You are currently viewing बाप…

बाप…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालीत्य नक्षत्रवेल समूहच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम लेख*

 

*बाप…*

 

ती.स्व.बाबा …

शि. सा. न. वि. वि.

 

बाबा, तुमच्या नावामागे स्व. लिहावं लागल्याला आतां एक तप उलटुन गेलंय, तरीही मन अनेक आठवणींच्या कल्लोळात बुडुन जातंय. माझ्या बालपणापासून ते तुम्हीं असेपर्यंत पाहिलेली तुमची अनेक रूपं डोळ्यांसमोर फेर धरून नाचताहेत.

 

बालपण मुंबईच्या टोकाच्या उपनगरी-निसर्गरम्य मानखुर्दला…

आणि नंतर नासिक जिल्ह्यातील नांदगाव ह्या तालुक्याच्या ठिकाणी…

 

आपल्या जेमतेम आर्थिक परिस्थितीत तुमच्या कष्ट करण्याच्या आणि ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ अशा समाधानी वृत्तीमुळे आणि आईच्या ‘कोंड्याचा मांडा करण्याच्या कलेमुळे आम्हीं सात भावंडं त्या परिस्थितीतही मजेत होतो.

ते संस्कार आम्हांला पुढील आयुष्यातही उपयोगी पडले. आमच्या शिक्षणासाठी मात्र तुम्ही कुठेच तडजोड केली नाही.

 

बाबा…मध्यमवर्गीय, सर्वसाधारण परिस्थितीतल्या आणि पाठोपाठ मुली असणाऱ्या आईबापांसाठी मुलीचं लग्न हा ५० वर्षांपूर्वी चिंतेचाच विषय होता. तुमच्या प्रयत्नांना काळजीची किनार दिसायला लागली होती. माझ्या स्वप्निल

भावनांच्या उड्डाणाला तुमच्या एका पत्रानं वास्तवाचं भान आलं आणि तुम्ही माझ्यापुरते तरी चिंतामुक्त झालात.

पित्याचं कर्त्तव्य पार पाडल्याच्या समाधानाबरोबरच लाडकी लेक दुरावण्याचं दु:ख तुमच्या डोळ्यांत दाटुन आलं होतं. पण नंतर आपली लेक सुखात आहे हे बघुन आपलं कन्यादान सार्थकी लागलंय याचं समाधान तुमच्यासाठी खूप मोठं होतं.

 

यथावकाश आम्हा भावंडांच्या वाढत्या संसारामुळे घराचं गोकुळ झालं होतं. आतां तुम्हीं आपल्या निवृत्त आयुष्यांत आराम करावा असंच सर्वांना वाटे.

आतापर्यंत आम्हींही आजी-आजोबा झालो होतो आणि तुम्हीं दोघं पणजी- पणजोबा. पण वयाची ऐंशी वर्षं उलटुन गेल्यानंतरही तुम्हीं स्वत:ची कामं स्वत:च करत होतात.

 

मला आठवतं बाबा…एकदा माझ्या नातवाच्या बाललीला पाहुन तुम्हीं म्हणाला होतात…’आक्का, हे खरं चैतन्य…सळसळत्या पालवीसारखं… आमच्यासारखी माणसं म्हणजे पिकली पानं…’

 

बाबा…तुमच्या कष्टप्रद बालवयात दोन वेळच्या जेवणाची सोय स्वत:लाच करावी लागल्यामुळे असेल, तुम्हीं अन्नदेवतेचा अपमान कधीच केला नाही किंवा दुसऱ्या कुणी केलेलाही तुम्हांला आवडलं नाही. कदाचित् त्याच कारणामुळे अन्नदानावर तुमचा विशेष भर असावा. दारी आलेला याचक असो किंवा गाय, कुत्रा, मांजर असे प्राणी…चिमण्यांसाठी तर एक अक्षयपात्र खास विकत आणलेल्या तांदळाने अखंड भरलेले असे. म्हणूनच तुम्ही गेल्यानंतर चिमण्या फिरकल्या नाहीत बिलकुल…हीच सहृदयता गुरुकुलांतील-निवासी होस्टेलमधील विद्यार्थ्यांप्रती दिसुन येई.

 

जो धर्माची तत्वं फक्त इतरांनाच न सांगता स्वत:ही आचरणांत आणतो तो खरा धार्मिक ह्या तुमच्या तत्त्वांनुसार तुम्हीं आयुष्यभर वागलांत. सत्त्याऐंशी वर्षांच्या आयुष्याच्या उत्तरार्धांत तुम्हीं स्वत:पुरता अत्यंत सिमित परिग्रह ठेवुन खाण्यापिण्यावरही निग्रहाने नियंत्रण ठेवले होते.

 

बाबा…वयोमानानुसार तुमची तब्येत पूर्वीइतकी साथ देत नव्हती. पण अखेरच्या दिवशी तुम्हांला जणुं मृत्यूची चाहूल लागली होती आणि त्याक्षणी तुम्हांला कुठलेही मोहपाश नको होते. पूर्ण सावध अवस्थेत, नामस्मरण करत, निर्विकल्प होऊन तुम्हीं शांतपणे झोपी गेलांत…पुन्हां न उठण्यासाठी…आमच्या डोक्यावरची वटवृक्षाची सावली कायमची नाहीशी झाली होती.

 

बाबा…टेलीफोनचा जमाना सुरु होण्यापूर्वी आपण एकमेकांना कित्ती पत्र लिहित होतो. पोष्टमनची आतुरतेने वाट पहाण्याचे ते दिवस…आतां मी हे पत्र लिहिलंय खरं, पण तुमचा पत्ताच माहीत नाही मला. हे मला माहीत नव्हतं असं नाही, पण मला तुमच्याबद्दल काय वाटत होतं ते तुम्हांला एकदा सांगायचंच होतं…आतां फार उशीर झालाय हे कळत असुनही… त्यामुळे ‘तुम्हांला’ लिहिलेलं हे पत्रही मलाच जपुन ठेवावं लागेल…पण तुमच्यापर्यंत तुमच्या लाडक्या लेकीच्या भावना पोहचतीलच…हो नं बाबा…???

तुमची लेक…

भारती

_______________________

 

 

श्री

ती. स्व. दादा

शि.सा.न.वि.वि.

 

दादा…लग्नात माझ्या बाबांनी कन्यादान केलं आणि मान वळवून ते डोळे टिपत असतांना ‘तुमची लेक आमची सून झाली आता, तरीही ती सुखात राहिल, काळजी करू नका’ अशा शब्दात तुम्ही त्यांना आश्वासन दिलंत आणि नुसतं दिलंच नाही तर ते जन्मभर पाळलंही.

 

पन्नास वर्षांपूर्वीचा तो काळ…’हो सुने घरासारखी’ असं म्हणण्याचा…आणि अपवाद वगळता सुनेनं ते ऐकण्याचाही…माहेरपेक्षा सर्वस्वी भिन्न वातावरणातील सासर…जुळवून घेतांना बऱ्याचदा चुका व्हायच्या…बहुधा

भितीनेच…आणि मग आईंचा शाब्दिक मार ऐकतांना डोळ्यांवाटे गंगा-यमुना वहायच्या. अशावेळी तुमचं संथ स्वरातलं समजुतीचं एकच वाक्य वातावरण आणि मनही शांत करायचं.

 

दादा…प्रथमतः आमच्याकडे क्वचितच येणाऱ्या तुमचं नंतर नातवंडांच्या ओढीने मात्र वारंवार येणं ह्वायला लागलं. त्यांना मांडीवर खेळताना बघून आई लटक्या रागानं म्हणायच्याही…’स्वतःच्या मुलांना नाही खेळवलंत कधीच…’आणि तुम्ही न ऐकल्यासारखे करून सोडून द्यायचे.

अशावेळी मला दिवसभर कामात बुडालेली पाहून मात्र तुम्ही मायेनं काळजीपोटी म्हणायचेत…

 

‘सुनबाई, जरा वेळ काढून थोडी बाहेर हवेशीर जाऊन येत जा, तब्येतीला बरं असतं ते.’ मला अजूनही आठवतात ते शब्द आणि उर भरून येतो माझा.

 

असे अनेक प्रसंग…माझी काळजी घेणारे आणि तुमची समाधानी वृत्ती दर्शवणारे…संयमित खाणंपिणं, नियमित आचरण अशी तुमची आरोग्य पूर्ण जीवनशैली होती. त्यामुळेच अचानक उद्भवलेल्या तुमच्या आजारपणावरही यशस्वीपणे मात करून तुम्हाला दीर्घायुष्य लाभले होते.

 

दादा…आज तुमचं एकेचाळीसावं पुण्यस्मरण आणि फादर्स डे सुध्दा…

तुमच्या आणि बाबांच्या स्मृतीला ही विनम्र शब्दसुमनांजली…

 

तुमची सून नव्हे, लेकच असलेली

भारती

 

 

@भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

प्रतिक्रिया व्यक्त करा