You are currently viewing पंतच्या षटकाराने भारताचा आयर्लंड विरुद्ध सलग ८वा विजय

पंतच्या षटकाराने भारताचा आयर्लंड विरुद्ध सलग ८वा विजय

*रोहितचे अर्धशतक तर विराट सूर्या झटपट बाद*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

२०२४ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताने विजयाने सुरुवात केली आहे. न्यूयॉर्कच्या नासाउ काउंटी अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडचा आठ गडी राखून पराभव केला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडचा संघ १६ षटकांत सर्वबाद ९६ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने १२.२ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. ऋषभ पंतने १३व्या षटकात बैरी मैक्कार्थीच्या चेंडूवर षटकार मारून सामना संपवला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने ५२ धावा केल्या. मात्र, त्याला दुखापत झाली. त्याच्या दुखापतीचे गांभीर्य अद्याप समजू शकलेले नाही. आता भारतीय संघ अ गटात दोन गुणांसह अव्वल स्थानावर आला आहे. त्यांचा पुढचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी ९ जून रोजी होणार आहे.

 

भारताने आयर्लंडचा ४६ चेंडू राखून पराभव केला. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चेंडू शिल्लक असताना भारताचा हा चौथा सर्वात मोठा विजय आहे. टीम इंडियाने २०२१ मध्ये दुबईमध्ये स्कॉटलंडचा ८१ चेंडू शिल्लक असताना पराभव केला. भारतीय संघाचा आयर्लंडविरुद्धचा हा सलग आठवा विजय ठरला. भारताने बांगलादेशविरुद्ध एका संघाविरुद्ध सर्वाधिक सलग विजय मिळवण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. भारताने २००९ ते २०१८ पर्यंत बांगलादेशविरुद्ध सलग आठ टी२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकले होते. आता भारतीय संघाने ही कामगिरी आयर्लंडविरुद्धही केली आहे.

 

तत्पूर्वी, हार्दिक पांड्या (३/२७), अर्शदीप सिंग (२/३५), जसप्रीत बुमराह (२/६) यांच्या शानदार गोलंदाजीमुळे आयर्लंडचा डाव १६ षटकांत अवघ्या ९६ धावांत गडगडला. आयर्लंडकडून गैरेथ डैलेनीने सर्वाधिक २६ धावा केल्या. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून आयर्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. याच खेळपट्टीवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामना खेळला गेला होता. अर्शदीप आणि सिराजने गोलंदाजीला सुरुवात केली. पहिल्या दोन षटकांमध्ये भरपूर उसळी पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अर्शदीपने आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग (२) याला डिसेंबर २०२२ नंतर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या ऋषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. गेल्या टी२० विश्वचषकात १० बळी घेणाऱ्या अर्शदीपने षटकातील शेवटच्या चेंडूवर बलबर्नीला (५) त्रिफळा उध्वस्त करून आयर्लंडच्या सलामीच्या जोडीला तंबूमध्ये पाठवले.

 

पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहने आपली छाप सोडली. त्याने हे निर्धाव षटक टाकले. पॉवरप्लेमध्ये आयर्लंडने दोन गडी गमावून २६ धावा केल्या. हार्दिक पांड्याने त्याच्या पहिल्याच षटकात लॉर्कन टकरला त्रिफळाचीत केले. त्याने १३ चेंडूत १० धावा केल्या. बुमराहने पुढच्याच षटकात हॅरी टेक्टरला (४) कोहलीकरवी झेलबाद करून आयर्लंडला अडचणीत आणले. यानंतर फलंदाजांनी “उपस्थित सर” असं म्हणत हजेरी लावली.

 

सामन्यात एकावेळी आयर्लंडची धावसंख्या दोन विकेटवर २८ धावा होती, पण हार्दिकच्या गोलंदाजीमुळे धावसंख्या आठ विकेट्सवर ५० धावा झाली. या काळात हार्दिकने तीन विकेट घेतल्या. यादरम्यान अक्षर आणि सिराजलाही प्रत्येकी एक विकेट मिळाली. आयपीएलमध्ये खेळणारा आयरिश गोलंदाज जोश लिटलने दोन चौकार मारले. त्याने डेलेनीसोबत २७ धावांची भागीदारी केली. दरम्यान डेलनीनेही हार्दिकला षटकार ठोकला, पण आक्रमणावर परत येताच बुमराहने लिटलला (१४) बाद केले. अर्शदीपच्या षटकात डेलानीने एक षटकार आणि दोन चौकार मारले, त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर तो धावबाद झाला, पण त्याने १४ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २६ धावा केल्या.

 

९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला रोहितसह सलामीला आलेल्या विराट कोहलीची (१) विकेट झटपट गमवावी लागली. रोहित शर्माने निवृत्त होण्यापूर्वी ३७ चेंडूत ५२ धावा करत भारताला सहज विजय मिळवून दिला. डिसेंबर २०२२ नंतरचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या ऋषभ पंतने षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला. त्याने २६ चेंडूत ३६ धावांची नाबाद खेळी खेळली. भारताने १२.२ षटकात २ बाद ९७ धावा केल्या.

 

या सामन्यात यशस्वी जैस्वालच्या जागी रोहित आणि विराट कोहली सलामीला आले. हा निर्णय चांगला ठरला नाही. रोहितने लिटलच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार ठोकला, पण अडायरच्या षटकात विराट थर्ड मॅनवर झेलबाद झाला. त्याने फक्त १ धाव काढली. सूर्यकुमारला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याची चर्चा होती, मात्र बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्याप्रमाणे येथेही ऋषभ पंतला पाठवण्यात आले. त्याने येताच चौकार मारला. मात्र, या काळात धावांचा वेग थोडा मंदावला. पॉवरप्लेमध्ये भारताने एका विकेटवर ३९ धावा केल्या होत्या.

 

दरम्यान, रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० मध्येही ४ हजार धावा पूर्ण केल्या. विराट कोहलीनंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. पंतने ७.५ षटकात मैक्कार्थीला चौकार मारून भारताला ५० धावांच्या पुढे नेले. पंतने १००० टी२० आंतरराष्ट्रीय धावाही पूर्ण केल्या. त्यानंतर रोहितने आपल्या नेहमीच्या शैलीत लिटलच्या पुल शॉटवर षटकार ठोकला. पुढच्याच चेंडूवर त्याने पुन्हा षटकार ठोकला आणि टी२० विश्वचषकातील आपल्या १००० धावा पूर्ण केल्या. त्याने आपले ६०० आंतरराष्ट्रीय षटकारही पूर्ण केले.

 

रोहितने आपले ३० वे टी२० आंतरराष्ट्रीय अर्धशतकही ३६ चेंडूत अडायरच्या फुल टॉसवर चौकार मारून पूर्ण केले. २०१२ ते २०२२ या पाच विश्वचषकांमध्ये अर्धशतक झळकावणारा विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज होता, पण यावेळी रोहित शर्माने ही कामगिरी केली. १०व्या षटकात ३७ चेंडूत ५२ धावा केल्यानंतर रोहित दुखापतग्रस्त झाला. नवव्या षटकात लिटलचा चेंडू त्याच्या खांद्यावर लागला. व्हाइटने सूर्यकुमारला (२) स्वस्तात बाद केले.

 

जसप्रीत बुमराहला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. उद्या सकाळी ५ वाजता पीएनजी विरुद्ध युगांडा, सकाळी ६ वाजता ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान आणि रात्री ९ वाजता अमेरिका विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा