You are currently viewing आदत से मजबूर

आदत से मजबूर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकारा अंजली दीक्षित-पंडित लिखित अप्रतिम लेख*

 

*आदत से मजबूर*

 

कधी कधी मधूनच डायट बाबत जागरूकता निर्माण होते आणि साखरेचा चहा वगैरे सगळं बंद होत. मग ग्रीन टी, हर्बलटी, डिकॉशन असे प्रयोग बरेच महिने सुरू राहतात. काहीही झालं कुठलाही चहा असला तरी तो पिण्याची सकाळची एक ठराविक वेळ असते आणि कंपनी सुद्धा असते. माझ्यासाठी नवऱ्यासोबतची सकाळची ती दहा-पंधरा मिनिटं अगदी स्पेशल असतात. अगदी उठल्यापासून सकाळची आवराआवर, मुलींच्या शाळेच्या वेळा, त्यांचे डबे, पुढची अर्धी कच्ची तयारी या धामधुमीत सुद्धा आम्ही दोघं त्या एकत्र घालवायच्या क्षणांची आतुरतेन वाट बघत असतो. ती एक सवय झाली आहे. तो काही मिनिटांचा काळ एक एनर्जी बूस्टर डोस असल्यासारखं संपूर्ण दिवसभरासाठीची ऊर्जा पुरवतो.

 

अशा बऱ्याच गोष्टी आपल्या सवयीच्या होऊन जातात. जेवायला बसायची ठराविक जागा, टीव्ही पाहताना सोफ्याची एखादी बाजू, माझं कपाट किंवा कपाटातला माझा ठराविक कप्पा, फार कशाला गाडीत सुद्धा ठरलेल्या जागी आपण बसतो. या गोष्टींची इतकी अतिरेकी सवय होते की कधी चुकून कोणी त्यावर आक्रमण केलेलं बिलकुल खपत नाही. यात अधिकाराचा वगैरे काही भाग नसतो. मुद्दा सवयीचा असतो. आणि या अंगवळणी पडलेल्या गोष्टींचा त्याग सहजा सहजी कुणासाठी करायची आपली तयारी नसते. माझा सकाळचा चहा रवीं बरोबर नाही झाला तर दिवसभर चुकल्या चुकल्यासारखं होतं. काहीतरी चुटपुट लागून राहते. नाही तरी कोणीतरी म्हटलंच आहे ना की माणूस हा सवयींचा गुलाम असतो म्हणून; त्यातलाच हा प्रकार.

 

खरं तर चांगल्या सवयींची पायाभरणी ही लहानपणीच आजूबाजूच्या वातावरणातून, संस्कारातून होत असते. जसं स्नान केल्याशिवाय, पारसं काढल्याशिवाय काहीही खाऊ पिऊ नये ही एका अतिशय चांगली सवय. पण आता काळाच्या ओघात अनेक ठिकाणी पुढे मागे होताना दिसते. तसंच काही सवयी या वय वाढेल तसं इतक्या घट्टपणे शरीरात ठाण मांडून बसतात की जणू त्या आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक अभिन्न अंगच होतात. जित्याची खोड मेल्याशिवाय सुटत नाही म्हणतात तसं. ओला टॉवेल बेडवर टाकणं,घरी आल्यावर शूज, चप्पल रॅकवर न ठेवता इकडे तिकडे कुठेही काढणं, सॉक्स भिरकावून देणं, बाहेरून आल्यावर बदललेले कपडे पुढच्या पूर्ण दिवसभर तिथेच पडणं, केसांच्या गुंतवळीची योग्य विल्हेवाट न लावणं अशा कितीतरी मूर्ख सवयी मेल्याशिवाय सुटत नाहीत. पण मनावर घेतलं तर थोड्याशा प्रयत्नांन आपण त्या सुधरवू शकतो. निदान समोरच्याला त्रास न होईल इतपत तरी बदलू शकतो. पण का म्हणून मीच बदलाव? मी जसा आहे तसा इतरांनी स्वीकार करावा हा निव्वळ हटवादीपणा झाला. शुद्ध मूर्खपणा. या आडमुठेपणा मुळे एकतर रोजची वादावादी ठरलेली असतेच शिवाय वस्तू ऐनवेळी जागेवर न मिळाल्याने होणारा मनस्ताप सगळ्यांनाच सहन करावा लागतो. या गबाळ ग्रंथींच्या अगदी उलट काही अति चांगल्या सवयी सुद्धा लोकांचा डोकं उठवतात. अति स्वच्छता, सारखं घर टपटिप ठेवण, जरा इकडची वस्तू तिकडे गेली तर गहजब माजवणे, सतत हातात झाडू फडकं घेऊन हे पूस ते आवर… या खरं तर चांगल्या सवयी आहेत पण त्याचा अतिरेक झाला तर मात्र इतरांना डोकेदुखी ठरू शकतात. काही जणांना हात धुण्याची पाय धुण्याची इतकी सवय असते की दिवसभरात शंभर वेळा तरी ही क्रिया होत असेल. तेही हँडवॉश वापरून. ही अशी अतिरिक्त स्वच्छता म्हणजे मानसिक संतुलन बिघडण्याची सुरुवात वाटते मला तर. त्यामुळे बाकी घरच्यांना भरपूर त्रास सहन करावा लागतो आणि कुठे बाहेर आलं गेलं तर अक्षरशः शरमेनं जीव एवढुस्सा होतो. नाही तर टिंगल टवाळीचा विषय तरी बनतो. इथे तिची किंवा त्याची मानसिकता समजून घेऊन हळुवारपणे गोष्टी हाताळणच ठीक. चिडचिड त्रागा करून काहीही उपयोग नाही. त्या गोष्टीच्या मुळाशी जायला हवं. एखाद्याला सिगरेटची सवय आहे म्हणून त्याच्यावर चिडून भांडून काय होणार? त्याला योग्य प्रकारे समजावून वेळ दिला, बदल होतोय म्हटल्यावर प्रशंसा केली तर काहीतरी फरक पडेल. फक्त टोमणेच मारले तर परिस्थिती अजून चिघळेल. शेवटी काय तर समजून घेणं ,एकमेकांना स्पेस देणं याचीच गरज आहे. दुसऱ्याच्या सगळ्याच गोष्टीत आपण नाक खुपसायचं नसतं याची जाणीव ठेवणं आलं. ज्या गोष्टी ज्या सवयी एखाद्याच्या स्वभावाचा भाग बनलेल्या असतात त्यांना बदलण्याचा आटापिटा करण्यापेक्षा प्रसंगी दुर्लक्ष करणं जास्त सोयीस्कर असतं. कारण शेवटी हे खरंच आहे की जो तो ‘आदत से मजबूर’ असतो.

काही सोडायचं,

काही धरायचं,

काही बदलायचं… पण गोडीनं,

परस्परांना दुखवून नाही; बरोबर ना?

 

अंजली दीक्षित-पंडित

९८३४६७९५९६

प्रतिक्रिया व्यक्त करा