You are currently viewing जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय

फसवणूक करणाऱ्या विकासकास नुकसान भरपाईचे आदेश

सिंधुदुर्गनगरी

एस. डेव्‍हलपर्स अॅंड बिल्‍डर्सचे सागर संपत ढोपे यांनी सन 2017 मध्‍ये मिशन हयूमन पार्क या नावाने कोकणातील मालवण तालुक्‍यात एक गृहनिर्माण प्रकल्‍प सुरु करणार असलेबाबतची जाहिरात दिली.  जाहिरातीमधून त्‍यांनी बिनशेती आणि नगररचना कार्यालयाकडून मंजूर केलेले ओपन प्‍लॉट खरेदी करुन त्‍यावर स्‍वतःच्‍या आवडीचा बंगला बांधुण त्यामध्ये अनेक आकर्षक सोयीसुविधा सुध्‍दा उपलब्‍ध करुन दिल्‍या जाणार आहेत व ते ही अगदी कमी पैशात अशी जाहिरात होती.

या जाहिरातीवर विश्‍वास ठेऊन सौ. सुप्रिया सुधिर कदम, सौ. अपुर्वा अनंत लोटणकर व अनंत लोटणकर, भानुदास कुबल व तानाजी पडवळ यांनी एस.डेव्‍हलपर्स अॅंड बिल्‍डर्स यांच्याकडून मौजे – कुंभारमाठ, ता. मालवण येथील रेखांकनामधील 490 चौ.मी. चा भूखंड खरेदी केला.   त्‍यानंतर या भूखंडावर स्‍वतंत्रपणे बंगले बांधून देतो असे विकासक सागर ढोपे यांनी सांगितले.  त्‍यांचे शब्‍दावर विश्‍वास ठेऊन सौ. सुप्रिया सुधिर कदम यांनी घर बांधण्यासाठी रु.8 लाख 50 हजार  सागर ढोपे यांना अदा केले. त्‍याचप्रमाणे अनंत लोटणकर व त्‍यांच्‍या पत्‍नी सौ. अपुर्वा लोटणकर यांनी सागर ढोपे यांना रु.2 लाख  माहे सप्‍टेंबर 2017 ते डिसेंबर 2017 या कालावधीत अदा केले.  मात्र त्‍यानंतर सागर ढोपे घर बांधणीचे कोणतेही काम केलेले नाही.  त्‍यामुळे सौ.सुप्रिया कदम व श्री. लोटणकर यांनी श्री. ढोपे यांना नोटीस पाठविली, मात्र त्‍यास योग्‍य प्रतिसाद न दिल्‍याने त्‍यांनी जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, सिंधुदुर्गमध्‍ये दोन स्‍वतंत्र तक्रार अर्ज दाखल केले.

त्यानंतर सागर ढोपे यांना नोटीस मिळूनही ते हजर झाले नाहीत. आयोगाने दोन्‍ही तक्रारींचे कामी साक्षीपुरावे नोंदवून दि.10 जून 2024 रोजी  आदेश केला.  त्‍या आदेशानुसार सागर ढोपे यांनी सौ. सुप्रिया कदम यांना रु. 8 लाख 40 हजार आणि अनंत लोटणकर यांना रु. 2 लाख या मोबदल्‍यापोटी घेतलेल्‍या रकमा तसेच त्‍यावर 9 टक्के व्‍याज अदा करणेचा तसेच नुकसान भरपाईपोटी दोन्‍ही तक्रारदारांना प्रत्‍येकी रु.70 हजार देण्‍याचा आदेश केलेला आहे. नुकसान भरपाईची रक्‍कम आदेशापासून 45 दिवसांत अदा न झाल्‍यास त्‍या रकमेवर सुध्‍दा 9 टक्के व्‍याज अदा करावे असेही आदेशीत करण्‍यात आले आहे. जिल्‍हा आयोगाच्‍या आदेशाची पुर्तता सागर ढोपे यांनी केली नाही तर तक्रारदार यांना स्‍वतंत्रपणे अंमलबजावणीचे प्रकरण दाखल करण्‍याची मुभा असणार आहे.  या प्रकरणी जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्‍या  अध्‍यक्ष  श्रीमती इंदुमती मलुष्‍टे, सदस्‍य  योगेश खाडिलकर, सदस्‍या – श्रीमती अर्पिता फणसळकर यांनी आदेश केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा