*बांगलादेशचा आठ धावांनी पराभव*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
टी२० विश्वचषकातील शेवटचा सुपर-८ सामना अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सेंट व्हिन्सेंटच्या अर्नोस वेल मैदानावर खेळला गेला आणि अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा संघ हा सामना ८ धावांनी हरला असून अफगाणिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे.
अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यासह ऑस्ट्रेलियन संघ टी२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. बांगलादेश संघावर ऑस्ट्रेलियाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. कमी धावसंख्येच्या या सामन्यात एका क्षणी बांगलादेश केवळ पात्रच होणार नाही तर अफगाणिस्तानलाही हुसकावून लावेल असे वाटत होते. याचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला असता, पण अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले, विकेट्स घेतल्या आणि विजय मिळवला. आता २७ जूनला पहिल्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना इंग्लंडशी होणार आहे.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाला २० षटकांत ५ गडी गमावून ११५ धावा करता आल्या. यानंतर बांगलादेशचा संघ फलंदाजीला आला तेव्हा पावसाने अनेकदा व्यत्यय आणला. बांगलादेशला विजयासाठी २० षटकात ११६ धावा करायच्या होत्या. मात्र, अफगाणिस्तानने ठराविक अंतराने विकेट घेतल्या. तनजी हसन (०), कर्णधार नजमुल हुसेन शांतो (५) आणि शाकिब अल हसन (०) यांना विशेष काही करता आले नाही. यानंतर राशिद खानची जादू पाहायला मिळाली. त्याने सौम्या सरकार, तौहीद हृदयॉय, महमुदुल्लाह आणि रिशाद हुसेन यांना तंबूमध्ये पाठवले.
मात्र, लिटन दास एक बाजू लढवत उभा राहिला. त्याने आपल्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ११ वे अर्धशतक झळकावले. पावसामुळे सामना मध्यंतरी थांबवण्यात आला आणि पंचांनी एक षटक कमी केले. डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशला १९ षटकांत ११४ धावांचे लक्ष्य मिळाले. बांगलादेशने ८० धावांत ७ विकेट गमावल्या होत्या. गुलबद्दीन नायबने तनजिम हसन शाकिबला तंबूमध्ये पाठवताच सामना अधिकच रोमांचक झाला. लिटन दास आणि तस्किन अहमद खेळपट्टीवर होते. लिटन हा सामना जिंकेल असे वाटत होते. बांगलादेशला शेवटच्या १२ चेंडूत १२ धावांची गरज होती. नवीन उल हक गोलंदाजीला आला आणि त्याने सलग दोन चेंडूंवर तस्किन अहमद आणि मुस्तफिझूर रहमान यांना तंबूमध्ये पाठवून अफगाणिस्तानला विजय मिळवून दिला आणि उपांत्य फेरीत नेले.
नवीन उल हकला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.