You are currently viewing _मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग होणार पुन्हा हिरवागार! उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे च्या विद्यार्थ्यांचा अनोखा कुडाळ पॅटर्न

_मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग होणार पुन्हा हिरवागार! उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे च्या विद्यार्थ्यांचा अनोखा कुडाळ पॅटर्न

*_मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग होणार पुन्हा हिरवागार! उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे च्या विद्यार्थ्यांचा अनोखा कुडाळ पॅटर्न_*

कुडाळ

*डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संचलित उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, ता. कुडाळ यांच्यावतीने उद्या रविवार दिनांक ३०जून ला सकाळी११ ते दुपारी ४ या वेळेत मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार असून सकाळी ८ ते १०.३० या वेळेत वृक्ष संवर्धन जनजागृती करण्यासाठी वृक्षदिंडी व पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. यावर्षी अशाप्रकारे अनोख्या पद्धतीने कृषीदिन साजरा करण्यात येणार असल्याबाबतची माहिती उद्यानविद्या महाविद्यालयाचे नुतन सहयोगी अधिष्ठाता डाॅ. प्रफुल्ल माळी यांनी महाविद्यालय मार्फत काढलेल्या प्रसिद्धी पत्रकातून दिलीआहे.*
*मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्वीपासूनच सावली देणारा मार्ग म्हणून सर्वदूर विख्यात होता. तात्कालीन महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठमोठे वृक्ष होते, पण नविन चौपदरीकरण कामात हजारो मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले नव्हे तर त्यांची कत्तलच करण्यात आली. या महावृक्षतोडीमुळे महामार्गावरील सावली नष्ट झाली आणि पर्यावरणाच्या साखळीलाही धोका निर्माण झाला. नियमानुसार जितके वृक्ष तोडले तेवढे वृक्ष पुन्हा लावण्याची जबाबदारी असते, मात्र ती अद्यापही पूर्ण न झाल्याने मुळदे महाविद्यालयाच्या विद्यर्थ्यानी या महमार्गावर वृक्षारोपण करण्याकरीता पुढाकार घेतला आहे. महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम जेव्हा सुरू केले होते तेव्हा या संपूर्ण कामामध्ये महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या महाकाय वृक्षांचा पहिला बळी गेला होता व यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या डोक्यावरची सावली नष्ट झाली होती व त्यामुळे महामार्गावर थांबून थोडा वेळ आराम करता येईल, अशी परिस्थिती सध्या राहिली नाही. वृक्षतोड व सिमेंटीकरण यामुळे महामार्गावर प्रचंड उष्णता निर्माण झाली आहे. हाच मुद्दा लक्षात घेऊन वृक्षलागवडीची ही मोहीम राबविण्यात येणार आहे. कुडाळ बेलनदी ते पिंगुळी पर्यंत पाच किलोमीटर अंतरावर व कुडाळ बेलनदी ते वेताळ-बांबर्डेतिठा पर्यंत पाच किलोमीटर अंतरावर असे एकूण दहा किलोमीटर अंतरावर ही वृक्ष लागवड रस्त्याच्या दुतर्फा करण्याचा संकल्प उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी सोडला आहे. या मोहिमेमध्ये महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी व कुडाळ शहरातील प्रतिष्ठीत नागरीक विद्यार्थ्यांसोबत सहभागी होणार आहेत. वृक्षलागवड कार्यक्रमा अंतर्गत कदंब, शीसम, कांचन, बेहडा, करंज ,अर्जुन, बांबू ,उंबर, कोकम, पिंपरी, पिंपरन, चिंच, आवळा, अशोक ई. विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात येणार आहेत व भविष्यात या रोपांची जोपासनाही विद्यार्थी करणार आहेत. राष्ट्रीय महामार्गावर पर्यावरण संतुलन आणि पर्यावरण जागरूकता वृक्षलागवड आणि जोपासना या माध्यमातून करण्याचा अभिनव उपक्रम विद्यार्थी दशेतच सुरू करून उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न या निमित्ताने करीत आहेत हे विषेश!*

प्रतिक्रिया व्यक्त करा