*डोईफोडे कुटूंबीयांकडून वारकऱ्यांची सेवा*
*मुलांनी आपल्या बचतीचे पैसे वापरून दिला सकारात्मक संदेश*
निरा(पुरंदर)ः
सालाबादप्रमाणे यंदाही शिवाजीनगर पुणे येथे कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या श्री.अनिल भगवान डोईफोडे कुटूंबियांच्या वतीने संतश्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी हजारो वारकऱ्यांची चहा, नाष्टा व अंघोळीची सोय करत सेवा करण्यात आली.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात माऊलींच्या निरा नदीतील पादुका स्नानाला अतिशय महत्व आहे. वाल्हे गावात मुक्काम केल्यानंतर निरेतील स्नानापर्यंतच्या जवळपास ११ किमींच्या मार्गात पिंपरे निरा, ता.पुरंदर येथे डोईफोडे कुटूंबियांचे घर असून, गेल्या कित्येक वर्षांपासून नित्यनियमाने ते वारकऱ्यांच्या संपूर्ण नाष्ट्याची सोय करतात. यासह वारकऱ्यांना अंघोळीची देखील ते सोय करतात. यंदाच्या सेवेचे वैशिष्ठ म्हणजे हर्षदा, श्वेता आणि शंभुराज या डोईफोडे कुटूंबातील मुलांनी आपले स्वतः बचत करून जमवलेले पैसे वारकऱ्यांच्या सेवेसाठी वापरत समाजसेवेचा एक नवीन पायंडा पाडला आहे.
यावेळी बोलताना, श्री.अनिल डोईफोडे म्हणाले की, वारी आणि वारकरी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यात, आमचे घर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गावर आहे. त्यामुळे, पाच वर्षांपूर्वी पालखीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची आपल्या परिने सेवा करण्याचा निर्णय मी घेतला. या निर्णयाला माझी पत्नी स्वाती हिने देखील हातभार लावला. यंदा माझी द्वितीय कन्या श्वेता हिने स्वतःच्या बचतीचे पैसे माझ्या हातात ठेवले. त्यापाठोपाठ माझ्या अन्य अपत्यांनी देखील पुढाकार घेत त्यांच्या बचतीचे पैसे वारकऱ्यांसाठी खर्च करण्यासाठी देऊ केल्याने, अतिशय आनंद आणि अभिमान देखील वाटला. आपला वारकरी सेवेचा वसा आता नव्या पिढीकडे हस्तांतरीत होत असल्याचे पाहून समाधान देखील वाटले, असेही ते पुढे म्हणाले.
प्रतिष्ठीत निरा स्नान झाल्यानंतर माऊलींची पालखी लोणंद येथील मुक्कामाकडे पाचरण झाली.