माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे टिकास्त्र
डिसेंबर २०१९ मध्ये सावंतवाडी नगरपालिकेची नगराध्यक्षपदासाठी पोटनिवडणुक झाली आणि गेली २३ वर्षे दीपक केसरकर यांचे प्राबल्य असलेली नगरपालिकेची सत्ता अनपेक्षितपणे भाजपाच्या हातात गेली. शिवसेनेचे नगराध्यक्ष असलेले बबन साळगावकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल करताना नगराध्यक्ष पदाचा राजीनामा होता त्यामुळे सावंतवाडी नगरपालिकेत पोटनिवडणुक होऊन सत्ता बदल झाला होता.
सावंतवाडीत सत्ता बदल झाला आणि गेले वर्षभर नगरपालिकेत सुरू असलेला कारभार पाहून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर प्रचंड संतापले. नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर टिकास्त्र सोडताना सत्ताधाऱ्यांना *उखडे उखडे गॅंग* असे संबोधित उखडे उखडे गॅंगला पुढच्या डिसेंबरमध्ये घरी बसविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे पत्रकार परिषदेत स्पष्ट करत आपली भविष्यातील भूमिका जाहीर केली आहे. स्वतः नगराध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पेललेली असल्याने व सावंतवाडीत विकासकामे केलेली असल्याने गेले वर्षभर सत्ता बदल झाल्यावर नगरपालिकेत सत्ताधारी लोकांनी ज्याप्रकारे कार्यपद्धती चालवलेली आहे त्याने बबन साळगावकर हे उद्दीग्न झाले आहेत. सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडताना *गेले वर्षभर नगरपालिकेत उखडे उखडे गँगने हैदोस घातला आहे, पालिकेत भ्रष्टाचार माजला आहे, या गँगमुळे नागरिक पालिकेत पाय ठेवत नाहीत. या गँगमुळे नागरिक, व्यापारी, यांच्यावर अन्याय वाढला आहे. हा अन्याय सहनशीलते पलीकडे आहे, त्यामुळे या गॅंगला घरी बसविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.*
कालच नगराध्यक्ष संजू परब यांनी वर्षपूर्ती साजरी करताना नगरपालिकेचे पूर्णत्वास गेलेल्या प्रकल्पांचे लोकार्पण केले. परंतु सदरचे प्रकल्प हे दीपक केसरकर पालकमंत्री असताना त्यांनी आणलेल्या निधीतून नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत झालेली होती. त्यामुळे गेले वर्षभर सत्ताधाऱ्यांकडून शहरात विकासात्मक एकही काम न झाल्याने दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेताना ज्यांनी कामे केली त्यांची अवहेलना करत त्यांच्यावरच टीका केल्याने बबन साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत देत आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. पालिका पोटनिवडणुकीपासून गेले वर्षभर बबन साळगावकर हे राजकारणापासून अलिप्त होते. परंतु सावंतवाडीतील जनतेच्या हक्कांवर होणारा अन्याय पाहता कोणीतरी पुढे येणे गरजेचे होते, त्यामुळेच बबन साळगावकर यांनी आपण नागरिकांच्या हितासाठी सक्रिय झाल्याचे सांगितले. बबन साळगावकर यांची आक्रमकता पाहता भविष्यात सावंतवाडी नगरपालिकेत राजकीय संघर्ष अटळ आहे.