You are currently viewing आजगाव साहित्य कट्ट्यावर कवितांचा पाऊस

आजगाव साहित्य कट्ट्यावर कवितांचा पाऊस

सावंतवाडी :

 

आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्यावतीने पावसाळी कविता हा कार्यक्रम नुकताच सादर करण्यात आला. साहित्य कट्ट्याचा हा चव्वेचाळीसावा मासिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमाची सुरुवात ओटवणे येथील हरहुन्नरी कलावंत रामदास पारकर यांच्या कवितेने झाली. अचानक भेट दिलेल्या पारकर यांचे सर्व रसिकानी मनापासून स्वागत केले. यावेळी त्यांनी ‘हॅलो, मी पाऊस बोलतोय’ ही कविता सादर केली.

यानंतर एक-एक करून सर्व सदस्यांनी पावसावरील कविता सादर केल्या. सुरुवातीला विनय सौदागर यांनी ‘निर्मितीचो उत्सव’ ही मालवणी कविता सादर केली. शालेय विद्यार्थी रोहित आसोलकर यांने सुधीर गोसावींची ‘पावसा, घे आता पडान’ ही लोकप्रिय कविता सादर केली. कु. सानिया शेख हिने शांता शेळके यांची ‘पावसाच्या धारा येती झरझरा’ ही कविता सादर केली. शिरोडा येथील कवयित्री स्नेहा नारींगणेकर यांनी ‘पावसाळी शब्दशृंगार’ ही स्वरचित कविता; तर फणसखोलचे सोमा गावडे यांनी ‘वचनाला साक्षी’ ही कविता सादर केली. तसेच आरवलीचे भालचंद्र दिक्षित यांनी गदिमांची ‘माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार’ ही कविता सादर केली. साहित्य कट्ट्याचे सदस्य पण आता बदली होऊन जिल्ह्याबाहेर गेलेल्या ईश्वर थडके यांनी आपल्या दोन कविता ऑडिओ स्वरूपात पाठवल्या होत्या. तो ऑडिओ सर्वांना ऐकविण्यात आला. सावंतवाडीचे कवी दीपक पटेकर यांनी लिहिलेली ‘पाऊसधारा’ ही पादाकुलक वृत्तातील कविता स्नेहा नारींगणेकर यांनी रसग्रहणासह सादर केली. यावेळी वृत्तबद्ध कविता लेखनाचा प्रसार करणाऱ्या विजय जोशी तथा विजो यांचा आदरपूर्वक उल्लेख विनय सौदागर यांनी केला. तसेच त्यांच्या कार्यशाळेविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला प्रकाश मिशाळ, एकनाथ शेटकर, विनायक उमर्ये, प्रज्वल नारींगणेकर,अनिता सौदागर आणि यशवंत गिरी हे उपस्थित होते. पावसात पावसाळी कवितांची रंगत वाढविण्यासाठी दिलीप पांढरे आणि प्रसाद पांढरे यांनी या कार्यक्रमाकरीता कांदा भजी आणि चहा उपलब्ध करून दिला होता. शेवटी कट्ट्याचे समन्वयक कवी सौदागर यांनी सादर केलेल्या ‘पाव्स इलो’ या कवितेने या कार्यक्रमाची सांगता झाली.

===================

 

प्रतिक्रिया व्यक्त करा