You are currently viewing युगांडाने टी२० विश्वचषकातील संयुक्त सर्वात कमी धावसंख्या केली, अकील हुसेनचे पाच बळी

युगांडाने टी२० विश्वचषकातील संयुक्त सर्वात कमी धावसंख्या केली, अकील हुसेनचे पाच बळी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

फलंदाजांनंतर डावखुरा फिरकी गोलंदाज अकील हुसेनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर दोन वेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडिजने टी२० विश्वचषक स्पर्धेतील क गटातील सामन्यात युगांडाचा १३४ धावांनी पराभव करत मोठा विजय नोंदवला. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात युगांडाचा संपूर्ण संघ १२ षटकांत केवळ ३९ धावांत गारद झाला. टी-२० विश्वचषकातील कोणत्याही संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. युगांडाच्या आधी नेदरलँड संघाने २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ३९ धावा केल्या होत्या.

 

वेस्ट इंडिजने या स्पर्धेची शानदार सुरुवात केली आहे आणि संघाने युगांडाविरुद्ध स्पर्धेतील दुसरा सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. या जागतिक स्पर्धेतील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे, त्यांनी २००७ मध्ये केनियाविरुद्ध १७२ धावांनी विजय मिळवला होता. वेस्ट इंडिजने आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. क गटात अफगाणिस्ताननंतर वेस्ट इंडिजचा संघ चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर युगांडा संघ तीन सामन्यांतून एक विजय आणि दोन पराभवांसह दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज संघाने यावर्षी टी२० मध्ये सलग सहा सामने जिंकले आहेत, ही त्यांची दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी संघाने २०१२-१३ मध्ये सलग सात सामने जिंकले होते.

 

वेस्ट इंडिजने दिलेल्या १७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या युगांडाची फलंदाजी या सामन्यात खूपच खराब झाली. संघाचा एकच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला. युगांडासाठी खालच्या फळीतील फलंदाज जुमा मियागी २० चेंडूत १३ धावा करून नाबाद परतला. या सामन्यात मियागीने संघाकडून सर्वाधिक धावा केल्या. विशेष म्हणजे युगांडाच्या डावात एकही षटकार मारला गेला नाही, तर केवळ तीन चौकार मारले गेले. युगांडाने पॉवरप्लेमध्येच आपल्या पाच विकेट्स गमावल्या होत्या आणि त्यांचा डाव सुरुवातीपासूनच खराब झाला होता. संघाला टी२० विश्वचषकात आपल्या नावावर एक नकोसा विक्रम जोडावा लागला.

 

वेस्ट इंडिजचा फिरकीपटू अकिल हुसेनने या सामन्यात दमदार कामगिरी करत चार षटकांमध्ये ११ धावा देत ५ बळी घेतले. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. अकीलने रॉजर मुकासा (०), अल्पेश रामजानी (५), केनेथ विस्वा (१), रियाजत अली शाह (३) आणि दिनेश नाकराणी (०) यांचे बळी घेतले. अकीलची टी२० कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे आणि टी२० विश्वचषकाच्या सामन्यात पाच विकेट घेणारा तो पहिला कॅरेबियन गोलंदाज आहे. वेस्ट इंडिजसाठी या जागतिक स्पर्धेतील गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. अकीलच्या आधी सॅम्युअल बद्रीने २०१४ मध्ये बांगलादेशविरुद्ध १५ धावांत ४ विकेट घेतल्या होत्या, तर २०२२ मध्ये अल्झारी जोसेफने झिम्बाब्वेविरुद्ध १६ धावांत ४ विकेट घेतल्या होत्या.

 

तत्पूर्वी, वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ब्रँडन किंग आणि जॉन्सन चार्ल्स यांनी पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. अल्पेश रामजानीने किंगला बाद करून ही भागीदारी भेदली. यानंतर इतर फलंदाजांनी वेस्ट इंडिजसाठी काही योगदान दिले, परंतु युगांडाचे गोलंदाज मधेच विकेट घेण्यात यशस्वी ठरले. मात्र, अखेरीस रसेलने तुफानी खेळी करत संघाची धावसंख्या १७० च्या पुढे नेली. वेस्ट इंडिजकडून जॉन्सन चार्ल्सने ४२ चेंडूंत ४४ धावा केल्या, तर शेवटच्या षटकांत रसेलने १७ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ३० धावा केल्या. युगांडाकडून कर्णधार ब्रायन मसाबाने चांगली गोलंदाजी करत ३१ धावांत दोन गडी बाद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा