You are currently viewing विश्वास आणि व्यक्तिमत्व

विश्वास आणि व्यक्तिमत्व

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*विश्वास आणि व्यक्तिमत्व*

 

*हम होंगे कामयाब एक दिन*

*मनमे है विश्वास,पूरा है विश्वास*

*हम होंगे कामयाब एक दिन*

हे गीत ऐकले की बाहू स्फुरण पावतात,छाती फुगून येते आणि मन आत्मविश्वासाने भरून जाते.याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या गीतातील सकारात्मक दृष्टी.सकारात्मक लहरी वातावरणात भरून राहिल्या की स्वतःमधील विश्वास बळावतो आणि मग लाथ मारीन तिथे पाणी काढीन या आत्मविश्वासाने माणूस समाजात मोठ्या दिमाखाने मिरवतो. हा गर्व नक्कीच नाही,याला दुसऱ्याला ऊर्जा देणारे व्यक्तिमत्व असे मी म्हणेन.लाईफ इज ब्युटीफूल असे म्हटले जाते,पण जीवनातील सौंदर्य तोच पाहू शकतो,सुंदरतेचा आस्वाद तोच घेऊ शकतो

ज्याच्या मनात दृढ आत्मविश्वास असतो.

आपल्या संतांनी म्हटलेच आहे,

 

“प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे”. अहो,

अशक्य असं काहीच नाही,फक्त तुमचा निर्धार हवा. कितीही कष्ट पडले, यातना सोसाव्या लागल्या तरी माझे ध्येय मी गाठीनच असा स्वतःवर विश्वास ठेवला तर वाळूतूनही तेल काढता येते. “मुकं करोति वाचालम्

पंगूम लंघयते गिरीम्”

भगवंताची कृपा झाली तर मुक्या माणसाला वाचा फुटेल आणि पांगळा माणूस सुद्धा दुर्गम असा गड चढू शकेल. या ठिकाणी थोडे पुढे जाऊन मी असे म्हणेन की, भगवंताची कृपा तेव्हाच होईल जेव्हा तुमच्या मनात स्वतः विषयी ठाम विश्वास असेल.

मागे काही वर्षांपूर्वी मुंबईत गावदेवीच्या देऊळात माझा गाण्याचा कार्यक्रम झाला होता. संवादिनीवर साथीला सुरज पोवळे नामक एक अंध व्यक्ती होती.श्रोत्यांना आमच्या संचाचा परिचय करून देताना निवेदिकेने जाहीर केले की, या सुरजची बोटे संवादिनीवर फिरताना पाहून असे वाटते की त्याच्या बोटांना दृष्टी फुटली आहे. सांगायचा मुद्दा हा की एखाद्या बाबतीतील न्यूनता आत्मविश्वासाच्या बळावर माणूस दुसऱ्या गोष्टीतून भरून काढू शकतो.म्हणूनच म्हटले आहे, “पंगूम् लंघयते गिरीम्”

प्रत्येकाची बुद्धी सारखी नसते.कोणाला एकदा वाचून लक्षात राहील तर कोणाला तीच गोष्ट दहा वेळा वाचावी लागेल,पण याचा अर्थ असा नव्हे की सर्वसामान्य माणूस जीवनात यशस्वी होणारच नाही. एकदा कमी मार्क मिळाले, अपयश पदरी आले, हरकत नाही. पुढच्या वेळी जास्त मेहनत करून मी यशस्वी होईनच हा विश्वास उत्पन्न करणे हे महत्त्वाचे. आळस झटकला,मेहनतीची तयारी दर्शविली तर यश तुमच्या पाठी धावत येईल आणि आत्मविश्वास अधिकाधिक दृढ होईल.

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असे म्हणतात. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या युक्तीच्या आणि विश्वासाच्या बळावर गनिमी काव्याचे तंत्र अवलंबून स्वराज्याची स्थापना केली. दक्षिणेत लालमहालात घुसलेल्या शाहिस्तेखानाची बोटे कापली, अफजलखानाच्या छावणीत जाऊन त्याचा कोथळा बाहेर काढला आणि त्याला यमसदनाची वाट दाखवली.

पारतंत्र्याच्या बेडीत अडकलेल्या मातृभूमीला सोडविण्यासाठी टिळक,आगरकर, चाफेकर बंधू, सावरकर अशा कित्येक स्वातंत्र्यसैनिकांचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवेनच.”

अशी घोषणा टिळकांनी केली आणि त्या दृष्टीने पावले टाकली. त्यांनी केसरीतून केलेले समाज प्रबोधन, स्वातंत्र्यवीरांची जर्मनीतील मार्साय बंदरातून टाकलेली त्रिखंडात गाजलेली उडी ही उदाहरणे त्यांच्यातील निर्धार,विश्वास आपल्याला दाखवून देणारी आहेत. आमच्या देशाला आम्ही स्वतंत्र करणारच, फिरंग्यांना पळवून लावणारच हा दृढ विश्वास भारत स्वतंत्र होण्यासाठी कामी आला हे निःसंशय! त्यांच्या या विश्वासातूनच आजची नवी पिढी निर्माण झाली आहे. सीमेवर सतर्क राहून आतंकवाद्यांपासून भारतमातेचे ती रक्षण करीत आहे.

जन्मतः माणूस एक हाडामासाचा गोळा असतो. भूक लागली, कुठे काही दुखले खुपले तर रडायचे एवढेच त्याला माहीत असते, पण हळूहळू मूल जसे मोठे होते, बसायला लागते, चालायला लागते, बोलू लागते तेव्हा त्याच्या या क्रियांमध्ये जन्मदात्यांचा फार मोठा सहकार असतो. सुरुवातीला बसल्यावर बालक पडेल म्हणून आई त्याच्या पाठीला आधार देते. चालताना त्याचे बोट पकडते, बोलताना एकेक शब्दोच्चार शिकवते आणि असे संस्कार घडत घडत बालक मोठे होऊन माझे मी स्वतः करू शकतो असा आत्मविश्वास त्याच्यात तयार होतो. तो पडेल झडेल,त्याला दुखापत होईल म्हणून त्याला मोकळीक दिलीच नाही तर त्याचे जगणे दुरापास्त नाही का होणार? सायकल चालविण्यास शिकताना सुरुवातीला शिकविणाऱ्याला सायकलची सीट धरून त्याच्या मागे धावावे लागते,परंतु काही काळानंतर तो हात सोडतोच ना? मी आता स्वतंत्रपणे सायकल चालवू शकतो हा आनंद फार मोठा आहे. मनात सकारात्मक विश्वास निर्माण करणारा आहे.

एकटा जाऊ नकोस, पावसात भिजू नकोस- आजारी पडशील, फार धावू नकोस- उगीचच दमशील अशा प्रकारचा नकार घंटा कोणत्याही आईने मुलाला लावू नये. आपल्याकडे वाक्प्रचार आहे,”पडेल झडेल तर माल वाढेल”. आयुष्यात टक्के टोणपे खातच परिस्थितीशी दोन हात करायची शक्ती येते. आपल्या भोवतालच्या माणसांची चांगली ओळख पटते आणि त्यावरून कोणाला किती जवळ करायचे,किती दूर ठेवायचे याचा अंदाज बांधता येतो.

कित्येकदा असे होते की आपण एखाद्या व्यक्तीला प्रथमच पाहतो आणि त्याची हालचाल, डोळ्यातील चमक, बोलण्याची हातोटी, एकूणच त्याची देहबोली बघून आकर्षित होतो. सहज उद्गार निघतात, “काय डॅशिंग आहे

हा /ही!” त्याच्यातील जबरदस्त आत्मविश्वासाने त्याने आपल्याला प्रभावित केलेले असते. जो सत्याची कास धरतो त्याच माणसाच्या वृत्तीत असा सकारात्मक विश्वास निर्माण होऊ शकतो.

“सत्यमेव जयते” हे आपल्या भारताचे ब्रीदवाक्य आहे ते काय उगीच? ” भगवान के घर देर जरूर है मगर अंधेर नही”, सत्याचा विजय होणारच. समर्थ रामदास स्वामींनीही सर्वसामान्य माणसाला हाच उपदेश केला आहे

*मना सर्वथा पाप बुद्धी नको रे*

*मना सर्वथा निती सांडू नको रे*

*मना पापसंकल्प सोडून द्यावा*

*मना सत्यसंकल्प जीवी धरावा*

ज्यांनी मनातील पाप बुद्धीचा,कुविचारांचा त्याग केला आहे,ज्याने सदैव सत्याचीच कास धरली आहे आणि ज्याने नीतीचे आचरण कधी सोडले नाही अशा माणसाचा अंतिम विजय होणारच अशी दृढभावना आणि विश्वास त्याच्या मनात सदैव असतो. या विश्वासानेच तो जीवनातील आनंद उपभोगण्यास पात्र ठरतो.

एकाच वाक्यात सांगायचे झाले तर मी म्हणेन

की आत्मविश्वास ही आनंदी आणि सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे.

 

अरुणा मुल्हेरकर

मिशिगन

१२/०६/२०२४

प्रतिक्रिया व्यक्त करा