You are currently viewing करंजे नदीपात्रात कामाच्या नावाखाली बेसुमार उत्खनन

करंजे नदीपात्रात कामाच्या नावाखाली बेसुमार उत्खनन

आमदार वैभव नाईक यांनी केली नदीपात्रातील माती उत्खननाची पाहणी

नदीपात्रा खालील गावांना पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता

पर्यावरण, जलसंधारण मंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

कणकवली तालुक्यात फोंडा – जानवली नदीवर करंजे साठवण तलाव कामाच्या ठिकाणी नदीपात्रातच हजारो क्यूबिक उत्खनन करून हे उत्खनन केलेली माती व दगड नदीपात्रात पसरून ठेवण्यात आली आहे. यामुळे नदीपात्रा खालील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्याचबरोबर या नदीपात्रातील माती मुळे मोठ्या प्रमाणावर गाळ नदीपात्रातून वाहून खाली गेल्याने नदीपात्रातील जलसंपदा ही नष्ट होणार आहे. याबाबत या उत्खनन केलेल्या घटनास्थळी भेट देत आमदार वैभव नाईक यांनी मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. शासन नदी पात्रातील गाळ उपसा करण्याकरिता कोट्यावधी रुपयांचा निधी देत असताना जर अधिकारीच अशाप्रकारे नदीपात्रात गाळ पसरून ठेवत असतील तर या संपूर्ण प्रकाराला जबाबदार कोण असा सवाल श्री नाईक यांनी केला. यावेळी अधिकाऱ्यांनी गाळ उपसा करण्यास सुरुवात करतो असे सांगताच आमदार वैभव नाईक यांनी पाऊस सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले, असताना हे काम कसे पूर्ण होणार? असा सवाल आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला. याप्रश्नी राज्याचे पर्यावरण मंत्री, जलसंधारण मंत्री व जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधत याप्रकरणी चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आल्याची माहिती श्री नाईक यांनी दिली.

मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून करंजे येथे फोंडा – जानवली नदीपात्रात साठवण तलाव होत असून या साठवण तलावात करिता नदीपात्रातच मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आले आहे. या संदर्भात आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी या कामाच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक भूषण परुळेकर, युवासेना उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर, नितीन राऊळ यांच्यासह मृद व जलसंधारण विभागाचे उपअभियंता संतोष शिरोडकर उपस्थित होते. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर केलेल्या उत्खननाची पाहणी केल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी श्री शिरोडकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. थेट नदीपात्रातच सुमारे 20 हजार क्युबिक पेक्षा जास्त केलेल्या उत्खननामुळे नदीतील पारंपरिक जलस्रोत नष्ट होत नैसर्गिक नैसर्गिक जलसंपदेचे नुकसान झाले आहे. तसेच या नदीपात्रातील मातीमुळे पावसाळ्यात ही माती वाहून खाली जात या नदीपात्रात खालील करंजे, साकेडी, नागवे, जानवली गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या टाकलेल्या मातीमुळे नदीपात्रातील पारंपरिक जलस्त्रोत व नदीच्या कोंडी देखील बुजणार आहेत. शासन स्तरावरून नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात येत असताना जर अशाच प्रकारे अधिकाऱ्यांच्या समक्ष नदीपात्रातच माती टाकून ठेवली जात असेल व अधिकारी मूग गिळून गप्प बसत असतील तर याला जबाबदार कोण? असा सवाल श्री नाईक यांनी केला.ही गंभीर बाब असून या प्रश्नी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, जलसंधारण मंत्री व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचेही श्री. नाईक यांनी सांगितले. साठवण तलावाचे काम करण्याला कुणाचा विरोध नाही. मात्र अशा प्रकारे जर काम सुरू असलेल्या नदीपात्रा खालील गावांना धोका निर्माण होणार असेल व नदीपात्रा चे पारंपरिक जलस्रोत नष्ट होणार असतील तर ही बाब गंभीर आहे. याप्रश्नी गांभीर्याने दखल घेत तातडीने नदी पात्रातील उत्खनन केलेले माती हटवा अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी श्री शिरोडकर यांना दिल्या. त्यावर श्री शिरोडकर यांनी दोन दिवसात ही उत्खनन केलेली माती हटवतो असे सांगितले. मात्र दोन दिवसात ही माती कशी हटवून होईल? यासाठी डंपर किती लावणार? असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यावर चार डंपर द्वारे माती हटविण्याचे काम सुरू करण्याचे करण्यात येईल असे श्री शिरोडकर यांनी सांगितले. पाचशेहून अधिक डंपर उत्खनन केलेली माती नदीपात्रात टाकलेली असताना ती चार डंपर द्वारे दोन दिवसात कशी काय दूर होणार? असा प्रतिप्रश्न श्री नाईक यांनी केला. तुम्ही तातडीने काम सुरू करा, आम्ही दोन दिवसांनी पुन्हा पाहणी करणार असे श्री नाईक यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा