दिवस सरतात, तसं वर्ष बदलतं. आयुष्यातील एक वर्ष बघता बघता आयुष्यातून निघून जातं. पण जाताना काही गोड तर काही कटू आठवणी कायमचाच देऊन जातं. डिसेंबर आणि जानेवारीचं काही क्षणांसाठी मिलनही होतं, पण दोघांनाही तेव्हा समजत नाही, आनंदाने हसायचं की सोडून जातोय म्हणून रडायचं? आज ३१ डिसेंबर….. वर्षाचा शेवटचा दिवस. वर्ष संपल्याचा आनंद व्यक्त करावा की नव्या वर्षाचे स्वागत करावे? हा प्रश्न मात्र यावर्षी तरी अनुत्तरित राहणार. तरीही आयुष्यातील एक वर्ष सरताना देखील काही लोक आनंदात डुबणार…..तर काही काहीच न घडल्यासारखे नकळत नव्या वर्षात जाणार.
२०२० शेवटी एकदाचं सरलं…. हो सरलंच.. कारण, गेल्याचं दुःख मात्र कोणालाही नसणार, परंतु नव्या वर्षात समोर काय वाढून ठेवलंय याची उत्सुकता आणि काही अंशी भीती देखील कित्येकांच्या मनाला सतावणार. तरीही सांगावसं वाटतंय, आठवणींच्या देशातील दुःख, आठवून नाही रडायचं…..आज समोर येणाऱ्या दिवसाला, धैर्याने…. आनंदाने हसत हसत सामोरे जायचं.
२०२० कदाचित शतकातील सर्वात वाईट वर्ष असेल, ज्याने कित्येकांकडून बरंच काही हिरावून नेलंय…. दिलंय काय हे मात्र आठवूनही आठवत नाही. कोरोनाच्या महाप्रलयामुळे अगदी असं म्हणायला हरकत नाही की, २०२० हे वर्ष अनेकांच्या आयुष्याच्या डायरीतून डिलीट झालंय. एवढे कटू प्रसंग, कटू आठवणी सरत्या वर्षाने दिल्या.
खरंतर नववर्ष म्हणजे उत्सव असतो सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्याचा. एकमेकांस शुभेच्छा देऊन नव्या वर्षासाठी नवे संकल्प करण्याचा. तर काहींसाठी फटाक्यांची आतषबाजी, रोषणाई अन तरुणांसाठी नवलाई….कित्येकांसाठी मद्याची बरसात…. पार्टीचा स्वाद. कोण रमतोय कुटुंबासोबत अन कोणासाठी जीवलगाची अनमोल साथ. हरएक प्रकारे प्रत्येकजण नववर्षाचे स्वागत करत असतो….आणि सरत्या वर्षाच्या कटू आठवणी विसरून गोड आठवणींना हृदयाच्या कप्प्यात जतन करतो.
काळ बदलला तशा स्वागत कार्याच्या पद्धती बदलल्या. एक काळ होता, देशभरातील नववर्षाच्या स्वागताची तयारी टीव्हीवरील प्रक्षेपणातून पाहण्यात आनंद मिळायचा. घरातील सर्वजण टीव्ही समोर बसून एकत्र आनंद लुटायचे. आज काळही बदलला आणि बदलल्या त्या पद्धती. आजची तरुणाई मश्गुल असते ती ओल्या पार्टीत. नव्या वर्षाचे स्वागत म्हणजे हॉटेलमध्ये असो वा बाहेर कुठेतरी दूर बीचवर, गार्डनमध्ये, अथवा अज्ञातस्थळी पार्टी करणे, मनसोक्त मद्य पिणे, चिकन, मटण, बिर्याणीवर ताव मारणे. त्याच झिंगाट नशेत बेफाम गाडी हाकने अन ३१ डिसेंबरची पार्टी आयुष्यभर लक्षात राहणे.
नव्या पिढीने आज खरोखर विचार करण्याची गरज आहे की, ३१ डिसेंबरची रात्र दुसरा करतो म्हणून आपणही दारू, मटणाची पार्टी करणे आवश्यक आहे का? एका रात्रीच्या नशेत मिळालेला आनंद चिरकाल टिकतो का? कोणताही उत्सव साजरा करताना त्यातून निर्भेळ आनंद प्राप्त झाला पाहिजे, पार्ट्या ही आपली संस्कृती नसून आपल्या संस्कृतीची जपणूक झाली पाहिजे. त्यासाठी नव्या वर्षाचे स्वागत हे आनंदाने, हर्ष, उल्हासाने झाले पाहिजे, त्याला कुठेही बालंट लागता नये. यासाठी तरुणाईकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे.
म्हणूनच सांगावसं वाटतं…
रात्रीतल्या आनंदाची नशा,
पहाटेच्या धुक्यात विरून जाते.
सोनेरी किरणांनी रवीच्या,
नव्या वर्षाची चाहूल लागते.
नव्या वर्षाची चाहूल लागते.
(दिपी)
२०२१…या नववर्षाच्या तुम्हा सर्वांना संवाद मिडियाकडून हार्दिक शुभेच्छा..💐