*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूहाच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हिरवा मृदगंधी नजारा*
रिमझिम रिमझिम पाऊस धारा
हिरवा ओलेता मृद् गंधी नजारा||धृ||
निळ्या आभाळी सावळ मेघांची दाटी
सुरेख नर्तन ते बिजलीचे पाठी
शीळ घालीत घुमतो,बनांत वारा
हिरवा ओलेता मृद् गंधी नजारा||१||
इंद्र धनुची कमान नभी देखणी व्योमकेशी विहरती,पक्षी पक्षिणी
सोनकवडशांचा खेळ चाले सारा
हिरवा ओलेता मृद्ग गंधी नजारा||२||
भिजल्या वेली नि भिजले तरूवर
सुस्नात धरणी,प्रसन्न चराचर
गवत फुलांचा हा रंगीत पसारा
हिरवा ओलेता मृद् गंधी नजारा||३||
धुंदावे तरूणाई,नाचे तनमन
आनंदाने फुलतो,क्षण न् क्षण
उमटतो रोमांचक गोड शहारा
हिरवा ओलेता मृद् गंधी नजारा.||४||
सृजनाचे लेणे लेवूनी अवनी
नटली सजली,लाजली धरणी
तृप्त होऊनी,भरला मनगाभारा
हिरवा ओलेता मृद् गंधी नजारा||५||
सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर