*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.अनघा अनिल कुळकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*आईने घडवलेला श्याम*
आपल्या देशात अनेक महान व्यक्तिमत्व घडून गेलेत आणि आजही आहेत. एखादी व्यक्ती घडते तेव्हा ती घडताना अनेक नानाविध गोष्टींचा, व्यक्तिमत्त्वांचा तिच्यावर कळत नकळत प्रभाव पडतो आणि मग तिच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते. यालाच आपण संस्कार असेही म्हणतो. यामधूनच त्या व्यक्तीचे कर्तृत्व बहरते तिचा विकास होतो आणि काही वेळा तिच्याकडून अतुलनीय कामगिरी घडून एक अद्भुत अद्वितीय व्यक्तिमत्व आकारस येतं आणि पुढे वर्षानुवर्षे आपण कित्येक पिढ्यान पिढ्या त्या व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. जर ती व्यक्ती आपल्या सगळ्यांसाठी आदर्श व्यक्ती असेल तर आपण नकळत तिला घडवणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करतो.
अशीच एक व्यक्ती म्हणजे “पांडुरंग सदाशिव साने” अर्थात “श्याम”.श्यामला त्यांच्या आईने घडवले आपल्या आईकडून आपल्याला कशी शिकवण मिळाली कसे संस्कार मिळाले की ज्यामुळे आपले मन बालवयातच इतके संस्कारक्षम झाले हे सर्व त्यांनी “श्यामची आई” या पुस्तकात सांगितले आहे. “श्यामची आई” हे त्यांचे अत्यंत गाजलेले पुस्तक आहे. पुस्तकात श्याम आपल्या सवंगड्यांना आईच्या गोष्टी सांगत असतो प्रत्येक गोष्टीला कस्तुरीचा सुगंध आहे.
श्याम म्हणतो आई जन्म देताना आई देह देते, मन देते तसेच नंतर ज्ञानही देते म्हणून आई गुरु आहे, कल्पतरू आहे. त्यांची आई स्वतः सत्यवती होती. 108 प्रदक्षिणा घालत सावित्रीचे व्रत करायची. आईने उत्तम संस्कार करताना त्यांना पशुपक्षी. गाईगुरे व माणसांवर प्रेम करायला शिकवले. आई श्यामला म्हणायची, “चांगले काम करताना कधीही लाज येऊ देऊ नको. पाप करताना मात्र लाज वाटावी”. असे चांगले विचार श्यामच्या बाल मनावर कायमचे कोरले गेले.
एकदा श्याम ने दुसऱ्याच्या घरच्या गुलबाक्षीच्या कळ्या तोडून आणल्या. आईने त्याला चांगल्या शब्दात समज दिली. “अरे दुसऱ्याच्या घरची फुले न सांगता आणू नये. झाडे म्हणजे फुलांची माता. अशी मुकी फुले किंवा कळ्या तोडू नये. फुले झाडांच्या मांडीवरच छान फुलतात. त्याला तिथेच फुलू द्यावे.”
आईने श्यामला दोन वेळा स्नान करण्याचा नियम घालून दिला होता. एके दिवशी आईने श्यामला आंघोळ झाल्यावर फुले तोडायला सांगितले पण पाय ओले आहेत तळव्यांना माती लागेल म्हणून श्यामने आईला ओचे पसरून आपले पाय पुसायला सांगितले तेंव्हा आईने अतिशय गोड शब्दात शिकवण दिली, “श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस. मनाला घाण लागू नये म्हणून जपत जा हो. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून.” त्या काळी खेळ म्हणजे धावणे, लपंडाव, लंगडी, लगोरी असे शारीरिक खेळ खेळून झाल्यावर शरीर स्वच्छ करण्यासाठी स्नान करण्याचा नियम होता. शरीर स्वच्छ झाल्यावर निर्मळ व हलके वाटते तसेच झोपण्याआधी मनाचे स्नान करण्यासाठी प्रार्थना श्लोक परवचा म्हणण्यास श्यामला आईनेच शिकवले होते. बाल वयात मनावर केलेले संस्कार उत्तम माणूस म्हणून घडण्यास मदत होते.
श्यामच्या आईचे नाव यशोदा किती सार्थ नाव होते त्यांच्या आईचे. त्यांनी जे विविध संस्कार केले त्यातूनच त्यांचा जीवन विकास झाला. सर्वांभोवती प्रेम करण्याचा धडा मिळाला. श्यामचे मन अतिशय भावना प्रधान व संस्कारक्षम होते म्हणूनच आईने पेरलेल्या सद्भावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली.
श्यामचे प्राथमिक शिक्षण कोकणात पालगडला झाले. पुढच्या शिक्षणासाठी ते पुण्यात आले. मराठी व संस्कृत विषयात त्यांचा हातखंडा होता. कविता करण्याचा पण त्यांना नाद होता. कवी म्हणून शाळेत त्यांची कीर्ती पसरली. प्राकृत पुराणादि व पोथ्यांचे वाचन त्यांनी केले होते. पुढे घरची गरिबी आली पण त्यांनी ज्ञानोपासना सोडली नाही. हाल अपेष्टा सोसतच ते मॅट्रिक झाले, नंतर पुन्हा कॉलेजमधून एम ए झाले. त्यानंतर अंमळनेरला शिक्षक म्हणून नोकरी लागली. तिथे त्यांनी, “दैनिक छात्रालय” सुरू केले. तिथूनच त्यांना “साने गुरुजी” म्हणून सर्वजण ओळखू लागले.
पुढे राजकीय जीवनात सत्याग्रहात भाग घेतला. १९३२ ते १९३४ पर्यंत त्यांनी तुरुंगवास पण भोगला. “काँग्रेस” नावाचे साप्ताहिक सुरू केले तसेच पंढरपूरचे देऊळ हरिजनांसाठी खुले व्हावे म्हणून आपल्या ओजस्वी वाणीने महाराष्ट्रभर प्रचार केला, उपोषण केले नंतर मंदिराचे दरवाजे हरिजनांसाठी खुले झाले.
साने गुरुजींनी विपुल वांड़मय लिहिले आहे. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद अशा विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालत होती. त्यात सर्वात त्यांचे तेजस्वी रत्न म्हणजे “श्यामची आई” व “श्याम” ही पुस्तके होत.
राजकारणात असताना सुद्धा त्यांच्या आईच्या शिकवणीचा त्यांना फायदा झाला त्यांची आई म्हणायची चरखा व गाय या भारतीय भाग्याच्या दोन आराध्य देवता आहेत त्यांची हेळसांड करू नये आणि सदाचार हाच खरा अलंकार आहे. त्यांची आई म्हणजे मूर्तिमंत प्रेम. वेळप्रसंगी कठोर होत असे पण कठोरपणातही खरे प्रेम व माया होती. त्यांच्या प्रत्येक कृतीत संस्कृती भरलेली आहे. प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध आहे. जर प्रत्येक घरी अशी संस्कृतीची उपासना केली तर सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते आणि ज्या राष्ट्रात समाज संवर्धक. समाज रक्षक. समाज पोषक श्रमाची पूजा होते ते राष्ट्र वैभवावर चढते हे नक्की.
सौ. अनघा अनिल कुळकर्णी
वारजे पुणे. 🙏
९३२३४९१११३