*वीज ग्राहकांच्या समस्यांवर वीज ग्राहक संघटना व बांदा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी करणार मार्गदर्शन*
बांदा (प्रतिनिधी) :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असून वीज महावितरणबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. गेले काही दिवस जिल्हाभरात मान्सूनपूर्व पावसात विजेचा खेळखंडोबा सुरू असून महावितरणच्या भोंगळ कारभाराचे दर्शन जिल्हावासियांना झाले आहे. सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांना देखील याचा फटका बसून चार चार दिवस गावे अंधारात होती. वीज वितरणाच्या अनागोंदी कारभाराला चपराक द्यायची असेल तर वीज ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. यासाठीच शनिवार ०८ जून २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता मडूरा तिठा येथील श्रीहनुमान मंदीरात मडूरा दशक्रोशीतील वीज ग्राहकांची बैठक आयोजित केली आहे.
सदर बैठकीमध्ये वीज ग्राहकांना वारंवार उद्भवणाऱ्या समस्या, कमी दाबाचा वीज पुरवठा, गंजलेले विजेचे खांब, जुनाट वीज वाहिन्या, गिरणी, दुकानदार, व्यावसायिक, शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान, वाढीव बिले, आणि मुख्य म्हणजे लवकरच येऊ घातलेले प्रीपेड मीटर आदी समस्यांबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. गावातील गंजलेले वीज खांब, जुन्या वाहिन्या आदींबाबत माहिती घेऊन तसा अहवाल महावितरणच्या वरिष्ठांना पाठविण्या बाबत चर्चा करण्यात येणार आहे.
वीज ग्राहक संघटनेने यापूर्वी तालुक्यातील काही विभागात वीज ग्राहकांच्या बैठका घेतल्या असून त्याला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यातून अनेक समस्या मार्गी लागल्या, रखडलेली विजेची कामे सुरू झाली, काही पूर्णत्वास गेली आहेत. परंतु पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे अजूनही प्रलंबित असून ती पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांवर वीज ग्राहकांचा दबाव असणे आवश्यक आहे. यासाठीच बैठकीचे आयोजन केले आहे. सदर बैठकीत वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा तथा तालुका कार्यकारिणी पदाधिकारी, बांदा व्यापारी संघाचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. वीज ग्राहकांनी बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात द्याव्यात, असे आवाहन सावंतवाडी वीज ग्राहक संघटना तालुकाध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे.