*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री माया कारगिरवार लिखित अप्रतिम लेख*
*हरवलेली नाती*
नातं म्हणजे काय असतं…?हे आपल्याला पहिले जाणून घ्यावे लागेल मनुष्य मुळातच समाजशील प्राणी आहे..जेव्हापासून तो कुटुंब करून राहायला लागला तेव्हापासूनच नाती निर्माण झाली. सर्वप्रथम मानवी जीवनाचं मूलभूत नातं म्हणजे स्त्री आणि पुरुष. या मूलभूत नात्यामधून पुढील सगळी अनेक नाती निर्माण झाली . स्त्री-पुरुषांच्या वैवाहिक नात्याला नवरा बायको हे संबोधन मिळालं. आणि नंतर निसर्ग नियमाप्रमाणे मुलं झाल्यानंतर आई-वडील हे नातं निर्माण झालं. मुलगा मुलगी हे नातं निर्माण झालं. भाऊ ,बहिणी बहिणी हे नातं निर्माण झालं. बहीण भाऊ हे नातं निर्माण झालं .त्यातून मग काका, काकू, आत्या ,मामा ,मावशी ,आजी आजोबा, हिसर्व नाती निर्माण झाली. स्त्री-पुरुषांच्या मूलभूत संबंधातून नात्यांची शृंखला निर्माण झाली आणि कुटुंब संस्थेचा विकास होत गेला. अनेक कुटुंब मिळून समाज बनला. अनेक समाज म्हणून राज्य बनले. आणि अनेक राज्य म्हणून देश बनला..आणि सृष्टीच्या नियमाप्रमाणे मानवी समूहाचं नैसर्गिक जीवन सुरू झालं. कुटुंब म्हटल्यानंतर कुटुंबात जी काही नातलगांची संख्या असते त्याच्यामध्ये एक रक्ताचं नातं असते..त्यामुळे जिव्हाळा, प्रेम, आपुलकी आत्मियता, प्रेमभाव जबाबदारी ,कर्तव्य या सगळ्या मानवी मूल्यांची निर्मिती झाली..आणि कुटुंबातल्या सगळ्या नात्यांना एकमेकाबद्दल एक आकर्षण वाटू लागलं. एक जबाबदारी वाटू लागते, कर्तव्याची जाणीव येते .मनुष्य जीवन जगताना ह्या सगळ्या गोष्टी जसजसं जीवन जगण्याची प्रक्रिया सुरू होत जाते तसतसं या सगळ्या नात्यांचा अनुभव यायला लागतो आणि मग त्या अनुभवातूनच नातं म्हणजे काय याची व्याख्या ठरत जाते आणि त्या त्या नात्याने माणूस एकमेकांशी खूप जीवाभावाने जोडला जातो..त्याकडे आपण तितक्याच आत्मियतेने त्या नात्याकडे बघतो. समाजात वावरताना काही सामाजिक नाती सुद्धा जोडल्या जातात. शेजार संबंध असतात त्यांच्याशी पण माणुसकी चे नातं जोडले जाते …अशा प्रकारे जसजसा मानवी जीवनाचा विकास होतो तसतसा या असंख्य नात्यांच्या विकास होत जातो..आणि मग त्याच्या हक्काच्या नात्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा समाज जीवन जगत असताना आपल्या आयुष्यात अनेक अडीअडचणींना साथ देणारे आपले साथी सोबती मित्र मैत्रिणी शेजारी नातलग या सगळ्यांशी एक आपले भावबंध तयार होतात आणि मग ते भावबंद आपल्या हृदयात साठवले जातात.. हृदय स्थानी जागा मिळतात त्यांना..त्यांची गुंफण आपल्या मनाशी पक्की होत जाते..जीवन जगताना सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये सरळ सोट जीवन कधी माणसाला जगायला मिळत नाही..माणसाच्या जीवनामध्ये चढ-उतार हे येतच राहतात आणि जीवन जगताना येणारे चढ उतार माणसाला जगण्याबद्दल आश्वस्त करत असतात..त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा स्वतःच्या जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो ..त्याच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना मदत करणाऱ्या नात्यांचे पण वेगवेगळे पैलू आपल्याला जाणवायला लागतात. कौटुंबिक दुःख सुख असेल तर तिथे नातलग मंडळी येतात ,मदत करतात आपुलकी दाखवतात, जेव्हा त्यांचा जिव्हाळा आपल्या वाट्याला येतो तेव्हा नात्यांचे अनुबंध घट्ट होत जातात…प्रेम असते रक्ताच्या नात्यात. पण जीवनभर केवळ आपण कौटुंबिक नात्यांसोबतच आपलं संपूर्ण आयुष्य जगू शकत नाही. कारण मनुष्य हा समाजशीलतेने समाजात वावरतो. त्यामुळे त्याचे काही सामाजिक संबंध ही त्याच्या आयुष्यामध्ये निर्माण होतात .आणि ते संबंध कधी खूप घनिष्ठ संबंध निर्माण होतात, सामाजिक स्तरावर, मैत्रीच्या स्तरावर .त्यामुळे माणसाला त्याच्या जीवनाभोवती नातेसंबंधांचे एक वलय निर्माण होते आणि मग मनुष्याला त्या वलयामध्ये वावरण्याची सवय होते. आयुष्यात मिळालेली नाती शेवटपर्यंत आपल्याशी प्रामाणिक आहेत की नाही हे जीवन जगत असताना आपण त्याच्याकडे डोळसपणे जेव्हा पाहतो तेव्हा ती नाती प्रामाणिक असेल तर आपल्याला त्या नात्याबद्दल अत्यंत आदर वाटायला लागतो. एखादे नातं केवळ नातं आहे म्हणून समोरून दत्त म्हणून उभे राहतात पण कधीच संकटाच्या वेळी किंवा अडचणीच्या वेळेस मदतीला येत नाही अशा नात्यांकडे आपण दुर्लक्ष करतो एकतर किंवा मग ती नाती दुरावलेली वाटतात. नात्यांमध्ये सुसंवाद फार महत्त्वाचा आहे ..कुठलंही नातं निर्माण झाल्यानंतर ते हरवले असं वाटत असेल तर त्या दोन नात्यांमध्ये सुसंवाद असणं फार गरजेचे आहे..सुसंवाद हा नात्याचा आत्मा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ह्या सुसंवादामध्ये नाती घट्ट होत जातात आणि त्या नात्यांची आत्मियता आपल्या मनावर राज्य करायला लागते. तर ही नाती कां हरवतात? केव्हा आणि कशी ? खूपदा काय होतं नाती असतातच..ती कुठेच गेलेली नसतात. रक्ताची नाती जिथे आहे तिथेच असतात. पण ती हरवल्यासारखे का वाटतात? कारण त्यांच्यातला सुसंवाद कमी होतो किंवा नात्यांमधली विश्वासार्हता नष्ट झालेली असते… हे सुद्धा खूप महत्त्वाचं कारण आहे. नाते हरवल्यासारखी केव्हा वाटतात जेव्हा नात्यांमधली विश्वासाहर्यता आणि आत्मीयता गमावल्यासारखे दिसते किंवा ती जाणवते काहीतरी तुटतं मनामध्ये, हृदयामध्ये आणि मग ती नाती हरवल्यासारखी वाटतात.
..कधी कधी समाजात वावरताना माणसाला सामाजिक स्तरावर सुद्धा खूप जीव लावणारी नाते मिळतात .खूप आदर ठेवणारी आपल्याबद्दल अशी माणसं मिळतात. आणि ती आपल्याबद्दलचा आपलेपणा जोपासतात. आपल्या संकटाच्या काळात पाठीशी खंबीरपणे उभे राहतात..साथ देतात आपल्या सुखातही आपल्या सोबत आणि आपल्या दुःखातही आपल्या सोबत राहतात..अशा माणसांबद्दल आपल्या मनात एक तिसरा कोपरा असतो. मनाचा त्या कोपऱ्यामध्ये या लोकांना नेहमीसाठीच आपण स्थान दिलेले असते. ही नाती मनाच्या कोपऱ्यामध्ये घट्ट विणलेली असतात..कधी कधी समाज जीवन जगत असताना समाजात वावरताना आपल्याला अशाही अनेक गोष्टींचा अनुभव येतो की काही नाती केवळ वरवरचे संबंध ठेवतात..पण केवळ ओळख ठेवतात… लोकांचं आपल्या आयुष्यात येणं हा सुद्धा ईश्वर नियोजीत योग असतो…आणि त्यांचे आपल्या आयुष्यामध्ये चांगुलपणाने राहणं आपल्यावर जीव लावणं, आपल्या सगळ्या प्रसंगांमध्ये उपस्थित राहणं, कुठल्याही अडचणीला साथ देणे, आपल्या कौटुंबिक प्रसंगांमध्ये आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं अशी माणसं जेव्हा आयुष्यामध्ये येतात तेव्हा तिथे एक मैत्रीचं नातं निर्माण होते. आणि सर्वांग सुंदर असं हे मैत्रीचं नातं आहे आणि हे मैत्रीचं नातं विश्वास , आपलेपणा आणि सुसंवाद त्या नात्यांमध्ये जो होत जातो त्यावर संपूर्णपणे आधारित असतं..खूपदा रक्ताच्या नात्यापेक्षाही अशी मानलेली नाती मनाला खूप आनंद देऊन जातात आणि याच्या विरुद्ध बरेचदा खूप जवळचा रक्ताचं नातं असते पण ते असूनही माणसं तुटक वागतात त्यांना आपल्या सुखदुःखाशी काही घेणेदेणे नसते. समोर गेल्यानंतर आपण दिसलो म्हणून ते आपल्या नातं मानतात इतके औपचारिकता बरेचदा रक्ताच्या नात्यात ही बघायला मिळते.. आपल्या कुटुंबात शेजाऱ्यांच्या कुटुंबात किंवा अन्य आपल्या मित्र परिवाराच्या कुटुंबात सुद्धा आपण अशा पद्धतीच्या लोकांना बघत असतो आणि त्यातून मग ती नाती हरवली जातात ..नातं टिकवायचं असेल आणि आयुष्यात आलेले नाते कायम शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सोबत असावी अशी जेव्हा आपल्या मनात इच्छा निर्माण होते तर त्यावेळेस आपल्याला कुठल्याही नात्याकडं जास्तीची अपेक्षा न करता आणि राग लोभ क्रोध यांना थारा न देता सामंजस्यपणानी नात्यातला गोडवा जोपासावा लागतो.. वेळ प्रसंग कोणताही असो वैचारिक परिपक्वता ठेवून समोरच्या नात्याला जर आपण त्या नात्याने जर न्याय दिला तर ते नातं आपल्या सोबत कायम राहते मग ते रक्ताचा असो की समाज मान्य असो किंवा आपलं मानलेलं असो किंवा मैत्रीचं असो. नाते हरवू नये यासाठी नात्यांमधला सुसंवाद नात्यांमधला आपलेपणा नात्यांमध्ये विश्वासार्हता ढासळू न देणे हे कटाक्षाने सांभाळले जावे.. अगदी देवादिकांना सुद्धा या नात्याबद्दल संभ्रमात पडावे लागले…
विठ्ठल आणि रुक्मिणी मध्ये एकदा संवाद झाला होता..
रुक्मिणी विचारते,
*कमानी दरवाजाला लावून दोन्ही हात
खरं सांगा विठ्ठला जनी संग काय नातं..?
विठ्ठल म्हणे रुक्मिणीला..
दे ग जेवायला ताट !
रुक्मिणी म्हणते…”नाही देणार मी ताट
जनी पाहते तुमची वाट. “*अशी रुक्मिणी विठ्ठलाला चिडवते तेव्हा विठ्ठल म्हणतो “** नको लावू मनाला पाप ”
आपण दोघेही जनीचे मायबाप”* असा विठ्ठल रुक्मिणीला सुंदर भाषेमध्ये समजून सांगतात आणि रुक्मिणीच्या मनातला संभ्रम, सुंदर शब्दांमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मनातून काढून टाकतात ..असं हे नातं सुंदर रीतीने सुंदर मनाने सामंजस्यपणे विचार करून जोपासलं तर कोणत्याच नातं कधी हरवत नाही..ते नातं कायम असतेच आपल्या मनामध्ये ..ते केवळ काही क्षणासाठी दूर गेल्यासारखं जाणवते पण ते असतेच. पण खूपदा जीवनामध्ये असे प्रसंग येतात की नको वाटते काही नाती ….!काही माणसांची व्यक्तिमत्व अशी असतात की त्यांच्याशी कसं काय हे नातं निर्माण झालं अशी शंका येते..ही नाती खूप श्रुढ पद्धतीने जीवनात येतात…जीवन जगताना अनेकांना इतक्या जवळच्या नात्यांमध्ये इतका श्रुढपणा एखाद्याच्या व्यक्तिमत्वात असतो की ते नातच नकोस वाटायला लागते. त्या नात्याबद्दल कोरडेपणा वाटायला लागतो .असं वाटतं की ते नातं असण्यापेक्षा नसतं तर बरं झालं असतं. असेही कठोर प्रसंग मनाला वेदना देणारे प्रसंग, मनुष्याच्या जीवनात येतात आणि तेव्हा मग मनामध्ये विचार येतात हे नातं देवाने दिलेच नसतं खूप छान झालं असतं असे विचार खूपदा मनात येतात. काही सामाजिक नाते सुद्धा आपल्यावर जीव ओवाळून टाकतात आपल्या जीवनाच्या प्रत्येक टर्निंग पॉईंट वर खूप आपुलकीने आत्मीयतेने प्रेमाने आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात अशी ही नाती आपल्या मनातून कधीच हरवत नाही आपण किती दूर गेलो खूप वर्ष भेट झाली नाही झाली तरीही नाती मात्र आपल्या हृदयात कायम घर करून बसतात. आपल्यावर खूप जीव लावतात त्या नात्यांमध्ये असलेल्या व्यक्तिमत्त्वाची खूप चांगल्या रीतीने चांगल्या सुसंवादाने आयुष्यभर जोपासना केली जाते.. माझे एका मैत्रिणीशी पन्नास वर्षापासूनचे नातं जोडलेलंआहे. म्हणजे आमचे मानलेले नणंद भावजयीचे नातं आहे…आणि पन्नास वर्षात आमच्या दोघींमध्ये आजपर्यंत एकाही विषयावर कधीही बेबनाव झालेला नाहीये. एकमेकीं बद्दल कधीच नाराजी आले नाहीये .रक्ताच्या नात्याइतकीच आमची मैत्री आजही हृदयस्थ आहे…दोन्ही कुटुंबात निरपेक्ष प्रेम,जिव्हाळा आहे..जीवनात येणारी नाती व्यक्तीपरत्वे येत राहतात त्यामुळे नातं व्यक्ती परत्वे जोपासावे लागते. आणि व्यक्ती परत्वे ते नातं हरवत आणि सापडतही असं म्हणूया.
काही नाती इतकी सुंदर असतात नं… रेल्वे रुळासारखी.. खूप दूरदूर अंतापर्यंत साथ सोबत राहणारी कधीही न भिडणारी पण सातत्याने सोबत असणारी.. मनाला ही नाती
खुप भावतात… कुठल्याही स्वार्थाशिवाय कायम साथ सोबत करणारी… कधी ही न हरवणारी …. सोबतीचा आनंद देणारी….
सौ. माया कारगिरवार