरव मजुर सहकारी संस्था, कसालच्या माध्यमातून सुरू होते. जवळपास 9 लाख 43 हजार 62 रूपयाचे हे काम आहे. निकृष्ठ प्रतिच्या कामामुळे चाफेली येथील कॉजवे वाहून गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपअविभाग कुडाळचे उपअभियंता श्री. पिसाळ व शाखा अभियंता श्री. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सदरच्या कामाची मुदत अद्यापही बाकी असून मुदतीत काम न झाल्यास ठेकेदारावर कारवाई केली जाईल असे सांगितले. मात्र सद्यस्थितीत ग्रामस्थांच्या सुविधेबाबत तुम्ही काय करणार ? असा सवाल उपस्थित ग्रामस्थांनी केला. त्यावर मात्र बांधकामच्या या दोन्ही अधिकार्‍यांनी बोलण्याचे टाळले असल्याचे ग्रामस्थ अजय सावंत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा