You are currently viewing धारगळ महाखाजन येथे दरड कोसळल्याने महामार्ग ठप्प

धारगळ महाखाजन येथे दरड कोसळल्याने महामार्ग ठप्प

धारगळ महाखाजन येथे दरड कोसळल्याने महामार्ग ठप्प

पेडणे

राष्ट्रीय महामार्ग ६६ धारगळ महाखाजान येथील दरड पंधरा दिवसाच्या अंतराने पुन्हा एकदा कोसळल्यामुळे कंत्राटदाराच्या कामाचा दर्जा दिसून आला आहे. दरम्यान, ११ जुलै रोजी केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी हे मोपा लिंक रस्त्याच्या उद्घाटन समारंभाला येणार आहे. त्यावेळी त्यांनी महामार्ग कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदार कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक मागणी करत आहेत.

पत्रादेवी ते धारगळ महाखाजन पर्यंत रस्त्याचे कंत्राट एमव्हीआर या कंपनीला मिळाले आहे. महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या रस्त्याचे काम करत असताना अनेक समस्या उभ्या राहिल्यात. त्यासाठी वेळोवेळी स्थानिक पंचायती, नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला. सरकारला वेगवेगळ्या पद्धतीने निवेदने दिली. निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, अधिकाऱ्यांनी वेळोवेळी या रस्त्याची पाहणी केली. ज्या समस्या असतील त्या सोडवल्या जातील अशी आश्वासने दिली. मात्र, निकृष्ट कामांवर प्रत्यक्षात कोणतीच कारवाई झाली नाही.

धारगळ महाखाजन येथे गेल्या पावसाळ्यात भली मोठी दरड कोसळली होती. त्यावेळी जीवितहानी झाली नाही. त्यावेळी एकेरी महामार्ग पूर्णपणे बंद केला होता. त्यानंतर मागच्या पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी दरड कोसळली. त्यानंतर ८ रोजी पुन्हा दुसऱ्यांदा या ठिकाणी दरड कोसळली आहे. कुठली जीवितहानी झाली नाही. मात्र अशा दरडी कोसळण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारने हे विषय गांभीर्यतीने घेऊन कंत्राटदाराला आणि कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये काढावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
धारगळ महाखाजन येथील ज्या पद्धतीने दरड कोसळली त्याच पद्धतीने मालपे न्हय बाग रस्त्यावरील दरड रविवारी कोसळली. त्याच दिवशी उगवे येथील एक रस्त्याची दरड कोसळली. त्या ठिकाणी जीवितहानी झाली नसली तरी मात्र वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली.

रस्ते वाहतुकीस बंद
धारगळ महाखाजन येथे जी दरड दुसऱ्यांदा कोसळली तो रस्ता एकेरी मार्गासाठी बंद करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग धारगळ ते दोन खांब पर्यंतचा एकेरी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. शिवाय मालपे न्हयबाग येथील जो बायपास रस्ता राष्ट्रीय महामार्ग सरकारने केला होता. त्याठिकाणीही मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे हा पूर्ण रस्ता बंद करून जो पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग होता त्याच रस्त्यावरून सर्व प्रकारची वाहतूक वळवलेली आहे. या रस्त्यांच्या बाजूला मोठमठे डोंगर आहेत. हे डोंगर कापताना कंत्राटदराने किंवा कंपनीने सरकारच्या टीसीपी विभागाकडून कसल्याच प्रकारचे परवाने घेतलेले नाहीत. जर परवाने घेतलेले असते तर डोंगर सरळ रेषेत कापले असते का ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

कंत्राटदाराने रस्त्याच्या बाजूला असलेले डोंगर सरळ रेषेत कापून भविष्यात मोठ्या प्रमाणात या दरडी कोसळण्याची संधी दिलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा