You are currently viewing “उंच माझा झोका”….

“उंच माझा झोका”….

“उंच माझा झोका”….

रोजगार नाही आणि वितभर पोटाची खळगी भरायला हाताला काम नाही म्हणून वैफल्यग्रस्त होवून शरीराने सुदृढ असलेले युवक- युवती अगदी सहजपणे आत्महत्येचा मार्ग स्विकारतात. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर गेल्या दोन वर्षात दहा पेक्षा जास्त युवकांनी हा मार्ग स्विकारला. अशा तरूणांना मानसिक बळ देणारे वास्तव मी या शब्दांकनात मांडणार आहे. मनाने खचलेल्या आणि भरकटलेल्या तरुणाईच्या मेंदूला सकारात्मक विचार करायला लावणारी ही सत्य घटना आहे.

ही दुर्दैवी घटना आहे उस्मानाबाद येथील सुशिक्षित सचिन पिंपरे या युवकांची. पुण्यात आयटी सेक्टर मध्ये कामाला असलेला २३ वर्षाचा युवकं आपल्या भावी आयुष्याची आणि कुटुंबातील आई- वडील व छोटा भाऊ यांची सुंदर स्वप्न रंगवत होता.. पण पाच वर्षापूर्वी या सुंदर स्वप्नांचा नियतीने बेरंग केला. शिर्डी, अहमदनगर येथे एका मोटरसायकल अपघातात त्याला कायमचं अपंगत्व आलं. वर्षभर अंथरूणाला खिळून होता. कुटुंबातील तो एकमेव आधार.. आणि आलेलं अपंगत्व.. डोळ्यासमोर फक्त आणि फक्त अंधार.. सहा फुटाहून जास्त उंची आणि मजबूत शरीरयष्टी असलेला ह्या उमद्या, हरहुन्नरी तरुणाची तीन चाकाची खुर्ची हाच आधार…
.. आणि अचानक त्याला काळ्याकुट्ट अंधारात प्रकाश देणारा एक काजवा सापडला. हजारो दिव्यांगाना ताठ मानेने व स्वाभिमानाने समाजात “माणूस” म्हणून जगता यावं यासाठी आपल्या अपंगत्वाचा कोणताही बाऊ न करता वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षापर्यंत हसणारी,बागणारी , ओतप्रोत उर्जा असलेली, सळसळणारी एक मुलगी अचानक पाठीच्या दुखण्याने अंथरूणाला खिळते आणि पॅराप्लेजिक होऊन चाकाच्या खुर्चीची कायमची सोबतीण होते… पुढचा सगळा संघर्षमय प्रवास आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण फक्त आणि फक्त दिव्यांगांच्याच साठी व्यतीत करते अशा साहसच्या संस्थापक डॉ. नसिमा हुरजूक यांचा “उंच माझा झोका” हा कार्यक्रम सचिनने टि. व्ही. वर पाहिला. साहसचा स्वप्ननगरी मोरे, माणगाव, ता- कुडाळ, जिल्हा- सिंधुदुर्ग येथे दिव्यांगांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणाऱ्या काजू प्रक्रिया उद्योगाची माहिती सचिनने घेतली. आदरणीय नसिमादिना संपर्क केला. काम करण्याची इच्छा व्यक्त करून सचीन राखेतून उंच भरारी घेण्यासाठी अहमदनगरहून स्वप्ननगरीत दाखल झाला. दिदिंचा आश्वासक व प्रेमळ हात सचिनच्या पाठीवरून फिरला आणि मोठ्या आत्मविश्वासाने सचिनने फक्त आणि फक्त दिव्यांगांसाठी सुरू असलेल्या काजू प्रक्रिया उद्योगाची जबाबदारी घेतली.
मधल्या कोरोनाच्या काळात काजू युनीट अडचणीत सापडले पण दिंदिंची वयाच्या ७५ व्या वर्षी असणारी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर व समाजातील काही दात्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प आता कात टाकतात आहे. १३० हून जास्त दिव्यांग दिंदिंच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व साहसच्या टीमच्या सहकार्याने चालवत असून सचिन या काजू प्रक्रिया उद्योगाचा व्यवस्थापक म्हणून अतिशय चोखपणे जबाबदारी निभावत आहे. या प्रकल्पात दिव्यांगाच्या नवरा बायको अशा दहा जोड्या पण अगदी आनंदाने आणि समाधाने कार्यरत असून या प्रत्येकांशी सचिनचे एक भावनिक नातं जोडलं गेल आहे.
या प्रकल्पाला काजू उत्पादक शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी, देणगी दारानी सहकार्य केले पण सगळ्यात मोठी साथ दिली ती बजाज उद्योग समूहाने. दिव्यांगानी चालवलेल्या या प्रकल्पाला बजाज उद्योग समूहाने आपल्या सीएसआर मधून तब्बल दोन कोटी सव्वीस लाख मंजूर केले. बजाज उद्योग समुहाच्या सीएसआर विभागाचे अध्यक्ष मा. कृष इराणी, सीएसआरच्या नॅशनल हेड डॉ. श्रीमती अमन कौर व सिनीयर युनीट मॅनेजर श्रीमती श्रृती गौर यांनी पंधरा दिवसापूर्वी प्रकल्पाला भेट दिली. त्यानी सचिन पिंपरे या युवकाशी संवाद साधला.. त्याचा हा प्रवास ऐकून ही मंडळी थक्क झाली… त्याच्या पाठीवरून हात फिरवला… यावेळी खुर्चीला खिळलेला हा ३३ वर्षाचा युवक अगदी आत्मविश्वासाने बोलत होता.. या भेटीत साहसचे खजिनदार श्री अझिज हुरझुक, चार्टर्ड अकौंटंट के. डी. पाटील, विश्वस्त श्री सताराम पाटील यांच्याबरोबरही बजाज च्या समुहाने सकारात्मक चर्चा केली. साहसचा विश्वस्त म्हणून अशा उपक्रमात सक्रिय सहभाग दिंदिच्या मार्गदर्शनाखाली घेता आलं हे माझं खरोखरचं भाग्य आहे. खुर्चीला खिळलेल्या सचिनसारख्याना जगण्याची उमेद देणाऱ्या आदरणीय दिदिनां सलाम आणि सचिनलाही….
… अॅड. नकुल पार्सेकर…
विश्वस्त, साहस, कोल्हापूर.
९४२२३७४२०५/७७९८७१३४७५

प्रतिक्रिया व्यक्त करा