You are currently viewing पाऊस धारा

पाऊस धारा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पादाकुलक वृत्त*

 

*पाऊस धारा*

 

वैशाखाच्या उन्हात अवघे

करपुन गेले रान कोवळे

अन् अवकाशी मेघ दाटता

सुरू जाहले सृजन सोहळे

 

निळ्या अंबरी नकळत येती

मेघ सावळे थयथय करिती

सैरावैरा पळता वारा

धडक देउनी ढग गडगडती

 

अवचित येते अवनीवरती

सरसर करुनी वर्षा राणी

नेत्रदीपक ते दृश्य मनोहर

अवकाशातुन झरते पाणी

 

लाल तांबडी भिजता काया

धरा लाजुनी क्षणात हसते

पाउस धारा मिठीत येता

हिरवाईने शिवार सजते

 

डोंगरमाथ्यावरुनी हासत

खळखळ करुनी झरतो निर्झर

मृदा जलाचे मीलन होता

खडकांनाही फुटतो पाझर

 

पुलकित होते सृजनसृष्टी

अमृतधारा धुंद बरसता

प्रसन्न झाले तनमन सारे

मृदगंधाचा दरवळ सुटता

 

© दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा