लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्र पूर्ततेसाठी कालावधी वाढवून मिळावा…
मातृत्व आधार फाउंडेशनची मागणी: तहसीलदारांना निवेदन सादर..
मालवण
राज्यशासनाकडून लागू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी शासनाने जी कागदपत्रे अर्जासोबत जोडावयास सांगितली आहेत त्यातील अधिवास प्रमाणपत्र, कुटुंब प्रमुख उत्पन्न दाखला यासारखी कागदपत्रे मिळविण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केल्यानंतर ती कागदपत्रे प्रशासनाकडून अर्जदाराला देण्याचा कालावधी हा अर्ज दाखल केल्यापासून पंधरा दिवसांचा आहे त्यामुळे या योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दिलेला १५ दिवसांचा कालावधी हा अपुरा असून या कालावधीत महिला सर्व कागदपत्रे पूर्ण करू शकत नाहीत, त्यामुळे या योजनेसाठी कागदपत्रे देण्याचा कालावधी वाढवून मिळावा, अशी मागणी मालवण मधील मातृत्व आधार फाउंडेशन या या संस्थेतर्फे मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मातृत्व आधार फाउंडेशन संस्थेतर्फे तहसीलदार वर्षा झाल्टे यांना लाडकी बहीण योजनेबाबतच्या मागण्यांचे निवेदन मातृत्व आधार फाउंडेशनचे दादा वेंगुर्लेकर, ममता तळगावकर, दिक्षा लुडबे, सुनीता वालावलकर, सारिका हडकर, छाया लुडबे, सचिन मातोंडकर आदीनी दिले . यावेळी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे हे ही उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री, माझी लाडकी बहिण योजना लागू केली आहे. याद्वारे लाभार्थी महिलांच्या बँक अकाउंट मध्ये दरमहा १५०० रुपये जमा केले जाणार आहेत. या योजनेसाठी कागदपत्रे जमा करण्याची मुदत १ ते १५ जुलै अशी देण्यात आली आहे. लाभार्थ्यांना आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, जन्म दाखला, कुटुंब प्रमुख उत्पन्न दाखला, बँक पास बुक, पासपोर्ट फोटो, रेशन कार्ड अशी कागद पत्रे द्यावी लागणार आहेत. मात्र १५ दिवसांच्या कालावधीत महिला ही सर्व कागदपत्रे जमा करू शकत नाहीत. त्यामुळे हा कालावधी वाढवून मिळावा. तसेच ही योजना अधिक प्रभावी आणि तत्परतेने लागू होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये सूट किंवा त्या ऐवजी दुसरे प्रमाणपत्र मान्य होणे आवश्यक आहे. जन्म प्रमाणपत्र ऐवजी लिविंग सर्टिफिकेट वरील जन्मतारीख व आधारकार्ड वरील जन्मतारीख प्रमाण मानण्यात यावी, उत्पन्नाचा दाखला आणि अधिवास (राष्ट्रीयत्वाचा) दाखला दोन दिवसात महिलांना उपलब्ध व्हावा, अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. या योजनेच्या लाभासाठी मातृत्व आधार फाउंडेशन मदत करेल असेही यावेळी संस्थेच्या सदस्यांकडून सांगण्यात आले.