*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*दे धडक बेधडक..*
।आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा ।।
जगदीश खेबुडकरांच्या या काव्यपंक्ती आठवल्या आणि मनात विविध विचार प्रवाह वाहू लागले. झेप घेणे, भरारी मारणे, “लाथ मारीन तिथे पाणी काढेन”, भयमुक्त, निर्भय, धडाडीचे आयुष्य जगणे, “हम भी कुछ कम नही” “मनात आलं तर खडकालाही पाझर फोडू” हे सारं नक्कीच सदगुणांच्या यादीतले गुणप्रकार आहेत यात शंकाच नाही. भित्रा माणूस काहीच करू शकत नाही. तो मागेच राहतो. कसंबसं जीवन जगतो, कधीही प्रकाशझोतात सकारात्मकपणे येतच नाही.
*सकारात्मकपणे* हा शब्द इथे खूप महत्त्वाचा आहे. धोका पत्करण्यामागे दोन बाबींचा अंतर्भाव खचितच आहे. यश आणि नुकसान या त्या नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे धोका पत्करताना सावधानता, नियमांची चौकट, आत्मभान, स्वसामर्थ्याची ओळख आणि उडी मारण्यापूर्वी पाण्याच्या संभाव्य खोलीचा घेतलेला अंदाज म्हणजेच परिपक्व, समंजस धाडस नाहीतर फक्त बेधडकपणा, एक प्रकारचा माज, मिजास, गर्व आणि पर्यायाने प्रचंड हानी! वैयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक..
पंधरा दिवसांपूर्वी पुण्यात कल्याणीनगर मध्ये घडलेली “पोरशे कार धडक घटना ही या प्रकारात बसते. या घटनेनिमित्त अनेक स्तरांवरच्या, अनेक बाबींविषयी अपरंपार घुसळण झाली— होत आहे. प्रामुख्याने बदलती जीवनपद्धती, यांत्रिकतेचा अतिरेक, हरवलेला कौटुंबिक संवाद, बेदरकारपणा, “ नियम आमच्यासाठी हवेत कशाला”, “ हम करे सो कायदा” ही बेधुंदी,पैसा, सत्ता याचा गैरवापर, २४x७ बोकाळलेली माध्यमे आणि नको त्या वयात नको ते अनुभवण्यास उपलब्ध झालेले मैदानं, ना कोणाचे बंधन ना कोणाची भीती आणि या पार्श्वभूमीवर पौगंडावस्थेतलं, गोंधळलेलं, अमिबा सारखं ना आकार ना रूप असलेलं एक बेढब, भेसूर, अधांतरी लटकणारं मन, शरीरात रक्तप्रवाहात चाललेलं संप्रेरकांचं सुसाट वादळ आणि त्या वादळाला शांतवण्यासाठी अस्तित्वात नसलेली आधारभूत समंजस, परिपक्व यंत्रणा.
मी जेव्हा या सद्य घटनांच्या पार्श्वभूमीवर मागे वळून माझे आयुष्य साक्षी भावाने पहाते तेव्हा मला सहजच वाटते इतर भावंडांमध्ये मी अधिक धाडसी होते. मला प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यावासा वाटायचा. नवनवीन गोष्टींबाबत प्रचंड औत्सुक्य असायचं.(ते आजही आहे) एकाच वेळी वडील सांगत,” पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहता येत नाही. त्याचवेळी इतर कौटुंबिक सदस्य मला “हे करू नकोस ते करू नकोस” असेही सांगायचे. मी काही “बडे बाप की बेटी”ही नव्हते. तशी मी बाळबोध घराण्यातच वाढले. ठरवून दिलेल्या सांस्कृतिक आणि आचारसंहितेच्या नियमबद्ध चौकटीतच वाढले. तरीही माझं एक पाऊल प्रवाहाविरुद्ध जाण्यासाठी उत्सुक असायचं. कधी परवानगीने तर कधी छुपी-छुपे मी ते उचललंही. एक धडकपणा माझ्यात होता म्हणून अगदी काही वर्षांपूर्वी मी रिप लायनिंग केलं, पॅरासेलिंग केलं, थायलंडला अंडर सी वॉक” केला. मनावर प्रचंड भय असतानाही भयावर मात करत अशी मी अनेक साहसकृत्ये नक्कीच केली. जेव्हा ड्रायव्हिंग शिकले तेव्हा दुतर्फा झाडी असलेल्या मोकळ्या रस्त्यावरून सुसाट गाडी पळवाविशी वाटली पण आता असं वाटतं की अनेक भीत्यांच्या वर एक भीती सतत होती आणि तिचं वर्चस्व नाकारता आलं नाही ती म्हणजे सद्बुद्धीची. मन आणि बुद्धीतला वाद नेहमीच विवेक बुद्धीने जिंकला म्हणून माझ्या कुठल्याही धाडसात धडक असली तरी बेधडकपणा नव्हता. सावधानता होती हे नक्कीच. एक वय असतं धोक्याचं, प्रचंड ऊर्जेचं, सळसळणाऱ्या प्रवाहाचं. नदीचं पात्र सुंदर दिसतं पण जेव्हा तीच नदी किनारे सोडून धो धो पिसाट व्हायला लागते तेव्हा ती सारं जीवन उध्वस्त करते म्हणून फक्त एकच…
थोडं थांबा, विचार करा, योग्यायोग्यतेचा मेळ घाला. नंतर दोषारोप करण्यापेक्षा वेळीच यंत्रणांना चौकटीत रोखा, बाकी कुठल्याही कायद्यापेक्षाही मनाचे कायदे अधिक संतुलित हवे आणि तसेच शिक्षण सुरुवातीपासून अगदी जन्मापासून देणारी भक्कम मानवीय संस्था हवी.
*बैल गेला झोपा केला* अशी स्थिती उद्भववायला नको.
राधिका भांडारकर