प्रवास सुस्साट : पावणेदोन किमीचे खोदकाम पूर्णत्वाच्या मार्गावर
डिसेंबरअखेरीस बोगदा होणार वाहतुकीस खुला
नागमोड्या अवघड वळणांचा, खोल दरीचा आणि अचानक होणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी ओळख असलेला कशेडी घाट आता भूतकाळ ठरणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात या घाटात बोगद्याच्या खोदकामासाठी शेकडो मजूर दिवसरात्र राबत आहेत. खोदकाम पूर्णत्वाच्या मार्गावर असून डिसेंबरअखेरीस हा बोगदा वाहतुकीस खुला होणार आहे. त्यामुळे सध्याचे घाटातील 30 मिनिटांचे अंतर अवघ्या 10 मिनिटांत पार होणार आहे.
मुंबईहून कोकणासह गोव्यात जाणारा प्रवासी महामार्गाचा वापर सर्रासपणे करतो. मात्र अवघड वळणांचा कशेडी घाट सातत्याने अपघाताना आमंत्रण देत असल्याने त्यामध्ये अनेकांना आपले जीवही गमवावे लागले आहेत. वळणावळणांच्या या घाटातील 34 किमीचे अंतर पार करण्यासाठी साधारण पाऊण तास लागतो. सध्या सुरू असलेल्या महामार्ग चौपदरीकरणात घाटाचे रूंदीकरण शक्य नसल्याने पर्याय म्हणून बोगदा खोदण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. मुंबई या कंपनीने कशेडी येथे पावणेदोन किलोमीटरचे दोन बोगदे खोदण्याचे काम हाती घेतले आहे.
गेल्या वर्षभरापासून बोगद्याचे काम सुरू आहे. सुमारे 300 मजूर अहोरात्र राबत आहेत. यातील 40 टक्क्यांहून अधिक काम पूर्णत्वास गेले आहे. डिसेंबर 2019 मध्ये या कामाचा शुभांरभ झाल्यानंतर खेड आणि धामणदेवी-पोलादपूर अशा दोन्ही बाजूनी डोंगर पोखरण्यास सुरूवात झाली. एकूण तीन लेनमध्ये होत असलेल्या या बोगद्यातील 3 हजार 800 मीटरपैकी 2 हजार 100 मीटरचे खोदकाम पूर्ण झाले आहे. त्यामध्ये पोलादपूरकडून सर्वाधिक म्हणजे 1700 मीटर, तर खेडकडून 400 मीटरचे खोदकाम पूर्ण झाले आहे. या बोगद्यातच 70-80 मीटरच्या पाच पुलांचाही समावेश आहे.
बुमर यंत्राचा वापर
कशेडी बोगदा खोदण्यासाठी बुमर हे अत्याधुनिक बोगदा खोद यंत्र वापरण्यात येत आहे. त्याद्वारे तीन ते चार मीटर लांबीचा कातळ सहज फोडला जात आहे. 20 मीटर रुंद आणि 6.5 मीटर उंच भुयारी मार्गाचे खोदकाम करण्यासाठी बुमर यंत्राचा उपयोग होत आहे. सुरुंग स्फोटासाठी जिलेटीनचा वापर केल्यानंतर भुयारामध्ये पडलेला कातळ व मोठमोठे दगड बाहेर काढण्यासाठी अजस्त्र यंत्राचा वापर केला जात आहे. या बोगद्यासाठी सुमारे 457 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
जोड भुयारांसह सुरक्षिततेला प्राधान्य
या बोगद्यात तीन लेनसह आपत्कालीन वायुविजन सुविधेचा एक बोगदा समाविष्ट आहे. पोलादपूरच्या बाजूच्या पहिल्या अर्धा किलोमीटर अंतराच्या टप्प्यामध्ये दोन्ही भुयारी मार्गांना जोडणारा `कनेक्टिंग’ भुयारी मार्ग तयार झाला आहे. आतील भागात यू टर्न घेणाऱया वाहनांसह अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्यासाठी या जोड भुयारी मार्गाचा वापर होणार आहे. बोगद्यामध्ये प्रकाश व सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावर आताच्या पाऊण तासाऐवजी अवघ्या 10 मिनिटांमध्ये हे अंतर पार होणार आहे.
बोगद्याबाबत ठळक बाबी…
तीन मार्गिकांचे दोन बोगदे.
पावणेदोन कि.मी.च्या बोगद्यात पाच अंतर्गत पूल.
457 कोटेंचा खर्च.
अत्याधुनिक बुमर खोदयंत्राचा वापर.
यु-टर्न, आपत्कालीन मदतीसाठी जोड भुयारे.
दोन्ही बाजूनी एकाचवेळी काम सुरु.
300 मजुरांची अहोरात्र मेहनत.