७६ जणांची तकशिम, सुमारे चारशे जुगारी

७६ जणांची तकशिम, सुमारे चारशे जुगारी

७६ जणांची तकशिम, सुमारे चारशे जुगारी

विजयदुर्ग / प्रतिनिधी :-

देशात कोरोनाने हाकाकार माजवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिले काही महिने नसलेला कोरोना गेल्या तीन/चार महिन्यात बऱ्याच प्रमाणात पसरत चालला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच व्यवहार बंद होते, त्याच प्रमाणे जिल्ह्यातील सर्व व्यवहार, आस्थापने, जीवनावश्यक वस्तू वगळता दुकाने सुद्धा बंद होती. गाड्यांची वाहतूकही काही महिने स्थगित होती त्यामुळे अवैध्य धंद्यांवर बऱ्याच प्रमाणात बंधने आली होती. परंतु गेल्या दोन महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुगार अड्डे मात्र मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. कोरोनाच्या महाप्रलयामुळे गर्दी होईल अशी ठिकाणे बंद असताना चार-चारशे लोकांची उपस्थिती असणारे लाखोंचे व्यवहार होणारे जुगारासारखे अनैतिक धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात आहे.

गेले काही महिने बंद असलेले मोठमोठे जुगार अड्डे गेल्या दोन महिन्यांपासून बिनधास्तपणे सुरू झाले आहेत. त्यातच *फणसांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या गावातील जंगलमय भागात दिवसरात्र बिनदिक्कतपणे गेले १५/२० दिवस जवळपास ७६ लोकांची तकशीम असलेला दिवसाकाठी १०/१५ लाखांची उलाढाल होणारा जुगाराचा अड्डा सुरू होता.* सिंधुदुर्गातील जवळपास नावाजलेल्या बऱ्याच गावातील नावाजलेले जुगारी चारशेच्या आसपास लोक या जुगार अड्ड्यांवर आपले नशीब आजमावत होते. मुख्य म्हणजे या गावाच्या मुख्य रस्त्यावर पोलिसांची लाठी कायमस्वरूपी कार्यरत आहे, तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला *जुगार अड्डा हा सिंधुदुर्ग पोलिसांच्या नकळत सुरू होता की आशीर्वादाने हाच प्रश्न आहे*.

बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यांवर जिल्ह्यातील काही गावातील शिवशाहीच्या नावाने उद्योग व्यवसाय करणारे, काही पक्षांचे पदाधिकारी, मोठमोठे जुगारी हजेरी लावत होते. त्यातच एखादा कोरोनाचा संसर्ग झालेला जुगारी आल्यास कित्येक तास धुंदीत जुगार खेळणाऱ्या जुगारीना कोरोनाची बाधा होण्याची जास्त शक्यता असते.

सिंधुदुर्गातील जुगारांच्या मोठमोठ्या अड्ड्यांवर कोणतीही कारवाई न होता त्यांना आशीर्वाद लाभल्यामुळेच अशाप्रकारे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता बळावली आहे. जिल्ह्यातील मोठमोठे जुगारी यात सामील असतातच, परंतु घरदारातील वस्तू विकून, गहाण ठेऊन पैशांच्या आशेने जाणारे गोरगरीब सुद्धा खेळतात. त्यामुळे एखाद्या गरीबास कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्यासाठी मात्र उपचार मिळणे कठीण होऊन बसेल आणि त्यांचा हकनाक बळी जाण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या संकटात सुरू असणाऱ्या या जुगारांच्या अड्ड्यांसाठी जबाबदार कोण?

कोरोनाच्या काळात नाक्यांनाक्यांवर बंदोबस्त ठेवणारे पोलिस या जुगारांच्या अड्ड्यांकडे अनैतिक, अवैद्य धंद्यांकडे कानाडोळा का करत आहेत? या जुगार अड्ड्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक जुगार अड्ड्यांकडे आतातरी गांभीर्याने पाहणार आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा