आठवणीतील आगळीवेगळी व्यक्तीमत्वे- प्रा.डॉ.सादिका नवाब “सहर”

*ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, संपादक बाबू फिलिप्स डिसोजा लिखित लेखमाला*

 

*आठवणीतील आगळीवेगळी व्यक्तीमत्वे- प्रा.डॉ.सादिका नवाब “सहर”*

 

“पिकते तिथे विकत नाही “अशी मराठी मध्ये एक म्हण आहे. डॉ.प्रा. सादिका नवाब यांच्या किर्ती बद्दल असेच म्हणता येईल. खोपोली येथील शास्त्रीनगर भागात राहणाऱ्या प्रा.सादिका नवाब मॅडम यांना आंतरराष्ट्रीय ख्याती लाभलेली असूनही खोपोली करांना त्या फारश्या परिचित नाहीत. कारण, त्यांचा प्रसिध्दी पराड्गमुख स्वभाव. आपल्या स्थानिक राजकीय पुढाऱ्यांमध्ये देखील त्यांच्या कार्याची पुरेशी दखल घेतली गेली नाही, हे वास्तव आहे.

खोपोली सारख्या आड मार्गावरील शहरात त्यांनी अनेक मोठमोठे साहित्यिक आणले. कदाचित ते हिंदी, उर्दू कार्यक्रम आयोजित करण्यात आले म्हणून पाहिजे तेव्हढी प्रसिद्धी झाली नाही असावी.

त्यांचा जन्म गुंटूर, आंध्रप्रदेश येथे झाला असून त्या विवाहानंतर खोपोली येथे स्थायिक झाल्या. त्यांचे सासर एक प्रतिष्ठीत ,सघन सुखवस्तू परिवारात येते.

गुलजार, साहिर लुधियानवी, फैज अहमद फैज, युसुफ नझिम, शमीम तारीक, सलमा सिद्दीकी, सारख्या मोठ्या महान माणसांचे पाय खोपोलीला लागले ते केवळ प्रा. सादिका नवाब यांच्यामुळेच.

अंजुमन तरक्की उर्दू (हिंद) संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हे सर्व कार्यक्रम आयोजित केले. मी त्या संस्थेचा खोपोली शाखेचा सुरवातीला सभासद झालो होतो. उर्दू भाषा शिकविण्यासाठी त्यांनी रविवारी वर्ग भरविले होते. उर्दू भाषेत शिकविण्यासाठी शिक्षक देखील स्वेच्छेने येत असत. मी हे वर्ग जॉईन केले होते. नंतर अन्य काही कारणाने मी दूर झालो.

के एम् सी कॉलेज, खोपोली मध्ये त्या हिंदी विभाग प्रमुख होत्या. त्यांच्यामुळे मी कॉलेज मधील हिंदी दिवस ला एकदा पाहुणा म्हणून निमंत्रित होतो.

त्या उच्च विद्याविभूषित आहेत. दिल्ली केंद्रीय साहित्य अकादमी च्या त्या सभासद आहेत. हिंदी भाषेतील देशातील अनेक संस्थांच्या त्या सभासद आहेत. लेखनासाठी उर्दू, फारसी,उर्दू भाषेतील लेखनासाठी “सहर” हे उपनाव त्यांनी धारण केले आहे. २०२३ साठीचा रूपये १ लाख राशीअसलेला

साहित्य अकादमी चा पुरस्कार १२ मार्च २०२४ मध्ये नुकताच त्यांना दिल्लीत समारंभ पूर्वक देण्यात आला.

 

उर्दू भाषा आणि साहित्य उत्तेजन नॅशनल कौन्सिल च्या त्या सदस्य आहेत. त्या शालीन, सुसंस्कृत आहेत.

त्या उच्चविद्याविभूषित आहेत. त्या बी ए (फारसी, उर्दू), एम ए (उर्दू, हिंदी, इंग्रजी ) , डी एच ई, पीएचडी (हिंदी) पदवीधर आहेत. उर्दू, तेलगू, मराठी, हिंदी या भाषांमध्ये त्यांनी लेखन केले आहे.

कादंबरी, कथा संग्रह, नाटक,बालनाट्य,कविता, गझल या साहित्य प्रकारांमध्ये त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या सर्व प्रकारच्या पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत.

उर्दू भाषेतील कादंबरी मध्ये कहानी कोई सुनाओ मिताशा, जिस दिन से, राजदेव की आमराई या आहेत. कथासंग्रह मध्ये खलीश बेनाम सी, नाटक संग्रहात मुखौंटोंके दरमियान हे उल्लेखनीय आहेत.

अंगारोंके फूल, सतरंगी, बावजूद, छोटी सी ये धरती, दरिया कोई सोया सा या कविता गजल संग्रहांनी त्यांचे नाव भारतातील अनेक राज्यांत पोहोचविले आहे. उर्दू भाषेतील लेखनासाठी उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र या राज्यातील उर्दू साहित्य अकादमी संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.

त्यांच्या हिंदी कादंबरी- कहानी कोई सुनाओ मिताशा,

जिस दिनसे, राजदेव की आमराई या आहेत. कथासंग्रहात मन्नत, शीशेका दरवाजा यांचा उल्लेख केला जातो. कविता आणि गजल संग्रहामध्ये- पत्थरोंका शहर, फिर खिले फूल यांनी प्रसिद्धी मिळविली आहे.

बा अदब बा मुलाहिजा होशियार ह्या नाटकाने देखील रसिकांच्या मनात स्थान मिळवले आहे. संशोधनात्मक, टीकात्मक ग्रंथ संपदा मध्ये साठोत्तरी हिंदी गजल-शिल्प और संवेदना, साहित्य में आलोचना की चिंता, और घुंघरू बजते रहे, लोकप्रिय कवी मजरूह सुलतान पुरी असून संदर्भ ग्रंथ म्हणून त्यांचे महत्त्व आहे.

त्यांच्या साहित्यातील लेखन विविधता खरेच अचंबित करते. त्या हिंदी, उर्दू, तेलगू, मराठी, इंग्रजी या भाषांमध्ये सफाईदारपणे लिहीतात. पंजाबी, कन्नड, राजस्थानी या भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचे भाषांतर झाले आहे.

वानगीदाखल -तेलुगू -नी कथा विनीपिन्यू-त्यांच्या कहानी कोई सुनाओ चे भाषांतर,इंग्रजी-गजल अँड मोड, टेल मी ए स्टोरी मिताशा (उर्दू कादंबरी भाषांतर), मराठी-मिताशा गोष्ट सांग एखादी, पंजाबी, तेलुगू, कन्नड, राजस्थानी या भाषांमध्ये देखील भाषांतरे झाली आहेत.

प्रा. डॉ. सादिका नवाब यांच्या साहित्यावर लिहिली गेलेली पुस्तके, मासिके-सादिका नवाब सहर व्यक्तित्व एवं कृतीत्व फिक्शन के परिप्रेक्ष्य में, रूबरू-सादिका नवाब सहर, व्यक्तित्व एवं कृतीत्व, सादिका नवाब सहर शायरीके तवाजूर में,

अनेक प्रतिथयश मासिकांमधून त्यांच्यावरील लेख प्रकाशित झाले आहेत.

त्यांच्या साहित्यावर अनेक राज्यातील विद्वान संशोधन करीत आहेत. सादिका नवाब सहर कादंबरी-जिस दिनसे में यथार्थ, कहानी कोई सुनाओ मिताशा में संघर्ष, सादिका नवाब सहर का कथा साहित्य, सादिका नवाब सहर फिक्शन ही त्यापैकी काही नावे आहेत.

त्यांच्या “आओ, दुआ माँगो” रचनेचा अंतर्भाव आपल्या महाराष्ट्रातील इयत्ता ५ च्या अभ्यासक्रमात बालभारती मध्ये करण्यात आला आहे. बंगाल सरकारने त्यांचे नाटक “सुलतान” दहावीच्या अभ्यासक्रमात नेमले आहे. “अदब शनासी ” बी ए साठी महिला विश्वविद्यालय, विजयापूर, कर्नाटक यांनी नेमले आहे. सतवासा ही त्यांची कथा देखील आहे. “मीटर गिरता है “हा कथासंग्रह बोर्ड ऑफ इंटरमिजिएट साठी आंध्र प्रदेश सरकारने नेमला आहे.

केवळ खोपोली नाही, केवळ रायगड जिल्हा नाही तर महाराष्ट्र राज्याच्या त्या गौरव, आदर, अभिमान आहेत.

 

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

9890567468

प्रतिक्रिया व्यक्त करा