एका शासकीय अधिकाऱ्याला तब्बल १५ लाख ४० हजाराचा गंडा…
कणकवली
शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर दामदु्प्पट परतावा मिळेल असे आमिष दाखवून सिंधुदुर्गातील एका शासकीय अधिकाऱ्याला तब्बल १५ लाख ४० हजार रूपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर क्राईम सिंधुदुर्ग विभागाकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे.
तसेच गंडा घालणाऱ्या कंपनी तथा कंपनीतील संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेती संबंधित खात्यात काम करत असलेल्या त्या अधिकाऱ्याला फेसबुक स्क्रोल करत असताना एप्रिल महिन्यात मनीसुख कंपनीच्या नावे एक लिंक दिसली होती. यात कमी कालावधीत शेअरमार्केट, अायपीओ तसेच इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून अल्पावधीत दामदुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. मनीसुख कंपनीची लिंक ओपन केल्यानंतर त्या अधिकाऱ्यांशी त्या कंपनीतील एकाने संपर्क साधला आणि शेअरमार्केट तसेच इतर कंपन्यांच्या स्टॉकबद्दल अाणि त्यामधून मिळणाऱ्या परताव्याबाबत माहिती दिली. सुरवातीला ५० हजार रूपये गुंतविल्यानंतर त्या अधिकाऱ्याला दहा दिवसांतच ६ हजार ३०० रूपयांचा बोनस मिळाला. त्यामुळे विविध टप्प्यात त्या अधिकाऱ्याने शेअर मार्केटमधील विविध कंपन्यामध्ये मनीसुख ट्रेडींग कंपनीच्या माध्यमातून तब्बल १५ लाख ४० हजार रूपयांची गुंतवणूक केली. यात महत्वाची बाब म्हणजे २० जून रोजी त्या अधिकाऱ्याने आपले ट्रेडिंग खात्यावर रक्कम पाहिली तेव्हा त्यांच्या खात्यामध्ये तब्बल २ कोटी ३४ लाख रूपये जमा झाल्याचे दिसले. लागलीच त्यांनी ५० लाख रूपये काढण्याबाबत रिक्वेस्ट पाठवली. त्यावेळी त्या कंपनीकडून १२ लाख ५० हजार रूपये भरा असे सांगण्यात आले. एवढी रक्कम भरण्यास त्या अधिकाऱ्याने असमर्थता दशर्वली तेव्हा सुरवातीला ५ लाख त्यानंतर १ लाख तरी भरा असे सांगण्यात आले. त्यावेळी त्या अधिकाऱ्याला आपली मोठी फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली. त्यांनी याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात त्या कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तर कणकवली पोलिसांनी सायबर गुन्हे शाखा सिंधुदुर्गकडे हा गुन्हा वर्ग केला आहे.