You are currently viewing काळसे बागवाडी येथे अनधिकृत वाळू उत्खनना विरोधात ग्रामस्थ आक्रमक ; ५ होडया पकडून दिल्या प्रशासनाच्या ताब्यात

काळसे बागवाडी येथे अनधिकृत वाळू उत्खनना विरोधात ग्रामस्थ आक्रमक ; ५ होडया पकडून दिल्या प्रशासनाच्या ताब्यात

काळसे बागवाडी येथे अनधिकृत वाळू उत्खनना विरोधात ग्रामस्थ आक्रमक ; ५ होडया पकडून दिल्या प्रशासनाच्या ताब्यात

३ होडी मालकांसह २४ भैय्या कामगारांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

मालवण

अनधिकृत वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर डोळेझाक करणाऱ्या मालवणच्या महसूल प्रशासनाला काळसे बागवाडी ग्रामस्थांनी कारवाई करण्यास भाग पाडले आहे. कर्ली खाडीपात्रात काळसे बागवाडी येथे अनधिकृत वाळू उत्खनन करत असलेल्या पाच होड्या ग्रामस्थांनी पकडून महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिल्या. गुरुवारी रात्री ही घटना घडली. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर या अनधिकृत वाळू उत्खनन प्रकरणी आंबेरी मंडळ अधिकारी यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून शासनाच्या मालकीच्या वाळूची चोरी प्रकरणी संदेश राधाकृष्ण मठकर रा. वालावल ता. कुडाळ, योगेश प्रभाकर करंगुटकर रा. काळसे बागवाडी ता. मालवण, गणपत बाबाजी जावकर रा. काळसे बागवाडी या होडी मालकांसह वाळू उपसा करणाऱ्या 24 परप्रांतीय कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संपूर्ण कारवाई दरम्यान महसूल प्रशासनाने एकूण पाच वाळू उपसा होड्या व होड्यामधील 22 ब्रास वाळू ताब्यात घेत जप्त केली आहे. तीन होड्या मधील वाळू कामगार पळून गेल्याने त्या कामगार तसेच होडी मालकांचा शोध सूरू असल्याचे पोलीस आणी महसूल प्रशासनाने सांगितले आहे.

कर्ली खाडीपात्रात होणाऱ्या अनधिकृत वाळू उत्खनना बाबत प्रशासनास वारंवार सांगूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अनधिकृत वाळू उत्खननात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याचा परिणाम म्हणून खाडी किनारी भागाची धूप होऊन किनाऱ्यावरील माड बागायतीचे नुकसान वाढत आहे. शेतकरी बागायतदार ग्रामस्थ यामुळे त्रस्त बनले होते. तसेच काही ठिकाणी वाळू उत्खनन बंदी असलेल्या क्षेत्रातही वाळू उपसा सूरू असल्याचा आरोप ग्रामस्थ यांनी केला आहे. गुरुवारी रात्री ग्रामस्थांनी या अनधिकृत वाळू उत्खनना विरोधात आक्रमक भूमिका घेत स्वतः नदी पात्रात उतरून वाळू उत्खनन करणाऱ्या होड्यांची धरपकड सुरु केली. ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहून काही होड्यानी येथून पळ काढला. तर काहीं होड्या ताब्यात घेण्यास ग्रामस्थांना यश आले. याची माहिती मिळताच पोलीस आणी महसूल चे अधिकारी येथे दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांनी पकडलेल्या वाळू कामगारांना ताब्यात घेतले. या सर्वांवर आणी होडी मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मालवण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा