*लेखिका माणिक नागावे लिखित जागतिक पिता दिवसानिमित्त अप्रतिम लेख*
*बाप आधार…मायेचा*
मानव म्हटलं की घर,कुटुंब, संसार या सर्वांमध्ये तो गुंतलेला असतो.घर एकसंघ ठेवणे महत्त्वाचे असते.हे सर्व घरातील व्यक्तींच्यावर व त्यांना एकत्र बांधणारी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे बाप,बाबा,पिता,वडील होय.घराचे घरपण टिकवणारा व अबाधित ठेवणारा तो एक महत्त्वाचा घटक असतो.ज्याच्या आश्वासक छताखाली सारे निवांत असतात ते छत्र म्हणजे पितृछत्र.
या पितृछत्राबद्दल , बाबांबद्दल लिखाण कमीच झालयं.आईवर सर्वचजण भरभरून लिहतात. आई मायेचा झरा,बाबा रागाचा पारा.असे समीकरणच करून ठेवले आहे. बापांबद्दल अनेक गैरसमज पसरवले आहेत, पण हे सर्व बाबांना समजून न घेतल्याच्या गैरसमजूतीतून होते. वडील रागीट आहेत असे म्हणत असताना त्यापाठीमागची त्यांची भूमिका व भावना जर आपण समजून घेतली तर बाप आपल्याला समजू शकतो.घरात कींवा सगळीकडेच शिस्त ही महत्त्वाची असते ती लावणारा एकच व्यक्ती म्हणजे बाप असतो.व ती लावण्यासाठी त्याला कडकच रहावे लागते.अन्यथा घरं विस्कटून गेली असती.
आईवडील दोघेही एकमेकांना समजून घेतात.संसाराची पारडी समसमान राहण्यासाठी दोघांनाही समतोल सांभाळायचा असतो.वडील रागावले की आई समजूत घालते,शांत करते.त्यामुळे कलह,अशांतता वाढत नाही. बाबा घरात असले की घर कसं भरल्यासारखे वाटते. आपण कीती निर्धास्त असतो.कुठल्याही संकटांची जाणिव आपल्याला होत नाही. सर्व काही कीती सहज, सोपे आहे असे वाटते पण याची खरी सत्यता ,महानता कळते ते पितृछत्र हरपल्यावर.कीती आगतीक होतात सगळे तेंव्हा!!! पदोपदी बाबांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. प्रत्येक गोष्टीत असुरक्षितता, अनिश्चितता वाटत राहते.ज्यांचे पितृछत्र हरपले आहे त्यांना याची जाणीव प्रकर्षांने जाणवते.म्हणून जोपर्यंत आपले बाबा आपल्याजवळ आहेत तोपर्यंतच त्यांचा आदर करायला हवा.त्यांना योग्य तो मानसन्मान द्यायला हवा.
लहान असताना बाबा आपल्याबरोबर कीतीवेळा सहजपणे लहान होतात. आपल्या जास्तीत जास्त गरजा परवडत नसतानाही फक्त आणि फक्त मुलांच्या चेहऱ्यावर हास्य पसरवण्याकरीता भागवत असतात.हे कुठे आपल्याला माहीत असते?पावसाळ्यात, उन्हाळ्यात पावसापासून व उन्हापासून वाचण्यासाठी आपण एखाद्या भक्कम अशा वृक्षाचा कींवा इमारतीचा आसरा शोधतो व निवांत राहतो तसेच आपले बाबा आपल्या आयुष्यात आपल्या निवांतपणाचे छत्र असते.ते आपल्याला आधार देतात. बाबा सगळं काही असतात.आपले मित्र, डॉ., प्रेम करणारे, प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक, प्रसंगी करमणूक करणारे असं सर्व काही असतात.कारण बाबांच असणच सर्व काही सांगून जातं,फक्त ते व्यक्त होत नसतं.पण जेंव्हा हे अव्यक्त व्यक्तीमत्व आपल्यात नसते तेंव्हा मात्र सर्वजण भरभरून व्यक्त होतात.असे आपले अस्तित्व राखून असणारे आपले बाबा,आपले प्राण बाबा,सदैव आपल्यावर मायेची पखरण करणारे छत्र म्हणजे बाबा.सदैव छत्र देणाऱ्या पितृछत्र बाबांना जागतिक पितृ दिनाच्या दिवशी मानाचा मुजरा
मूक साक्षीदार वात्सल्याचा
कर्मसिंधू कर्तव्यनिष्ठतेचा
बाप आधार कुटुंबाचा त्राता
निखळ वाहणारा झरा प्रेमाचा
लेखिका :
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
९८८१८६२५३०