भाजपा कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे…
वैभववाडी
भविष्यात महाविकास आघाडी असली तर कणकवली विधानसभा निवडणूक राष्ट्रीय काँग्रेस पक्ष लढवेल. याची जाणीव भाजपा कार्यकर्त्यांनी ठेवून आतापासून कामाला लागावे. सर्वांनी पक्ष वाढीसाठी काम करुया. ग्रामपंचायती तुमच्या हक्काच्या व्यक्तीकडे द्या. असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना केले.
वैभववाडी येथील पक्ष कार्यालयात शुक्रवारी ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या २८ सदस्यांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, सभापती अक्षता डाफळे, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, दिलीप रावराणे, अरविंद रावराणे, राजेंद्र राणे, रितेश सुतार, प्राची तावडे, हर्षदा हरयाण, भारती रावराणे, स्नेहलता चोरगे, किशोर दळवी, हुसेन लांजेकर, बाळा हरयाण व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, खरा प्रतिस्पर्धी म्हणून यापुढे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे पहावे. विधानसभा निवडणुकीत भाजपची प्रमुख लढत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाबरोबर होईल. सन २०१९ पासून वैभववाडी भाजपाचे सांघीक काम पाहून निश्चितच समाधान वाटते. ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचे श्रेय सर्वांनी घेतले पाहिजे. जल्लोष केला पाहिजे. अशा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना आहेत. १३ सरपंच भाजपाचे निवडून येतील यात शंका नाही. चांगले निकाल निश्चित वैभववाडीत पक्षाला मिळतील. केंद्र शासनाने शेतकरी कायदा केला. याच्या समर्थनात या निवडणुका आपण जिंकत आहोत. कष्टकरी शेतकरी पंतप्रधान मोदींबरोबरच. हा संदेश या निवडणुकीतून आपण सर्वांनी देऊया असे सांगितले. सर्वांनी पक्षवाढीसाठी काम करूया. ग्रामपंचायती तुमच्या हक्काच्या व्यक्तीकडे द्या. कोव्हीड चा अनुभव जनतेसमोर ठेवा. राज्यशासनाने कोरोना सारख्या महामारीत जनतेला कसे वाऱ्यावर सोडले. हे जनतेसमोर कार्यकर्त्यांनी सांगितले पाहिजे. जिल्ह्यात वैभववाडीत एक क्रमांकाचा निकाल लागेल असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.