उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा नऊ गडी राखून पराभव करत दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरी गाठली*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आज सकाळी टी२० विश्वचषक २०२४ चा पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ११.५ षटकांत १० गडी गमावून ५६ धावा केल्या. या धावसंख्येवर सर्वबाद होणे ही टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील कोणत्याही संघाची सर्वात कमी धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने ८.५ षटकांत १ गडी बाद ६० धावा केल्या आणि चालू स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. सध्याच्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि भारत हे दोनच संघ आतापर्यंत अजिंक्य आहेत.
५७ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का फजलहक फारुकीने पाच धावांवर दिला. त्याने क्विंटन डी कॉकला त्रिफळाचीत बाद केले. यानंतर रीझा हेंड्रिक्स आणि एडन मार्कराम यांनी सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची नाबाद भागीदारी झाली. सलामीवीर हेंड्रिक्सने २८ आणि कर्णधार मार्करामने २३ धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी २०१४ मध्ये ते उपांत्य फेरीतूनच बाहेर पडले होते. भारताविरुद्धचा सामना जिंकून श्रीलंकेने विजेतेपदावर कब्जा केला. त्याचवेळी २००९ मध्येही दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीतून बाहेर पडली होती.
पहिल्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर केवळ ५७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात अफगाणिस्तानच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही आणि संपूर्ण संघ विरोधी गोलंदाजांसमोर पत्त्याच्या घरासारखा कोसळला. अजमतुल्ला उमरझाईने संघाकडून सर्वाधिक म्हणजे १० धावा केल्या. उर्वरित फलंदाजांपैकी एकाही फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्यांच्याकडून मार्को जॅनसेन आणि तबरेझ शम्सीने प्रत्येकी तीन बळी घेतले. त्याचवेळी कागिसो रबाडा आणि ॲनरिक नोर्टजे यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला उपांत्य सामना ९ गडी राखून जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. यासह संघाने चोकर्सचा डाग स्वतःच पुसून टाकला. आफ्रिकन संघ अंतिम फेरीत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. २९ जून रोजी बार्बाडोसमध्ये अंतिम सामना होणार आहे. ३२ वर्षात प्रथमच दक्षिण आफ्रिकेने आयसीसी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. यापूर्वी, संघाने आठ वेळा (१९९२, १९९९, २००७, २००९, २०१४, २०१५, २०२३, २०२४) उपांत्य फेरी गाठली होती जिथे त्यांना सहा वेळा पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचवेळी १९९९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेला सामना बरोबरीत सुटला होता.
मार्को जॅनसेनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.