You are currently viewing माझे गाव कापडणे

माझे गाव कापडणे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*२२) माझे गाव कापडणे…*

(सुया भिलावा घे ग मायऽऽऽऽऽ)

 

काल मी एक व्हिडिओ पाहिला नि एकदम पुन्हा बालपणात गेले. फार छान बनवला आहे

त्यांनी त्या जुन्या गाण्याचा व्हिडिओ..

 

“दाताचं दातवन घ्या ग कुणी

कुंकू घ्या कुणी काळं मणी…

बाई.. सुया घे ग दाभण घे…”

 

गेलात ना तुम्ही पण भूतकाळात! मी तर लहानशी अशी ओट्यावरच गेले. डोक्यावर हात न लावता छान बसवलेली ती रंगीबेरंगी कपड्याची शिवलेली ती विशिष्ट पोतडी, हातात रंगीत पोतीच्या माळा, कडेवर तान्हं मुल, हातात कुत्र्यांपासून संरक्षणार्थ असलेली बारिकशी काठी व खणखणीत आवाजात..

“बाई सुया घे, भिलावा घे, पोत घे, दाभण घे

गऽऽऽऽऽ बाई” म्हणत जाणारी,कपाळाला

भलंमोठ कुंकू लावलेली हसतमुख काळीसावळी स्त्री रस्त्याने चालतांना व कोणी आपल्याला बोलावते आहे का याचा कानोसा घेत चालतांना दिसू लागली व मी जणू ओट्यावर धावलीच!

 

अक्का, अक्का.. सुया भिलावावाली उनी दखं.. “बलाव ना मंग तिले”,असे अक्काने सांगताच मी तिला बोलावले.असे दारात कुणी आले म्हणजे आम्हा बालगोपालांची मजा असे. ती जोतऱ्यावर कडेने बसली की तिने पोतडी उघडायची व मग त्या पोतडीत काय काय खजिना आहे तो आम्ही अगदी जवळ जाऊन बघणार. त्यात सुया, वेगवेगळ्या प्रकारच्या व आकाराच्याही, छान पातळ कागदात बांधलेल्या अशा, दाभण, एका बाजूला बिब्बे, हातातल्या छोट्याशा काठीला बांधलेल्या काळ्या पोतीच्या जाड बारीक मण्यांच्या माळा, त्यातच काचेच्या हिरव्या, पिवळ्या रंगीत खड्यांच्या माळा पाहून जीव कसा हरखून जायचा. अक्का, ले ना ह्या मणी मनकरता? म्हणत मी अक्काच्या मागे लागणार. “दम ना जराशी बाई” सुया भिलावा

लिवू दे पहिलेंग, दम जराशी.. मग मी ती खरेदी

बघत थांबणार. बारीक, जाड सुया, २/४ दाभण

जे शेतकऱ्यांना नेहमीच पोते शिवायला लागतात, थोडे बिब्बे, पायात काटा गेला की

त्या बिब्याला सुईने टोचून तो दिव्यावर गरम

करून त्याचा चटका काटा काढलेल्या जखमेवर द्यायचा, हाईहुई करत उड्या मारतच

तो द्यावा लागायचा, गरम असायचा ना? पण

चटका दिला की जागा दुखणे बंद, इतका गुणकारी! (गुळ गरम करूनही असा चटका देत असत).

अशा बिब्यांची व मग मला पाहिजे असलेल्या

मण्यांची खरेदी होई.मग काय? आम्ही एकदम खुश! तेवढ्यात शेजारच्या न्हानमाय, काकुजी पण येऊन बसत.कधी कधी बिब्याची गोड लागणारी फुलं ही मिळत, ते ही अक्का घेई.

जवळ जवळ तासदीडतास यात सहज जाई.

मग ती म्हणे, जरासा भाकरतुकडाबी देवो माय.

मग अक्का बाजरी बरोबर भाजीभाकर तिच्या

ओटीत घालत असे. मंडळी, हा सारा प्रसंग आताही मी ओट्यावर बसून बघते आहे.

 

दारावर आलेल्या अतिथीची भुक सहज भागवली जायची. पाणी पिऊन तृप्त मनाने

तोंडभर हसत आशीर्वाद देत ती हसायची. तोवर बरीच गर्दी होऊन तिची बरीच विक्री व्हायची. किती प्रेम सहजता सौहार्द होते हो

प्रत्येकाच्याच वागण्यात! ना भेद ना भाव ना संकोच? प्रसन्न मनाने एखादी फणी कंगवा

ती सहज देवून जायची. उवांसाठी बारीक फणी हमखास साऱ्याजणी घेत असत. तो सारा “सोहळा याची देही याची डोळा” आताही मी अनुभवला पहा, इतका तो सत्तर वर्षांपूर्वीचा

प्रसंग माझ्यासमोर जीवंत उभा राहिला आहे.

कसं असतं ना माणसाचं मनं? सारं कसं एखादा

चित्रपट पहावा तसं नजरेसमोर दिसतं नि मन कसं प्रफुल्लीत होऊन जातं.

विशेष म्हणजे ह्या सुयाभिलावा ठेवण्याची आमच्या घरात खास जागा होती. त्याला काय म्हणत ते मला

आता आठवत नाही. तुम्हाला आठवते का पहा.

आमच्या स्वयंपाकघरात दोनही खांबांना अगदी छताला थोडे अंतर ठेवून एखादी टोपली

टांगलेली असावी अशी त्या खांबातच व्यवस्था

होती. आम्ही खांबाला पायाची मिठी घालून दोन्ही हातांनी वर वर चढत जाऊन त्या टोपलीत ह्या सुयाभिलावा दाभण ह्या वस्तू ठेवलेल्या असत त्या काढत असू. ती मिठी हाताने घट्ट करत त्या उंचावरून हात घालून ह्या वस्तू आम्ही सहज काढत असू.ती जागा ठरलेली असल्यामुळे कधी शोधाशोध करावी लागत नसे. हात घातला की बिब्बे, दाभण सापडायचे.

किती छान व्यवस्था होती पहा…

 

ही मंडळी कोणत्या समाजाची होती मला माहित नाही पण त्या जुन्याकाळी बाहेरून कुणीही गावात पाल टाकून थांबणार असतील

तर त्यांना गावचे प्रमुख म्हणून आधी गावाबाहेरच थांबून माझ्या वडिलांना वर्दी देत

गावाबाहेर पांढरीत मुक्कामाची परवानगी मागावी लागे. त्या शिवाय पाल ठोकता येत नसत. कारण त्या काळात काही गुन्हे घडले तर त्यांना जबाबदार धरण्यात येई. गावात असे

अगांतुक कोणीही येवो त्यांना मुखियाला माझ्या वडिलांची भेट घ्यावी लागे. त्यांनी परवानगी दिली तरच ते गावाबाहेर पांढरीत मुक्काम करू शकत असत. ही पांढरीची शेतं आमच्या घराच्या मागच्या गल्लीजवळच आहेत. तिथे ८/१५ दिवस मग ही मंडळी मुक्काम करत असत. पुरूष काय व्यवसाय करत माहित नाही पण बायका दिवसभर गांवभर फिरून सुयाभिलावा विकत. रिकामटेकडी पोरे भिक मागत गावाला हैराण

करत असत. काही दिवसांनी त्यांचे पाल उठले की आम्ही बच्चे कंपनी मग त्यांच्या उठलेल्या पालांच्या रिकाम्या जागेत काही सापडते का?

हे शोधत आम्ही फिरत असू. काहीही हाती लागत नसे. हे पुरूष बहुधा “ रोमडी” लावायचे की काय? आठवत नाही. पूर्वी विज्ञान एवढे प्रगत नव्हते. असे गावठी उपचार गावात सर्रास

होत असत. लोक करून घेत असत. जखमेतून दुषित रक्त शोषण्याचा तो प्रकार होता असे वाटते. जखमेला जळवाही लावल्या जात असत. मी तर ह्या लोकांना खूप घाबरत असे.

वंजारी, कंजारी काठीवाले, हिवाळ्यात गहू करायला जाणारे, अशा बऱ्याच लोकांचा गावात कायम राबता असे.पण सारे वडीलांना

भयंकर वचकून असत. त्यामुळे गावात सहसा

गुन्हे घडत नसत. पाठीवर बिऱ्हाड घेऊन फिरणाऱ्या या लोकांविषयी आता विचार करता वाईट वाटते पण तेव्हा कुठे काय कळत

होते? आश्चर्य म्हणजे इतक्या वर्षांनंतरही ही

मंडळी आज ही मुख्य प्रवाहात आली नाही हे

खरोखर खेदजनक आहे. त्याची कारणे काहीही असोत, दोषी कुणीही असोत पण ते

मुख्य प्रवाहात येऊन प्रगतीच्या वाटा त्यांना

सापडायला हव्या होत्या. आजही आपल्याकडे

ऊसतोड कामगारांची ससेहोलपट चालूच आहे,

इतके आम्ही निर्ढावलो आहोत. विज्ञानयुगाकडे

जातांना आमची दृष्टी विशाल होण्याऐवजी संकुचित होत चालली आहे का? आम्ही आमच्या कोशातून बाहेर पडून इतरांचे काही देणे लागतो का हा विचार आता करायलाच हवा आहे. त्या शिवाय ही दरी कमी होणे शक्य नाही.

मंडळी, लिहिण्यासारखे खूप आहे. आपण ते

वाचणारच आहात, आता पुढच्या रविवारी भेटू

या..आपला महाराष्ट्र मध्ये…

 

धन्यवाद…

 

जयहिंद.. जय महाराष्ट्र…

 

आपलीच,

प्रा.सौ.सुमती पवार.नाशिक.

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा