You are currently viewing संवादच्या विशेष संपादकीयवर वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया

संवादच्या विशेष संपादकीयवर वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया

*संवादच्या विशेष संपादकीयवर वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया*

*पण कोकणी माणसांच्या मतांची किंमत किती ती जगाला कळली..*

नाम.नारायण राणेंच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील विजयाचे दिपक केसरकर किंगमेकर..! या मथळ्याखाली संवादने विशेष संपादकीय लेख प्रसिद्ध केला आणि काही क्षणात वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया संवादच्या लेखावर बरसू लागल्या. काही तिखट काही गोड तर काही खोचक…ठेवणीतल्या..!
नाम.नारायण राणेंचा विजय हा नक्कीच दैदिप्यमान कारण तब्बल एक दशक विनायक राऊत यांनी आपली पकड मतदारसंघावर मजबूत केली होती. दोन्ही वेळी ते लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले होते. कदाचित त्यामुळे ते थोडेफार गाफील राहिले आणि भाजपा व शिवसेना शिंदे गटाने डाव टाकला आणि जिंकला सुद्धा..!
नाम.नारायण राणेंनी बरीच वर्षे नाम. दिपक केसरकर यांच्यासोबत राजकीय वैर पत्करले होते त्यातून नुकसान राणेंचेच झाले होते. परंतु भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र आल्याने नाम.राणे व नाम.केसरकर एक झाले, राजकीय वैर संपुष्टात येऊन सावंतवाडी मतदारसंघातील राणेंच्या प्रचाराची धुरा राणेंच्या कोण्या शिलेदारांनी नव्हे तर केसरकर यांनी खांद्यावर घेतली आणि बोललेला शब्द खरा करत मतदारसंघात तब्बल ३१००० चे मताधिक्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलत राणेंच्या विजयाचे किंगमेकर बनले. “नाम.दिपक केसरकर किंगमेकर” हा शब्द राणेंना खटकला नसेल कारण केसरकरांनी स्वतःचा प्रचार करावा त्यापेक्षा जास्त राणेंचा प्रचार केला हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे. परंतु अनेकांना दिपक केसरकर किंगमेकर हे पटलं नाही, रूचलं नाही, कुणाच्या गळी उतरलं नाही तर कुणाला उचकी लागली. पण म्हणून सत्य बदललं नाही.
संवादने प्रसिद्ध केलेल्या संपादकीय वर काही खोचक तर काही मजेशीर अशा सुद्धा प्रतिक्रिया आल्या. “केसरकरांमुळे राणे जिंकले..? की राज ठाकरेंच्या सभेमुळे राणे जिंकले..?” असे प्रश्न करत काहींनी स्वतःच्या माणसाकडे क्रेडिट घेण्याचा खटाटोप केला..
“केसरकरांमुळे जिंकले की, मोदी शहांच्या सभेमुळे राणे जिंकले..?”
असाही प्रश्न उपस्थित करत मोदी शहा सारख्या देशपातळीवरील नेत्यांचा दबदबा गावपातळीवर असल्याचेही प्रमाणपत्र काहींनी दिले.
“दादा नक्की कोणत्या कारणांमुळे जिंकले ह्या दादाकच ठावक..”
असे खोचक विधान करत काहींनी कुणालाही विजयाचे श्रेय न देता आपल्या सांशकतेचा बाण राणेंच्या गोटात सोडत विजयाला संशयाच्या फेऱ्यात अडकवले.
*”पण, कोकणी मतांची किंमत जगाक कळली.. ५००-१०००-२०००..?”*
असा वर्मी घाव घातल्यासारखा ठेवणीतला म्हणा किंवा शेला पागोट्यातला प्रश्न उभा करून कोकणी मतदारांना (काही) आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यामुळे संवादच्या संपादकीय वरील प्रतिक्रिया वाचनीय ठरल्या. एकीकडे देशात मोदींचा दबदबा काहीसा कमी झालेला दिसला. लोकांचा कल एककल्ली, जोर जबरदस्ती, आणि हम करे सो कायदा या राजकारणाकडून पुन्हा लोकशाहीला अभिप्रेत राजकारणाकडे जाताना महायुतीला धक्का देणारा ठरला तिथे सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघात मात्र कमळ फुलताना दिसले. यासाठी अनेकांनी प्रयत्न केले त्यातीलच एक म्हणजे दिपक केसरकर हे संवादने संपादकीय मधून जनतेच्या दरबारात मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा