महाबळेश्वर :
देशविदेशातील पर्यटकांच्या पसंतीचे व निसर्गरम्य पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन व नव्या वर्षाच्या स्वागतासाठी दिग्गज मंडळी दाखल झाली आहे. प्रसिध्द उद्योगपती अनिल अंबानी, टिना अंबानी यांच्यासह उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी, पती आनंद पिरामल तसेच पिरामल कुटुंबिय, हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्माते आदींचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान पर्यटकांच्या स्वागतासाठी पर्यटननगरीही सज्ज झाली आहे.
गुलाबी थंडी अन निसर्गसौंदर्याचे अद्वितीय लेणे लाभलेला हा परिसर पर्यटकांच्या हक्काचे एक डेस्टिनेशन असून महाराष्ट्रासह देशातील दिग्गज राजकारणी, सिनेस्टार्स व प्रसिद्ध उद्योगपतींना देखील येथे येण्याचा मोह आवरता येत नाही.
प्रसिद्ध उद्योगपती, दिग्गज राजकारणी, हिंदी व मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती, व्हीआयपी-व्हीव्हीआयपीसुध्दा आपल्या कुटुंबियांसह काहीसा निवांत वेळ घालविण्यासाठी महाबळेश्वरला भेट देतातच. अनेकांचे खासगी बंगलो येथे असून वर्षातून एक दोन वेळा ही मंडळी महाबळेश्वरमध्ये असतातच.
यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून या पर्यटनस्थळावरील सर्वच व्यवहार पूर्णपणे बंद होते. मात्र अनलॉकमुळे या निसर्गरम्य पर्यटनस्थळाला पुन्हा बहार आली आहे. दिवाळी हंगामापासून पर्यटकांची येथे रेलचेल असून नाताळ हंगामात देखील हजारो पर्यटकांनी आपल्या कुटुंबियांसह सुट्ट्यांचा आनंद या पर्यटननगरीमध्ये घेतला. नववर्षाच्या स्वागतासाठीही असंख्य पर्यटक येथे दाखल झाले आहेत. महाबळेश्वरची गुलाबी थंडी,सूर्योदय व सुर्यास्ताचे मुंबई पॉईंट, विल्सन पॉईंटसह लॉडविक पॉईंट आदी ठिकाणी दिसणारे विहंगम दृश्य, ऑर्थरसीट, केट्स पॉईंट्स सारख्या प्रेक्षणीय स्थळांवर जत्रेचा माहोल आहे. हौशी पर्यटक प्रामुख्याने नवविवाहित दांपत्य या प्रेक्षणीय स्थळांवर वेळ घालवताना दिसत आहेत. महाबळेश्वरचे वैभव असलेले प्रसिद्ध वेण्णालेक आणि परिसर पर्यटकांनी गजबजून गेला आहे. वेण्णालेक चौपाटीवर असलेल्या खाद्यपदार्थांवर ताव मारत अनेकजण नौकाविहार करत आहेत. घोडेसवारीचा आनंदही बालगोपाळांबरोबरच पर्यटक घेत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करूनच वेण्णालेक नौकाविहारासाठी प्रवेश दिला जात असून मुख्याधिकारी पल्लवी पाटील, नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष व्यवस्था उभारण्यात आली आहे. विना मास्क आलेल्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी एक वेगळी टीम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना देखील सुरक्षितरित्या नौकाविहार करता येतो. मुख्य बाजारपेठेतही खरेदीसाठी पर्यटकांची रेलचेल आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे आठ महिने बंद असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळावर दिवाळी हंगामानंतर पर्यटकांची चांगलीच रेलचेल पाहावयास मिळत असून विदेशात पर्यटनास जाणारे असंख्य पर्यटक यंदा महाबळेश्वर पर्यटनस्थळाला पसंती देत आहेत. प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी, टिना अंबानी, ईशा अंबानी, पिरामल कुटुंबीय यांच्यासह बरीच व्हिआयपी मंडळी महाबळेश्वरमध्ये दाखल झाली आहे.
*हॉटेल व लॉजिंगमधूनच वर्क फ्रॉम होम*
अनेकजण पर्यटनासह हॉटेल व लॉजिंगमधूनच वर्क फ्रॉम होम करत असल्याचे चित्र येथे पहावयास मिळाले. दरम्यान थर्टीफस्ट सेलीब्रेशनची जय्यत तयारी सुरु आहे. मात्र, 31 डिसेंबर हा वर्षातील शेवटचा दिवस साजरा करण्यासाठी पर्यटक पर्यटनस्थळावर येत असल्याने महाबळेश्वर,पाचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांवर 31 डिसेंबर रोजी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. 31 डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व कार्यक्रम रात्री 10 वाजल्यानंतर चालू ठेवण्यास मनाई करण्यात आली असल्याने ऐन पर्यटन हंगामामध्ये थर्टीफस्ट सेलेब्रेशनसाठी आलेले पर्यटक, स्थानिक व्यापारी-व्यावसायिक, हॉटेल व्यवसायिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.