कुडाळ :
बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग एज्युकेश अँड रिसर्च अकॅडमी कुडाळ येथे शैक्षणिक वर्ष 2024- 25 मध्ये परिचर्या क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थी – विद्यार्थिनींसाठी मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
NEET आणि नर्सिंग CET निकाल लागल्यानंतर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेईपर्यंत येणाऱ्या विविध अडचणी आणि त्यांचे मार्ग कसे शोधावे याबाबत विविध मुद्द्यांवर तज्ञांकडून विद्यार्थी- विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले जाते. यामध्ये प्रेफरन्स फॉर्म कसा भरावा, प्रवेश घेते वेळी लागणारे कागदपत्रे, तसेच इंग्लिश विषयावर प्रभुत्व कसे मिळवावे, वैद्यकीय शिक्षणासोबतच व्यक्तिमत्व विकास कसा करावा, तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीएससी नर्सिंग, जी. एन .एम .आणि ए.एन .एम अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या भविष्यातील संधी या आणि अशा विविध विषयांवर मार्गदर्शन मुलांना करण्यात येते.
आठवड्यातून चार दिवस प्रतिदिवशी तीन तास अशा स्वरूपात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी झालेल्या कार्यशाळेत विशेष समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग नगरी चे निरीक्षक माननीय श्री .सुनील बागुल यांनी जमलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना नर्सिंग प्रवेशानंतर उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्तीच्या योजना आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे याविषयीचे मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या पुढील टप्प्यात बँक ऑफ इंडिया कुडाळ चे शाखाप्रमुख माननीय श्री. ऋषिकेश गावडे यांनी जमलेल्या विद्यार्थी आणि पालकांना शैक्षणिक कर्ज आणि त्याची उपलब्धता विषयीचे मार्गदर्शन केले. आतापर्यंत या कार्यशाळेमध्ये साधारणता 70 विद्यार्थी पालकांनी लाभ घेतला असून यापुढे चालणाऱ्या कार्यशाळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज कडून करण्यात आले आहे.