You are currently viewing दक्षिण आफ्रिका विजयी

दक्षिण आफ्रिका विजयी

*क्लासेन-मिलरने तोडला कोहली-पांड्याचा विक्रम, नॉर्टजेचा कहर*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध २०२४ टी२० विश्वचषकातील २१वा सामना चार धावांनी जिंकला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद ११३ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने २० षटकांत ७ गडी गमावून १०९ धावा केल्या.

२०२४ च्या टी२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा हा सलग तिसरा विजय आहे. संघ सध्या ड गटातील गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. त्यांच्या खात्यात सहा गुण आहेत. त्याचवेळी बांगलादेशला दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. यापूर्वी त्यांनी पाकिस्तानचा पराभव केला होता. सध्या ते गुणतालिकेत दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ११३ धावा केल्या होत्या. टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील ही त्यांची सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी २००७ मध्ये भारताविरुद्ध संघाने २० षटकात ९ गडी गमावून ११६ धावा केल्या होत्या. याचबरोबर दक्षिण आफ्रिका सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करणारा पाचवा संघ ठरला आहे.

बांगलादेशचे फलंदाज आफ्रिकन गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसले. एनरिक नॉर्टजेने या सामन्यात कहर केला. त्याच्या चार षटकांमध्ये त्याने ४.२५ च्या धावगतीने फक्त १७ धावा दिल्या आणि दोन विकेट घेतल्या. ३० वर्षीय गोलंदाजाने ८व्या षटकात शकीब अल हसन (३) आणि नझमुल हसन शांतो (१४) यांचे बळी घेतले. एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक गडी बाद करणार्‍यांमध्ये तो दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी२० विश्वचषकात हा वेगवान गोलंदाज सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याने नऊ विकेट्स घेतल्या आहेत. या बाबतीत तो अजंता मेंडिसच्या मागे आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० विश्वचषकात त्याने १३ विकेट घेतल्या होत्या.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी धावा केल्या. बांगलादेशविरुद्धच्या पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेने २५ धावांवर ४ विकेट गमावल्या. फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी आलेल्या रीझा हेंड्रिक्स पहिल्याच षटकात खाते न उघडता पायचीत बाद झाला. तनझीम हसन साकिबने त्याला तंबूमध्ये पाठवले. यानंतर घातक गोलंदाजाने क्विंटन डी कॉकलाही आपला शिकार बनवले. तो अवघ्या १८ धावा करून बाद झाला. संघाला तिसरा धक्का एडन मार्करामच्या रूपाने बसला. तो २३ धावांवर तस्किन अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. कर्णधाराला केवळ ४ धावा करता आल्या. ५व्या षटकात तनझीमने पुन्हा एकदा आपली किलर बॉलिंग दाखवली आणि ट्रिस्टन स्टब्सला बाद केले. तो खाते न उघडताच बाद झाला. टी२० विश्वचषकातील पॉवरप्लेमधील ही त्यांची तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. या स्पर्धेतील पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्या केली.

क्लासेन आणि मिलर यांनी ५व्या विकेटसाठी ७९ चेंडूत ७९ धावांची भागीदारी केली जी तस्किन अहमदने भेदली. त्याने १०२ धावांवर क्लासेनला त्रिफळाचीत केले. या सामन्यात ४६ धावांची झंझावाती खेळी करून तो बाद झाला. तर मिलर २८ धावा करून बाद झाला. यासह या दोघांनी विराट कोहली आणि हार्दिक पांड्याचा विक्रम मोडीत काढला. क्लासेन आणि मिलर यांनी टी२० विश्वचषकात चेंडूंच्या बाबतीत पाचव्या किंवा त्यापेक्षा कमी विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी केली आहे. कोहलीने २०२२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध पाचव्या विकेटसाठी ७८ चेंडूत ११३ धावांची भागीदारी केली होती. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही फलंदाजांनी आपल्याच संघाचे मार्क बाउचर आणि ॲल्बी मॉर्केल यांना मागे टाकले. बाउचर आणि मॉर्केल यांनी २००७ मध्ये भारताविरुद्ध पाचव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली होती.

क्लासेनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. उद्या रात्री ८ वाजता पाकिस्तान विरुद्ध कॅनडा हा एकमेव सामना होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा